मलिक असगर हाशमी
भारताच्या आधुनिक शिक्षणाचे आधारस्तंभ आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे (AMU) संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची आज पुण्यतिथी आहे. २७ मार्च १८९८ रोजी जगाचा निरोप घेणाऱ्या सर सय्यद यांचे नाव येताच डोळ्यांसमोर एका दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञाची प्रतिमा उभी राहते. त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू पुस्तकांच्या पानांमधून बाहेर पडून सोशल मीडियावरील चर्चेपर्यंत मर्यादित राहिले आहेत. आज आपण त्यांच्या वादांवर नव्हे, तर त्यांच्याशी निगडित अशा आठवणींवर बोलणार आहोत, ज्या आजही जिवंत आहेत.
शानदार शेरवानी आणि अलीगढी तहजीब
सर सय्यद अहमद खान यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विषय निघाल्यास त्यांच्या शेरवानीचा उल्लेख येणार नाही असे शक्यच नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सय्यद उबेदुर रहमान यांनी त्यांच्या एका ऐतिहासिक शेरवानीचा फोटो शेअर केला आहे. सर सय्यद नेहमीच अत्यंत सुंदर आणि नीटनेटकेपणाने शिवलेल्या शेरवानीमध्ये दिसायचे, असे त्यांनी लिहिले आहे. हा केवळ एक पेहराव नव्हता, तर सर सय्यद यांनी स्वतः घडवलेल्या अलीगडच्या त्या खास संस्कृतीचा आणि शिष्टाचाराचा (तहजीब) तो भाग होता.
ते साधेपणा आणि सुसंस्कृतपणाचा एक अनोखा संगम होते. आजही AMU चे विद्यार्थी त्या शेरवानीकडे केवळ एक पोशाख म्हणून नव्हे, तर एक वारसा म्हणून पाहतात. १९ व्या शतकातील ब्रिटीश भारतात ते एक असे सुधारक होते, ज्यांनी आपल्या वेशभूषेने देखील प्रतिष्ठेचा परिचय करून दिला.
युधिष्ठिराच्या अस्तित्वावर युक्तिवाद आणि विवाद
सर सय्यद यांचे जीवन केवळ कौतुकापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या काही विचारांवर आजही इतिहासकारांमध्ये तीव्र चर्चा होते. 'टू नेशन थ्योरी' व्यतिरिक्त दिल्लीच्या इतिहासावर त्यांनी दिलेल्या तर्कांबाबतही वाद झाला आहे. सर सय्यद यांनी दिल्लीत महाभारत काळातील युधिष्ठिराच्या अस्तित्वाबाबत काही पुरातत्वीय पुराव्यांचा युक्तिवाद केला होता.
इतिहासकार डॉ. रुचिका शर्मा यांसारख्या अनेक विद्वानांचे या युक्तिवादावर एकमत नाही. डॉ. शर्मा यांनी सर सय्यद यांचे दावे फेटाळून लावत एक सविस्तर व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे. मात्र, एक वरिष्ठ पत्रकार म्हणून आमचा उद्देश वादाला खतपाणी घालणे हा नसून, सर सय्यद हे शोध घेणाऱ्या प्रवृत्तीचे माणूस होते आणि त्यांनी प्रत्येक विषयाला आपल्या निकषांवर घासून पाहण्याचा प्रयत्न केला, हे सांगणे आहे.
सर सय्यद यांचा शेवटचा संदेश : डोळ्यांची दृष्टी गेली पण दृष्टिकोन नाही
प्रसिद्ध लेखिका राना सफवी यांनी सर सय्यद यांचा तो शेवटचा संदेश शेअर केला आहे, जो आजही कोणाच्याही अंगावर शहारे आणू शकतो. आपल्या मुलांच्या (विद्यार्थ्यांच्या) नावाने दिलेल्या संदेशात त्यांनी आपल्या संघर्षाची कहाणी मांडली आहे. जेव्हा त्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले, तेव्हा त्यांच्याच माणसांनी त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती, असे त्यांनी म्हटले होते. चहूकडून टीका झाली. अडचणी इतक्या होत्या की ते वेळेपूर्वीच वृद्ध झाले. त्यांचे केस गळून गेले आणि डोळ्यांची दृष्टीही मंदावली. परंतु, या सर्व अडथळ्यांनंतरही त्यांचा 'दृष्टिकोन' (Vision) कधीही पुसट झाला नाही, असे त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले होते. या संस्थेचा प्रकाश अंधार पूर्णपणे संपेपर्यंत पसरवत राहावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले होते.
लंडन ते दिल्ली: दोन घरांची गोष्ट
सर सय्यद यांच्या जीवनाचा प्रवास सलमान निजामी यांनी दोन फोटोंच्या माध्यमातून मांडला आहे. पहिला फोटो लंडनच्या त्या घराचा आहे, जिथे सर सय्यद एक वर्ष राहिले होते. दुसरा फोटो दिल्लीच्या त्या घराचा आहे, जिथे त्यांनी आपले पूर्ण जीवन व्यतीत केले. या फोटोंसोबत एक कडू सत्य देखील मांडले आहे. पाश्चात्य देश आपली बौद्धिक संपदा आणि इतिहास जपून ठेवतात. लंडनचे ते घर आज एक वारसा आहे, तर आपल्या देशात इतिहासाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती नुकसानकारक ठरते. सर सय्यद यांचे दिल्लीतील घर त्यांच्या साधेपणाचा आणि हजारो तरुणांचे भविष्य बदलणाऱ्या त्यांच्या अढळ संकल्पाचा पुरावा आहे.
आसामी भाषेतील सर सय्यद यांचे पहिले चरित्र
सर सय्यद यांचा प्रभाव केवळ उत्तर भारतापुरता मर्यादित नव्हता. ईशान्य भारतातही त्यांच्या विचारधारेचा आवाज ऐकू येतो. अलीकडेच अमान वदूद यांनी त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. हे पुस्तक सर सय्यद अहमद खान यांचे चरित्र असून ते आसामी भाषेत लिहिले आहे. आसामी भाषेतील सर सय्यद यांच्यावरील हे पहिले सविस्तर पुस्तक आहे. १७ ऑक्टोबर १८१७ रोजी जन्मलेल्या या महापुरुषाचे विचार आजही वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतींमधील दुवा म्हणून काम करत असल्याचे हे लक्षण आहे.