भक्ती चाळक
आजच्या काळात मित्रमंडळींच्या भेटीगाठी, फॅमिली डिनर, वाढदिवस किंवा विकेंड सेलिब्रेशनसाठी सिझलरला पसंती दिली जाते. सोशल मीडियावरही या डिशचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. चिकन, सीफूड, पनीर, भाज्या अशा वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असलेल्या सिझलरने आज देशभरातील खाद्यसंस्कृतीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. गरम लोखंडी प्लेटमधून उठणारा धुर आणि त्यातून येणाऱ्या खमंग वासामुळे आपसूकच आजूबाजूच्या लोकांचं लक्ष तिकडे वळतं.
मात्र, गरम प्लेटमध्ये वाढल्या जाणाऱ्या या पदार्थामागे एक रंजक इतिहास दडला आहे. भारतात सिझलरची ओळख करून देण्याचं श्रेय जातं फिऱोज इराणी यांना. १९६३ मध्ये मुंबईत त्यांनी सिझलरची सुरुवात केली. त्यातून पुढे उभं राहिलं एक वेगळं खाद्यविश्व. याच परंपरेचा वारसा आजही पुण्यातील कॅम्प परिसरात असलेलं ‘द प्लेस टुशे द सिझलर’ जपत आहे.
हे आहे सिझलर्सचे मूळ
सिझलरचा हा प्रवास सुरू झाला होता अमेरिकेत. १९५० च्या दशकात कॅलिफोर्नियातील आईस्क्रीम विक्रेते डेल जॉन्सन न्यूयॉर्कला गेले होते. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये गरमागरम धातूच्या प्लेटमध्ये वाढलेलं जेवण पाहून ते प्रभावित झाले. गरम प्लेटमधून उठणारा धूर, पदार्थ वाढताना होणारा आवाज आणि त्याची आकर्षक मांडणी याने जॉन्सन यांचं लक्ष वेधून घेतलं. या कल्पनेतूनच १९५८ मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियातील कल्वर सिटी येथे ‘सिझलर फॅमिली स्टीक हाऊस’ सुरू केलं.
१९६७ मध्ये व्यवसायाचा विस्तार होऊ लागल्यानंतर जॉन्सन यांनी हे रेस्टॉरंट जिम कॉलिन्स यांना विकलं. पुढे कॉलिन्स यांनी ‘सिझलर’ला अमेरिकेत लोकप्रिय रेस्टॉरंट चेनचं स्वरूप दिलं. कमी किमतीत स्टेक, कोळंबी आणि मनसोक्त सॅलड खाण्याची सुविधा यामुळे हे रेस्टॉरंट कुटुंबांमध्ये लोकप्रिय झालं.
दरम्यान, याच सिझलर रेस्टॉरंटमध्ये १९६० च्या सुरुवातीला भारतीय व्यावसायिक फिऱोज इराणी यांनी जेवणाचा अनुभव घेतला आणि ही पद्धत त्यांना विशेष भावली. त्यांनी ही कल्पना मुंबईत आणली आणि त्याला भारतीय खाद्यसंस्कृतीची जोड दिली. पास्ता, मेक्सिकन चीज यांसारख्या पाश्चात्त्य घटकांसोबत पनीर, समोसे आणि गरम मसाले, पालेभाज्या यांसारखे भारतीय पदार्थ एकत्र आणत त्यांनी सिझलरला नवं रूप दिलं. अशा प्रकारे भारतीय सिझलरचा जन्म झाला.
अशी झाली भारतात सिझलरची सुरुवात
१९६३ च्या काळात मुंबईच्या खाद्यविश्वात नवनव्या पदार्थांची भर पडत होती. त्याचवेळी फिऱोज इराणी यांनी सिझलरची कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यावेळी विविध पदार्थ एकत्र शिजवून लाकडी आवरण असल्या धातूच्या गरम प्लेटमध्ये वाढण्याची ही पद्धत भारतीयांसाठी नवी होती.
फिऱोज हे व्यवसायाने रेस्टॉरंटचालक होते. आपल्या रेस्टॉरंटमध्ये त्यांनी या नव्या पदार्थाचे प्रयोग सुरू केले. ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी मुंबईतील फोर्ट परिसरातील एक्सेलसिअर सिनेमाच्या आवारात ‘द सिझलर’ नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं. हे ठिकाण भारतीयांना सिझलरची ओळख करून देणारं ठरलं.
फिऱोज इराणी यांच्या मनात भारतात सिझलरची कल्पना राबवण्यामागे एक कारण होतं. जेवणाच्या टेबलावर वाढलेला पदार्थ शेवटच्या घासापर्यंत गरम राहावा, अशी त्यांची इच्छा होती. धातूच्या गरम प्लेटमुळे पदार्थ बराच वेळ गरम राहू लागले. या प्रयोगाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सिझलरची लोकप्रियता वाढू लागली.
मुंबईतील आपल्या आधीच्या रेस्टॉरंटमध्ये सिझलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर फिऱोज यांनी ‘द सिझलर’ सुरू केलं. पुढे ब्रिटनमधील आयल ऑफ मॅन येथेही त्यांनी याच रेस्टॉरंटची एक शाखा सुरू केली. मुंबई आणि आयल ऑफ मॅनमधील दोन्ही रेस्टॉरंट्स फिऱोज यांच्या निधनानंतरही सुरू होती.
