केंद्र सरकारने रेल्वे तिकीट दरात केली मोठी कपात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मागील काही दिवसांपासून देशभरात इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर झपाट्याने वाढल्याने अनेकजण एसटी बस तसेच रेल्वे प्रवासाला पसंती देत आहेत. अशातच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या तिकीटदरात तब्बल ४० ते ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. 

रेल्वे तिकीट दरात कपात झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात ज्या 'एक्स्प्रेस स्पेशल' किंवा मेमू ट्रेन म्हणून धावत आहेत, अशा गाड्यांसाठी ही भाडे कपात लागू आहे कोरोना संकटात रेल्वे प्रशासनाने विविध सोयी सवलती बंद केल्या होत्या.

प्रवाशांनी वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या गाड्या बंद केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. या तिकीटदर वाढीचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. 

लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर वाढलेले तिकीटदर कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून होत होती. यासंदर्भात रेल्वे अधिकारी आणि प्रशासनाकडे देखील मोठ्या तक्रारी येत होत्या. दरम्यान, प्रवाशांनी मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता तिकीटदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनापूर्वी ज्याप्रमाणे तिकिट दर होते, त्याच प्रमाणे वाढलेले तिकीट दर रेल्वेने खाली आणले आहेत. या निर्णयाचा मोठा फायदा दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तिकीटदरात कपात केल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. त्यामुळे अतिरिक्त गाड्या सोडण्याचा विचार केला जात आहे.