बिहारच्या तैयबा अफरोज यांची कहाणी केवळ पायलट बनण्याची नाही. ती संघर्ष, समर्पण आणि स्वप्नांच्या उंच भरारीचे जिवंत उदाहरण आहे. ‘पायलट ऑन मोड’, ‘बॉर्न टू फ्लाय’ आणि ‘ड्रीम अचिव्ह फॉर फ्लाय’ असे शब्द त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर आकर्षक वाटतात. पण या शब्दांमागे लपले आहे वास्तव. जमीन विकण्यापासून ते सामाजिक टीकांना तोंड देणारी आणि शारीरिक दौर्बल्यावर मात करणारी, त्यांची कहाणी प्रेरणादायी आहे.
सारण जिल्ह्यातील जलालपूर या छोट्या गावातील तैयबा अफरोज बिहारच्या पहिल्या मुस्लिम महिला कमर्शियल पायलट आहेत. हे यश त्यांना सहजासहजी मिळालेले नाही. त्यांचे वडील मतिउल हक किराणा दुकान चालवत होते. आई समसुन निशा घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत होत्या. पण मुलीचे स्वप्न पूर्ण करण्याचे त्यांनी व्रत स्वीकारले. तैयबाने लहानपणीच ठरवले होते, पायलट होण्याचे. गावात असे स्वप्न पाहणेही गुन्हा मानले जायचे. पण वडिलांनी मुलीच्या इच्छेला स्वप्न बनवले.
बारावीनंतर तैयबाने पायलट होण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाला धक्का बसला. पण तिच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीने आणि मेहनतीने वडिलांचा विश्वास जिंकला. खरी आव्हान होती पैशांची. विमानन प्रशिक्षणाची महागडी फी त्यांच्या आवाक्याबाहेर होती. आई-वडिलांनी ठरवले, मुलीचे स्वप्न अपूर्ण ठेवायचे नाही. त्यांनी खेतीची जमीन विकली. त्या पैशातून तैयबाला भुवनेश्वरच्या सरकारी विमानन प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला.
हा प्रवास साधा नव्हता. प्रशिक्षण सुरू झाल्यावर काही काळातच तैयबाला गॉलब्लॅडरमध्ये खड्यांची तक्रार झाली. मेडिकल बोर्डाने तिला अनफिट ठरवले. हा धक्का मोठा होता. जमीन विकून खरेदी केलेले स्वप्न धुळीस मिळणार होते. पण तैयबाने हार मानली नाही. तिने शस्त्रक्रिया केली, स्वस्थ झाली आणि पुन्हा प्रशिक्षण सुरू केले.
तैयबाने सुमारे ८० तासांचे उड्डाण पूर्ण केले होते. तेव्हा एका प्रशिक्षण पायलटच्या मृत्यूने संस्थेत शांतता पसरली. या घटनेने तैयबाच्या मनावर खोल परिणाम झाला. तिने प्रशिक्षण मध्येच सोडले. स्वप्न पुन्हा तुटत असल्यासारखे वाटले. पण वडील आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने ती खचली नाही. बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले गेले. एका निवृत्त डीजीपीच्या मदतीने तैयबाने इंदूर फ्लाइंग क्लबमध्ये पुन्हा उड्डाणाची तयारी सुरू केली.
यावेळी तिने उरलेले १२० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केले. डीजीसीएचे कमर्शियल पायलट लायसन्स मिळवले. हे लायसन्स कोणत्याही व्यक्तीला व्यावसायिक पायलट बनण्याची परवानगी देते. तिचे प्रशिक्षण सुमारे २ ते ३ वर्षे चालले. यात थिअरी परीक्षा, सिम्युलेटर ड्रिल आणि प्रत्यक्ष उड्डाणांचा समावेश होता. तैयबाने २०० तासांची कठीण उड्डाणे पूर्ण केली. यात हवामानाची आव्हाने, तांत्रिक अडचणी आणि मानसिक संघर्ष यांचा सामना केला. तैयबा म्हणते, “१०० तास एकट्याने उडणे भयावह होते. पण माझ्या मनात कधीच भीती आली नाही.”
जेव्हा ती उड्डाण करू लागली, तेव्हा तिची कहाणी चर्चेत आली. अनेकांनी तिचे कौतुक केले. पण काही कट्टरपंथी टीकाकार पुढे आले. त्यांनी सांगितले, मुस्लिम स्त्रीने पायलटचा गणवेश घालणे ‘हराम’ आहे, तिने बुरखा घालावा. तैयबाने शांतपणे आणि स्पष्टपणे उत्तर दिले, “कॉक्पिटमध्ये ड्रेस कोड नसतो. विमानाला याची पर्वा नसते की तुम्ही काय घातले आहे किंवा कोणत्या जाती-धर्मातून आलात.”
आज तैयबा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनली आहे. ती फक्त पायलट नाही, तर एक विचार आहे. हा विचार मुलींना प्रेरणा देत सांगतो साधने मर्यादित असली तरी स्वप्ने त्यावर अवलंबून नसतात. बिहारच्या छोट्या गावातून निघालेली तैयबा आकाशात पोहोचली आहे. आता ती इतरांना मार्ग दाखवते.
आता तैयबाचा पगार १,५०,००० रुपयेआहे. पण तैयबासाठी ही फक्त पैशाची बाब नाही. तिची खरी कमाई आहे ती ओळख. ही ओळख प्रत्येक मुस्लिम मुलीला मार्ग दाखवते, जिला समाज थांबवण्याचा प्रयत्न करतो. तैयबाची यशोगाथा त्यांना उत्तर देते, “या मुस्लिम मुलीला पाहा, ती विमान उडवू शकते.”
तैयबाच्या या उत्कर्षात तिच्या वडिलांचे योगदान अमूल्य आहे. ते स्वतः म्हणतात, “मी जमीन विकली, तर मुलीने आकाश विकत घेतले.” हे वाक्य त्यांच्या कहाणीचे सार आहे. आपल्या मुलींच्या स्वप्नांना घाबरणाऱ्या लाखो पालकांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. तैयबा त्या लाखो मुलींसाठी प्रेरणा आहे, ज्या समाजाच्या बंधनांना तोडून उंच भरारी घेऊ इच्छितात.
उंच आकाश ही मर्यादा नव्हे तर सुरुवात आहे, असा संदेश तैयबाची कहाणी देते. ही कहाणी त्या मातीतून सुरू झाली जिथे मुलींना स्वप्नांपेक्षा आधी घरगुती जबाबदाऱ्या शिकवल्या जातात. पण तैयबा अफरोजने सिद्ध करून दाखवले की हिम्मत असेल तर शेत विकले जाऊ शकते, पण स्वप्ने नाहीत.