'इफ्फी'ने गौरवलेल्या एका इराणी चित्रपटाविषयी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
‘एन्डलेस बॉर्डर्स’ या चित्रपटातील एक दृश्य.
‘एन्डलेस बॉर्डर्स’ या चित्रपटातील एक दृश्य.

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोव्यात संपन्न झाला. या महोत्सवात ज्या चित्रपटांनी प्रभावित केलं, आश्चर्यचकित केलं त्यात ‘एन्डलेस बॉर्डर्स’ हा चित्रपट होता. निर्वासित - शरणार्थींचा विषय घेऊन बनवलेले अनेक चित्रपट इफ्फीमध्ये या वर्षी बघायला मिळाले.

‘एन्डलेस बॉर्डर्स’ देखील त्यातलाच चित्रपट होता. महोत्सवातील चित्रपट विचारांना वाट करून देणारे असतात. चित्रपट बघितला आणि तिथंच विषय संपला असं होत नाही. यातील विषय अतिशय संवेदनशील असतात, जे पुढचे काही दिवस तुमच्या मनाचा तळ गाठतात.

असे चित्रपट बघून थिएटरमधून बाहेर पडल्यावर कोणाशीच बोलू नये, रुखरुख लावणाऱ्या गोष्टींची डायरीत नोंद करून ठेवावी असं वाटू लागतं. असा चित्रपट तुमची पाठ सोडत नाही. 'एन्डलेस बॉर्डर्स' बाबत असं झालं.

इराणी चित्रपटांचा गाभा काय असणार? हे आता बऱ्यापैकी माहीत झालं आहे. खरंतर हा देखील इराणी सिनेमाबद्दल आपण बाळगत असलेला पूर्वग्रहच म्हणावा लागेल. वयाच्या तेराव्या वर्षांपासून लघुपट बनवणाऱ्या दिग्दर्शक अब्बास अमिनी यांनी कायम सामाजिक विषयांना प्राधान्य दिलं आहे.

अब्बास यांचा एन्डलेस बॉर्डर्स हा देखील इराणमधील राजकीय-सामाजिक सद्यपरिस्थितीवर भाष्य करतो. चित्रपटाचं नाव बरंच काही सूचित करणारं आहे. चित्रपटाची कथा घडते अफगाणिस्तान-इराण सीमेवर.

सीमेवरील तणावाचं दृश्य, तालिबानी कारवायांना कंटाळून प्रत्येकाची सीमेच्या पलिकडे जाण्यासाठी सुरू असलेली धडपड, हे सारं बघताना आपण अस्वस्थ होतो. वृद्ध, लहान मुलं, महिला, कामगार, डॉक्टर असा प्रत्येक जण सीमेपलिकडे जायला धडपडतोय.

बलोच लोकांची वस्ती असलेल्या सीमेवरील गावात राहणारा, हद्दपारीची शिक्षा भोगत असलेला शिक्षक आणि शरणार्थींना मदत करण्याचा त्याचा स्वभाव हे सगळं चित्रपटाची कथा साकारतात.

रूक्ष-ओसाड, सर्वत्र पांढऱ्या वाळूचं रण असलेल्या गावात या गावात अहमद हद्दपारीची शिक्षा म्हणून येतो. राजकीय भूमिकेत सहभागी झाल्याच्या कारणामुळे अफगाणिस्तानच्या सीमेवरील गावातल्या शाळेत त्याला पाठवलं जातं.

जिथून तो कोणत्याही प्रकारच्या चळवळीत सहभागी होऊ शकणार नाही. ही शाळा एकशिक्षकी शाळा. त्यामुळे गावातल्या प्रत्येकाशी त्याचा जिव्हाळ्याचा संबंध. राजकीय चळवळीत सहभाग घेतल्याचं मान्य केल्यामुळं त्याला तुरुंगवास होत नाही पण त्यासोबत सहभागी असलेल्या त्याच्या प्रेयसीला मात्र तुरुंगवास होतो.

त्यानं घेतलेली माघार, प्रेयसीचा केलेला विश्वासघात या कारणांमुळे मित्र परिवारात त्याच्याबद्दल नाराजी पसरते. एकीकडे अहमद ''मी फक्त शिक्षक आहे, मला कोणतीही राजकीय भूमिका घ्यायची नाही,'' हे ठणकावून सांगतो तेव्हा एक क्षण त्याचा तिरस्कार वाटतो.

पण पळवाट शोधून सीमेवरील गावात राहणारा हाच अहमद अल्पवयीन हसीबाला सीमेपलीकडे जाण्यास मदत करतो. अल्पवयीन हसीबाला तिच्या वडिलांकडून विकत घेऊन मरणाला टेकलेल्या म्हाताऱ्याशी जबरदस्तीनं लग्न लावून दिलं आहे,

हे समजताच अहमदची भूमिका बदलते. तो फक्त शिक्षक राहत नाही. प्रेयसी निलोफरच्या मदतीनं हसीबा आणि तिच्यावर प्रेम करणारा बिलाज या दोघांना सीमेपलिकडे सुखरूप पोहोचवण्याची त्याची धडपड एन्डलेस बॉर्डर्स मध्ये बघायला मिळते.

वाळवंटातील पांढऱ्या वाळूत एकरूप झालेलं सीमेवरील गाव आणि त्याची सिनेमॅटिक प्रतिमा आपल्याला हुरहुर लावते. जणू काही सीमेपलिकडे जाण्याचा प्रश्न फक्त पडद्यावरील व्यक्तिरेखांचा नाही तर तो आपलाही आहे असं वाटत राहतं.

चित्रपटातील रखरखीत वातावरण आणि रूक्ष-कठोर व्यक्तिरेखा या चित्रपटाचा गाभा अधिकच थरारक बनवतात. इराणी दिग्दर्शक अब्बास अमिनी यांनी या चित्रपटातून अफगाणिस्तान, इराणमधील राजकीय-सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवलं आहे.

विशेष करून निर्वासित-शरणार्थींच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. अहमदची भूमिका साकारणाऱ्या पारिया रहिमी सॅम या अभिनेत्यानं आपल्या सहज अभिनयाने संपूर्ण सिनेमा व्यापून टाकला असून पारिया रहिमी हा आजच्या इराणी सिनेमातील प्रभावी अभिनेता असल्याचं जाणवतं.

या अवघड वातावरणात त्याची धर्मनिरपेक्ष मूल्यं आणि चांगल्या हेतूंचा अनेकदा उलटसुलट परिणाम होऊन देखील आपली मानवतावादी भूमिका तो सोडत नाही. अतिशय गुंतागुंतीचं कथानक असलेल्या या चित्रपटाचे दोन्ही शो हाऊसफुल होते. इराणमधील अवघड परिस्थितीमुळं चित्रपटातील कोणीही या महोत्सवाला उपस्थित राहू शकलं नाही हीच एक निराश करणारी गोष्ट होती.

- मनस्विनी प्रभुणे, नायक