अतिर खान
भारतीय मुस्लिमांच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी, त्यांच्यात बौद्धिक अन् सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी 'आवाझ-द-व्हॉईस'ने 'मीझान - टुवर्ड्स अ न्यू मुस्लिम इमॅजिनेशन' (Mizan-Towards a New Muslim Imagination) या विशेष मालिकेचा शुभारंभ केला आहे. काळाच्या ओघात विसर पडलेल्या मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
अपयशाचे खापर नक्की कोणावर?
भारतीय विकासाच्या महामार्गावर मुस्लिम समाज मागे का पडला? या प्रश्नाचे उत्तर शोधताना दरवेळी राजकीय परिस्थिती किंवा प्रशासकीय दुर्लक्षाकडे बोट दाखवले जाते. राजकीय पटलावर झालेल्या बदलांमुळे मुस्लिमांमध्ये एकाकीपणाची भावना वाढल्याचे वास्तव नाकारता येत नाही; पण हे अर्धसत्य आहे.
केवळ राजकीय प्रतिनिधित्व हाच जर सर्व समस्यांवरचा एकमेव उपाय असता, तर पाकिस्तान आणि बांगलादेशातील मुस्लिमांची परिस्थिती अत्यंत उत्तम असायला हवी होती! मात्र तिथले वास्तव वेगळेच आहे. म्हणजेच, आजच्या सर्व आव्हानांची मुळे समाजाच्या अंतर्गत रचनेतच रुजलेली आहेत. बदलत्या सामाजिक आणि आर्थिक वास्तवाशी जुळवून घेण्यात आलेले अपयश हे यामागचे मुख्य कारण आहे.

भीतीच्या राजकारणातून बाहेर पडण्याची गरज
मुस्लिम समाजाने शास्त्रज्ञ, उद्योजक, कायदेतज्ज्ञ, कलाकार, सनदी अधिकारी आणि सैनिक म्हणून देशसेवेत मोठे योगदान दिले आहे; मात्र ही यशोगाथा विस्तीर्ण लोकसंख्येच्या तुलनेत फारच छोटी आहे.
दीर्घकाळापासून मुस्लिमांविषयीची सार्वजनिक चर्चा ही भीती, अस्मिता अन् ध्रुवीकरणाच्या राजकारणाभोवतीच फिरत राहिली. या राजकीय गदारोळात शिक्षण, संस्थांची उभारणी आणि आर्थिक प्रगती यांसारखे कळीचे मुद्दे पूर्णपणे दुर्लक्षित राहिले. आता स्वतःचीच सहानुभूती मिळवण्याचे दिवस संपले असून, प्रामाणिक आत्मपरीक्षण करण्याची अन् प्रगतीची आस धरण्याची खरी वेळ आली आहे.
धर्माचा खरा अर्थ अन् काळाची गरज
बहुतांश भारतीय मुस्लिमांच्या दृष्टीने धर्म ही केवळ वैयक्तिक ओळख नसून सामाजिक जाणीव आहे. वास्तविक पाहता ही गोष्ट अत्यंत फलदायी ठरायला हवी होती; परंतु इस्लामच्या शिकवणींचा आजच्या वास्तवाशी सुमेळ घालण्यात अपयश आल्याने समाजात एक प्रकारची जडत्व-अवस्था (Inertia) निर्माण झाली.
श्रद्धा ही शाश्वत असते, पण कायदे, प्रथा आणि परंपरा या काळाच्या ओघात बदलणाऱ्या असतात. दुर्दैवाने, कुरआन आणि सुन्नत यांच्या थेट अभ्यासाऐवजी रूढी-परंपरा, पंथीय निष्ठा अन् सांस्कृतिक प्रथांमधून आपली धार्मिक समज तयार झाली. मूळ धार्मिक ग्रंथांपेक्षा मानवनिर्मित व्यवस्थांना जास्त महत्त्व दिले गेले. यामुळेच गैरसमज वाढले, अंतर्गत दरी रुंदावली आणि विचार मंथन करणाऱ्या गतिशील परंपरेपासून समाज दुरावला.

'सच्चर समिती'चा इशारा
या विचारांचे गंभीर परिणाम आज आपल्यासमोर आहेत. शिक्षणातील अपुरेपण, सार्वजनिक आयुष्यात महिलांचा नगण्य सहभाग आणि दर्जेदार संस्थांचा अभाव, यामुळे आर्थिक मागासलेपण आले.
स्वातंत्र्यलढा, साहित्य, संस्कृती, शिक्षण अन् तंत्रज्ञानात अफाट योगदान देणारा समाज आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत आहे. विभक्तपणा, ताठर विचारसरणी आणि स्वतःला कायम 'बळी' (Victim) समजण्याच्या मानसिकतेने समाजाचा विकास रोखला आहे.
सन २००६ मध्ये आलेल्या 'सच्चर समिती अहवाला'ने मुस्लिमांचे शैक्षणिक, सामाजिक अन् आर्थिक मागासलेपण स्पष्टपणे समोर मांडले होते. हा अहवाल म्हणजे सुधारणांचा मार्ग होता; पण त्याचे रुपांतर केवळ राजकीय चिखलफेकीत झाले. दोन दशकांनंतरही ते प्रश्न कायम आहेत.
बदलाची नवी दिशा: 'मीझान'चा मंत्र
आजच्या बदलत्या लोकशाही समीकरणांमध्ये केवळ राजकीय पाठिंब्यावर मुस्लिम समाजाचे भवितव्य अवलंबून राहू शकत नाही. भविष्यातील प्रगती ही शिक्षण, बौद्धिक आत्मविश्वास, आर्थिक ताकद अन् संस्थात्मक क्षमतेवरच उभारली जाईल.
यासाठी जुन्या वैभवाच्या आठवणींत रमण्याऐवजी, स्वतःला बळी समजण्याची मानसिकता सोडून आत्मविश्वासाने पुढे यावे लागेल. 'आवाझ-द-व्हॉईस'ने नेहमीच पूर्वग्रहांना छेद देणारी पत्रकारिता केली आहे. 'मीझान' मालिकेच्या माध्यमातून देश-विदेशातील विचारवंत, अभ्यासक आणि तज्ज्ञांचे विचार, मुलाखती व पॉडकास्ट वाचकांपर्यंत पोहोचवले जातील.
२०२४ ची नवी पहाट अन् तरुणाईची ताकद
हा उपक्रम म्हणजे इस्लामची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न मुळीच नाही. इस्लामची नैतिक अन् अध्यात्मिक पायाभरणी परिपूर्ण आहे. गरज आहे ती फक्त त्याच्या शिकवणींचे आजच्या काळात योग्य आकलन करून अंमलबजावणी करण्याची!
आज हजारो तरुण मुस्लिम मुले-मुली विद्यापीठे, स्टार्टअप्स, नागरी सेवा अन् विविध व्यवसायांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यांचा हा यशोमार्ग दर्शवतो की, अडचणी कायमस्वरूपी नाहीत. भारत जेव्हा २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहत आहे, तेव्हा या राष्ट्रीय प्रवासात भारतीय मुस्लिमांनाही बरोबरीने सहभागी व्हावे लागेल.
भविष्य ही आपोआप घडणारी गोष्ट नाही, तर ती स्वतः घडवायची असते. चला, या बौद्धिक प्रवासाचा भाग बना अन् आपली मते [email protected] या ईमेलवर नक्की कळवा.
(लेखक हे आवाझ -द-व्हॉईसचे मुख्य संपादक आहे)