'नमस्कार बहनों और भाईयों, मैं आपका दोस्त अमीन सयानी बोल रहा हूँ' या खर्ज्यातला आवाजासह बिनाका गीतमालेचा कार्यक्रम सुरू करणारे लाडके उद्घोषक आता आपल्यात नाहीत. त्यांचे रसाळ निवेदन श्रोत्यांना ऐकत राहावेसे वाटे. एरवी सुमधूर गाण्यांची प्रतीक्षा करणाऱ्या श्रोत्यांना कधी एकदा निवेदन संपते आणि गाणे सुरू होते असे वाटते. पण अमीन सयानी हे त्याला अपवाद होते. त्यांना ऐकणे हाच अनेकांना एक सुंदर अनुभव वाटे. हे खास स्थान सयानी यांनी मिळवले, ते त्यांच्या आवाजावर, हे तर खरेच; पण संगीताची त्यांची जाण, अभ्यास, त्यांची रसिकता आणि या सगळ्याला शब्दांचा साज चढविण्याची कला या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपली पताका दीर्घकाळ फडकवत ठेवली. त्यांचे शब्द अजूनही अनेकांच्या कानामनात घुमत असतील. त्यां श्रोत्यांशी संवाद साधण्याची हातोटीही विलक्षण होती.
त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी मुंबईत एका साहित्यिक कुटुंबात झाला. अमीन सयानी यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेवियर्स येथे झाले. त्यांनी काही काळ नाटकातही काम केले. शास्त्रीय संगीताचे धडेही गिरवले. त्यांना चांगला गळा होता. अमीन यांना गायक व्हायचे होते. मात्र पुढे त्यांचा आवाज फाटला आणि त्यांना गाणे म्हणणे कठीण जाऊ लागले. भाऊ हमीद यांच्या सल्ल्यानुसार अमीन यांनी आकाशवाणीच्या हिंदी उद्घोषकपदासाठी अर्ज दिला. पण त्यांचा आवाज नाकारला गेला. अधिकारी म्हणाले, "स्क्रिप्ट वाचण्याची शैली चांगली आहे; पण सयानी यांच्या उच्चारांत खूपच गुजराती आणि इंग्रजीची छाप दिसते आणि असा आवाज रेडिओला चालत नाही.” रेडिओकडून नकारघंटा आल्याने अमीन सयानींना धक्का बसला. ते हताश झाले. पण जिद्द सोडली नाही.
त्यांचे भाऊ हमीद यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी भरपूर हिंदी ऐकले आणि त्यांना संधीची दारे उघडली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. ऑल इंडिया रेडिओत प्रारंभी त्यांनी जवळपास दहा वर्षे काम केले. त्यानंतर १९५२ मध्ये अमीन हे रेडिओ सिलोनला जोडले गेले. तेथे चार दशके काम केले. त्यांच्या सर्वात लोकप्रिय 'बिनाका गीतमाला' कार्यक्रमाने सर्व विक्रम मोडले. भारतीय चित्रपटसंगीतातील हा सर्वात पहिला 'काउंटडाउन शो' होता. काही दिवसांतच श्रोत्यांनी या कार्यक्रमाला डोक्यावर घेतले. 'बिनाका गीतमाला' सुरू होताच नाक्यावर, गल्लीत लोक एकत्र व्हायचे आणि अर्ध्या तासाच्या सांगितिक मेजवानीवर ताव मारायचे.
संगीत कार्यक्रमाचे 'वाढपी' अमीन सयानी असल्याने त्याची लज्जत उत्तरोत्तर वाढत जायची. बिनाका गीतमाला आणि अमीन सयानी असे समीकरण बनले होते. रेडिओची लोकप्रियता वाढविण्यात अमीन यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या नावावर ५४ हजारांपेक्षा अधिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्याचा विक्रम आहे. १९ हजार जिंगल्स त्यांच्या नावावर आहेत आणि त्यामुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रिकॉड्समध्ये देखील नोंदले गेले आहे. रेडिओशी अमीन सयानी यांचे एवढे भावनिक नाते जुळले होते की त्यांनी चित्रपटातही अशाच भूमिका साकारल्या होत्या.
‘भूत बंगला', 'तीन देवियाँ' यासारख्या चित्रपटांत त्यांनी उद्घोषक म्हणूनच काम केले आहे. १९७० च्या दशकांत अमिताभ बच्चन हे मुंबईच्या रेडिओ स्टुडिओत ऑडिशन देण्यासाठी गेले. अमिताभ बच्चन हे कोणतीही पूर्वसूचना न देता अमीन सयानी यांना भेटण्यासाठी गेले. त्यामुळे यांनी यांनी त्यांना भेटण्यास नकार दिला. तसेच आवाज न ऐकताच त्यांना नामंजूर केले. कालांतराने अमीन सयानी यांनी अमिताभ बच्चन यांचा 'आनंद' चित्रपट पाहिला. तेव्हा त्यांना बच्चन यांच्या दमदार आवाजाचे आकलन झाले आणि या प्रकाराबद्दल खंत वाटली. निवृत्तीनंतर अमीन सयानी यांनी एका चर्चेत आत्मकथा लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. ती पूर्ण झाली नाही.
- अरविंद रेणापूरकर