वडिलांकडून मिळालेला वारसा मुलाने सुरु ठेवला
फिऱोज इराणी यांच्या या खाद्यप्रवासात त्यांचा मुलगा शाहरुख इराणी यांची महत्त्वाची भूमिका होती. वडिलांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली शाहरुख यांनी सिझलर तयार करण्याचं तंत्र आत्मसात केलं. प्रत्येक पदार्थाची मांडणी, त्यातील घटकांचं प्रमाण, सॉसची चव आणि गरम प्लेटमध्ये पदार्थ वाढण्याची पद्धत अशा प्रत्येक गोष्टींवर त्यांनी मेहनत घेतली.
१९६७ मध्ये त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रोडवर ‘टुशे’ सुरू केलं. सिझलरच्या विविध प्रकारांना तिथे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत होता. पुढे चार वर्षांनी त्यांनी पुण्याचा रस्ता धरला. पुण्यातील कॅम्प परिसरातील मोलेदिना रोडवर ‘द प्लेस टुशे द सिझलर’ची सुरुवात झाली. अशा प्रकारे मुंबईत सुरू झालेली सिझलरची परंपरा पुण्यातही रुजली.
रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये सुरुवातीपासूनच विविध पर्यायांचा समावेश होता. शाकाहारी तसेच मांसाहारी सिझलरच्या अनेक प्रकारांत ग्राहकांना निवड करता येत होती. प्रत्येकाच्या आवडीनुसार सिझलरची चव अनुभवण्याची संधी इथे मिळत गेली.
फिऱोज यांच्या सिझलर्सचे वैशिष्ट्य
‘द प्लेस टुशे द सिझलर’चं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गरम प्लेट्सचा खास आकार. फिऱोज इराणी यांनी संकल्पित केलेला धातूच्या प्लेटचा मूळ आकार आणि रचना आजही कायम ठेवण्यात आली आहे. या ताटांचा आकार टिकवण्यासाठी विशेष पद्धतीचा वापर केला जातो. वापरामुळे प्लेटची झीज झाली की ती पुन्हा बदलण्यात येते. त्यामुळे सिझलर वाढण्याच्या मूळ पद्धतीत सातत्य राखलं जातं.
पाच दशकांच्या प्रवासात ‘द प्लेस टुशे द सिझलर’ने पुण्यातील अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. १९७०-८० च्या दशकात या रेस्टॉरंटमध्ये परदेशी ग्राहकांची मोठी वर्दळ असायची. त्या काळात सिझलर हा अनेकांसाठी नवा खाद्यपदार्थ होता. परदेशी ग्राहकांसोबतच वेगळ्या चवींचा आस्वाद घेऊ इच्छिणारे पुणेकरही इथे येत असत.
पुढे हे ठिकाण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं आवडतं हँगआउट बनलं. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवणं, गप्पा मारणं आणि सिझलरचा आस्वाद घेणं यासाठी विद्यार्थी इथे गर्दी करू लागले. १९९० च्या दशकाच्या अखेरपर्यंत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) प्रशिक्षणार्थी कॅडेट्सही या रेस्टॉरंटला भेट देत असत.
पुढे काळ पुढे बदलला आणि रेस्टॉरंटच्या ग्राहकवर्गातही बदल होत गेले. विद्यार्थ्यांसोबतच कुटुंबांनीही या ठिकाणाला पसंती दिली. वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ग्राहकवर्गाने या रेस्टॉरंटशी नातं जोडलेलं आहे.
रेस्टॉरंटचे वेगळेपण
रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम लक्ष वेधून घेतं ते तिथलं लाकडी इंटिरिअर. फर्निचरपासून भिंती आणि छतावरील पॅनलिंगपर्यंत लाकडाचा वापर करण्यात आला आहे. आरामदायी बैठक व्यवस्था आणि लाकडी सजावटीमुळे जागेला अनोखं रूप मिळालेलं आहे.खिडक्यांवर लावलेल्या रंगीत काचा तेथील वातावरणचं बदलून टाकते.
रेस्टॉरंटमधील कर्मचारी आणि सर्व्हिस स्टाफलाही या प्रवासाचा मोठा अनुभव आहे. दोन दशकांहून अधिक काळ कामाचा अनुभव असलेले कर्मचारी ग्राहकांना सेवा देतात. पदार्थ सर्व्ह करण्यापासून ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेला पाहायला मिळतो.
आज सिझलरच्या मेन्यूमध्ये अनेक नवे प्रयोग पाहायला मिळतात. वेगवेगळे सॉस, भाज्यांचे प्रकार आणि मांसाहारी पदार्थांच्या नव्या जोड्या ग्राहकांना आकर्षित करतात. अनेक रेस्टॉरंट्समध्ये सिझलरला स्वतंत्र स्थान मिळालं आहे. अशा काळात ‘द प्लेस टुशे द सिझलर’ने आपल्या पारंपरिक ओळखीला महत्त्व दिलं आहे.