बेळगावच्या मुस्लिम दांपत्याने पार पाडले लिंगायत पुत्राचे लग्नकार्य

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
डावीकडून महबूब हसन नाईकवाडी, सोमशेखर पुजेरी, पूनम आणि नूरजहान नाईकवाडी
डावीकडून महबूब हसन नाईकवाडी, सोमशेखर पुजेरी, पूनम आणि नूरजहान नाईकवाडी

 

बेळगाव

आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील बास्तवाडा गावातून माणुसकीचा एक देदीप्यमान अध्याय समोर आला आहे. येथील एक निवृत्त एसटी ड्रायव्हर महबूब हसन नाईकवाडी आणि त्यांच्या पत्नी नूरजहान यांनी २० वर्षांपूर्वी अनाथ झालेल्या दोन हिंदू मुलांना केवळ दत्तकच घेतले नाही, तर त्यांना स्वतःच्या पाच मुलांप्रमाणे वाढवून, शिकवून आता मोठ्या मुलाचे हिंदू लिंगायत परंपरेनुसार थाटामाटात लग्न लावून दिले आहे.

रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सोमशेखर पुजेरी आणि पूनम यांचा विवाह सोहळा पार पडला, तेव्हा संपूर्ण गाव भारावून गेले होते. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे वराचे वडील म्हणून ७० वर्षीय महबूब हसन पाहुण्यांचे स्वागत करत होते, तर आईच्या भूमिकेत नूरजहान मंगलकार्याचे नियोजन पाहत होत्या.

अनाथ मुलांसाठी 'देवदूत' बनले नाईकवाडी दांपत्य

या कथेची सुरुवात २० वर्षांपूर्वी झाली. सोमशेखरचे जैविक वडील शिवानंद पुजेरी हे खाजगी बस ड्रायव्हर होते आणि महबूब नाईकवाडी हे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात (KSRTC) चालक होते. हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे शेजारी होते. शिवानंद आणि त्यांच्या पत्नीचा एका रस्ते अपघातात अकाली मृत्यू झाला. त्यावेळी सोमशेखर अवघ्या ४ वर्षांचा आणि त्याचा धाकटा भाऊ वसंत केवळ २ वर्षांचा होता. या चिमुकल्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणताही जवळचा नातेवाईक पुढे आला नाही.

अशा कठीण प्रसंगी महबूब आणि नूरजहान यांनी पुढाकार घेतला. नाईकवाडी दांपत्याला स्वतःची पाच मुले (चार मुलगे आणि एक मुलगी) असतानाही त्यांनी या दोन अनाथ हिंदू मुलांना आपल्या घरात स्थान दिले. नूरजहान यांनी सोमशेखरच्या आईला मरण्यापूर्वी दिलेला शब्द पाळला, "तुझ्या मुलांची काळजी नको करू, मी त्यांना माझ्या पोटच्या पोरांसारखं वाढवीन."

शिक्षण, संस्कार आणि माणुसकीची शिकवण

गेल्या दोन दशकात नाईकवाडी कुटुंबात या मुलांवर कधीही कोणताही धार्मिक दबाव आणला गेला नाही. त्यांना त्यांच्या मूळ हिंदू धर्मातील सण-उत्सव साजरे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते. महबूब यांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. सोमशेखरने बीएससी (B.Sc) पूर्ण केले असून तो सध्या बेळगावमधील एका नामांकित एव्हीएशन कंपनीत नोकरीला आहे, तर धाकटा भाऊ वसंत यानेही आपले शिक्षण पूर्ण करून खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवली आहे.

जेव्हा सोमशेखर लग्नाच्या वयाचा झाला, तेव्हा नाईकवाडी दांपत्याने स्वतः पुढाकार घेऊन वधूचा शोध सुरू केला. महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील तणवाड गावातील पूनम हिच्याशी सोयरीक जुळली. वीरशैव लिंगायत समाजातील मुलीचे वडील आणि नातेवाईक जेव्हा स्थळ पाहायला आले, तेव्हा नाईकवाडी दांपत्याचे प्रेम पाहून तेही भारावून गेले.

लिंगायत पद्धतीने संपन्न झाला विवाह सोहळा

गावातील कडसिद्धेश्वर मंदिरात हा विवाह सोहळा हिंदू धर्मातील वीरशैव लिंगायत परंपरेनुसार पार पडला. लग्नाचे संपूर्ण नियोजन आणि खर्च नाईकवाडी कुटुंबाने आणि त्यांच्या मित्रपरिवाराने उचलला. यावेळी मुस्लिम समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू पाहुण्यांचे स्वागत करत होते.

या प्रसंगी बोलताना महबूब हसन म्हणाले, "मला वाटतं की सर्व माणसं सारखीच आहेत. ही दोन्ही मुलं आमच्या घरात आमच्या मुलांसारखीच वाढली. आज सोमशेखरचं लग्न लावताना मला तितकाच अभिमान वाटत आहे, जितका स्वतःच्या मुलाचं लग्न लावताना वाटला असता. मी हे काही खास काम केलं असं मला वाटत नाही, माझं कर्तव्य पार पाडलं याचं समाधान घेऊन मी या जगातून निरोप घेईन."

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवप्रभू वंतमुरी यांनी या दांपत्याचे कौतुक करताना म्हटले की, जिथे जातीय तणावाच्या बातम्या येत असतात, तिथे नाईकवाडी कुटुंबाने मांडलेला हा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. बास्तवाडा गाव आज या गोष्टीचा साक्षीदार बनले की, माणुसकीची नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही कितीतरी मोठी आणि घट्ट असू शकतात.

ही बातमी समोर आल्यावर हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी या अनोख्या नात्याचे भरभरून कौतुक केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या बातमीचे कात्रण शेअर करताना सज्जनार यांनी म्हणाले की, हे जात-धर्माच्या पलीकडे गेलेल्या माणुसकीचे एक उत्तम उदाहरण आहे. खरी मैत्री ही मित्राच्या मृत्यूने संपत नाही, तर ती जबाबदारी आणि प्रेमाच्या रूपाने कायम जिवंत राहते, असेही त्यांनी नमूद केले.

सज्जनार यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जात-पातीच्या पलीकडचे माणुसकीचे नाते! मित्राने हे जग सोडले असले तरी मैत्रीला कधीच मरण नसते, हेच महबूब आणि नूरजहान या दांपत्याने जगाला दाखवून दिले आहे. आपल्या अनाथ मित्राच्या मुलांचा २० वर्षे डोळ्यात तेल घालून सांभाळ तर केलाच, पण त्यांना मोठे करून लिंगायत परंपरेनुसार त्यांचे थाटामाटात लग्नही लावून दिले."

पोस्टमध्ये पुढे म्हटले की, "माणसांमध्ये प्रेम वाटण्यासाठी धर्म किंवा जात कधीच अडथळा ठरू शकत नाही, हे या दांपत्याने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. भारतीय संस्कृतीचा खरा मोठेपणा यातच आहे! चला, द्वेष सोडून असाच धार्मिक सलोखा आणि प्रेम आपण सर्वत्र पसरवूया. येणाऱ्या पिढीसमोर या दांपत्याचा आदर्श असायलाच हवा."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter