महिला प्रीमियर लीग खेळणारी धारावीची सिमरन शेख

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
सिमरन - महिला प्रीमियर लीग
सिमरन - महिला प्रीमियर लीग

 

जयेंद्र लोंढे, आवाज मराठी 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये जगातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणजे 'धारावी'. ५५०  एकरांवर पसरलेल्या या वस्तीमध्ये अंदाजे १०  लाख नागरिक राहतात. १००  फुटांच्या झोपडीमध्ये आठ ते दहा लोक दाटीवाटीने राहतात. इथे पायाभूत सुविधांचा वानवा आहे. स्वछता आणि आरोग्य यांची स्थितीही अतिशय हालाकीची आहे. अशा परिस्थितीत धारावीतील एक मुस्लिम मुलगी क्रिकेट खेळू लागते आणि थेट महिला आयपीएलमध्ये निवडली जाते... हा अविश्वसनीय आणि प्रेरणादायी प्रवास आहे सिमरन शेख हिचा!

 

४ मार्चपासून खेळवण्यात येणार्‍या महिला प्रीमियर लीगमध्ये धारावी झोपडपट्टीत राहणार्‍या सिमरन शेखने २१ वर्षीय तरुणीची निवड झाली. यूपी वॉरियर्स संघाने लिलावावेळी सिमरनला १० लाखांच्या मूळ किंमतीवर आपल्या संघात समाविष्ट केले.

 

याच पार्श्वभूमीवर सिमरन हिच्याशी संपर्क साधला आणि धारावी ते महिला प्रीमियर लीग इथपर्यंतच्या प्रवासाबाबत तिच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. धारावीच्या गल्ली क्रिकेटपासून सिमरनच्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात झाली. सिमरन मुलींसोबत नव्हे तर मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. वयाच्या १५ वर्षांपासून तिला क्रिकेटचे वेड लागले. पण महिला क्रिकेट सध्या मोठ्या प्रमाणात खेळले जाते हे मात्र तिला माहीत नव्हते.

 

गल्ली क्रिकेट खेळता खेळता सिमरन क्रॉस मैदान येथील युनायटेड क्लबशी जोडली गेली. रोमडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने क्रिकेटमधील बारकाव्यांचा अभ्यास केला. संजय साटम यांच्याकडून तिला क्रिकेट किटची मोलाची मदत झाली. क्रिकेटसाठी लागणारे साहित्य त्यांच्याकडून तिला मिळत असे. त्यामुळे संजय साटम यांना कधीही विसरु शकत नसल्याचे ती सांगते.

 

गल्ली क्रिकेट आणि लेदर चेंडूने खेळले जाणारे मुख्य क्रिकेट यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. याबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, ‘गल्ली क्रिकेट व मुख्य क्रिकेट यामध्ये खूप फरक आहे, हे मलाही मान्य आहे. पण मला क्रिकेटची आवड होती. त्यामुळे सर्वस्व पणाला लावले.’ टेनिस चेंडूने खेळल्या जाणार्‍या क्रिकेटपेक्षा मुख्य क्रिकेट सोपे वाटले. म्हणून समरस होऊन पुढे गेले, असे ती याप्रसंगी आवर्जून सांगते.

 

सिमरनचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. क्रिकेट खेळण्याविषयी कुटुंबीयांची भूमिका काय होती असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, ‘आम्ही चार बहीणी व तीन भाऊ. आई घर सांभाळते. वडील वायरिंगचे काम करतात. माझ्यापेक्षा दोन बहीणी मोठ्या आहेत. बाकी सर्व माझ्यापेक्षा लहान आहेत. आई-वडीलांनी मला क्रिकेट खेळायला केव्हाही रोखले नाही. मला कुठलीही विरोध नव्हती. आई-वडीलच नव्हे तर काका,आत्या अशा नातेवाईकांकडूनही मला विरोध नव्हता. माझ्या परीसरातूनही मला मोलाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे.’

 

शिक्षणाच्या बाबतीत विचारलं असता सिमरन म्हणाली,‘मला शिक्षणात रस नव्हता. दहावीच्या परीक्षेत मी नापास झाले. त्यानंतर मी शिक्षणात पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि क्रिकेटमध्येच करिअर करण्याचे ठरवले. मुंबईच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळवला. १९ वर्षांखालील क्रिकेटही खेळले. मुंबईच्या वरिष्ठ संघातूनही खेळण्याची संधी मिळाली. मी फलंदाज आहे. मधल्या फळीत फलंदाजी करायला मला आवडते. पण टी-२० क्रिकेटमध्ये सलामीला पाठवण्यात आल्यानंतरही मी उत्तम खेळ करू शकते.’

 

सिमरन पुढे म्हणते,‘आतापर्यंत मी स्वतःच्या इच्छाशक्तीवर पुढे आले. यापुढेही मी प्रयत्नांची शिकस्त करणार आहे. विराट कोहलीची फलंदाजी मला आवडते. तर महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा पेरीचा खेळ मला भावतो. भारतीय महिला संघातील खेळाडूचे नाव घ्यायचे झाल्यास जेमिमा रॉड्रिग्ज हिचा खेळ छान वाटतो.’

 

मिताली राज, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत सिंग, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यांसारख्या वरिष्ठ संघातील महिला खेळाडूंसोबत एका स्पर्धेनिमित्त संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे सिमरन सांगते. जेमिमासोबत तर ती मुंबईसाठी एकत्रित खेळली आहे. त्यांचा अनुभव आमच्यासारख्या युवा खेळाडूंसाठी मोलाचा ठरू शकतो.

 

महिला क्रिकेटबाबत विचारले असता ती म्हणाली, ‘गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर महिला क्रिकेटचा विकास झाला आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियानंतर आता भारतातही टी-२० लीगला सुरुवात होत आहे. महिला खेळाडूंवर लाखांची, कोटींची बोली लावण्यात आली आहे. यामुळे महिला खेळाडूंचा आर्थिक प्रश्नही मिटला जाणार आहे. भविष्यात या स्पर्धांमुळे महिला क्रिकेटला प्रचंड फायदा होणार आहे.’

 

भारतीय महिला संघात खेळण्याचे स्वप्न सिमरनने बघितले आहे. तिला भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्वही करायचे आहे. एवढेच नव्हे तर देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याचे ध्येयही सिमरनने डोळ्यांसमोर ठेवले आहे.

 

प्रयत्नांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिखर गाठता येते हे सिमरन शेखने दाखवून दिले आहे. तिचे यश इतर तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे. धारावीची सिमरन काही वर्षांत भारतीय संघाचे नेतृत्व करेल, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.