पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील पुन्नेवाल गावातून जातीय सलोख्याचे आणि माणुसकीचे एक अत्यंत सुंदर चित्र समोर आले आहे. येथील एका हिंदू पंडित कुटुंबाने गावातील मुस्लिम बांधवांना मस्जिद बांधण्यासाठी आपली जमीन भेट म्हणून दिली आहे. या जमिनीवर साकारलेल्या मस्जिदचे उद्घाटन रविवारी पंजाबचे शाही इमाम मौलाना मुहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांच्या हस्ते करण्यात आले. मस्जिदच्या या उद्घाटन सोहळ्यामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
मशिदीच्या उद्घाटनानिमित्त हिंदू, शीख आणि मुस्लिम असे सर्वच धर्मीय ग्रामस्थ एकत्र आले होते. मस्जिदत जेव्हा पहिल्यांदा अजान झाली आणि नमाज अदा करण्यात आला, तेव्हा संपूर्ण गावाने हा क्षण उत्सवासारखा साजरा केला. फुलांनी सजवलेल्या या मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज पढला, तर इतर धर्मीयांनीही आपापल्या पद्धतीने प्रार्थना केली. या घडामोडीने संपूर्ण समाजाला शांतता आणि एकतेचा एक मोठा संदेश दिला आहे.
याप्रसंगी बोलताना पंजाबचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी म्हणाले की, ही मशीद ना मुस्लिमांनी बांधली आहे, ना ती मुस्लिमांच्या जमिनीवर उभी आहे. आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दोन तरुणांकडे बोट दाखवत ते म्हणाले की, या मस्जिदसाठी लागणारी जमीन जपाल राम आणि अजय राम यांच्या कुटुंबाने दिली आहे.
पंजाबच्या परंपरेनुसार, मुस्लिम आणि हिंदू दोघेही शीख समुदायाला आपला मोठा भाऊ मानतात आणि म्हणूनच आज आपण सर्वजण येथे एकत्र आहोत. मस्जिदमध्ये येणारा प्रत्येक भाविक या पंडित कुटुंबाच्या महान कार्याबद्दल त्यांना आशीर्वाद देईल आणि मी स्वतः अल्लाहकडे या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रार्थना करेन, असेही त्यांनी नमूद केले.
जमीन दान करणारे पंडित जपाल राम आणि पंडित अजय कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गावात मशीद नसल्यामुळे मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी दुसऱ्या गावात जावे लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन आमच्या कुटुंबाने मस्जिदसाठी जमीन देण्याचा निर्णय घेतला. मस्जिदचे काम पूर्ण झाल्यामुळे गावाचा फायदा होईल आणि मुस्लिम बांधवांना एक मोठी सोय उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गावाचे सरपंच गोबिंद सिंह यांनी या पुढाकाराचे कौतुक करताना म्हटले की, मस्जिदसाठी जमीन दान करण्याचे हे पाऊल संपूर्ण परिसरासाठी एक सकारात्मक उदाहरण आहे. अशा कार्यांमुळे समाजात बंधुभाव अधिक दृढ होतो. शाही इमामांनी पुढे असेही सांगितले की, पंजाब ही गुरुनानक देवजींची भूमी असून येथे सर्व धर्माचे लोक एकमेकांच्या गरजांची आणि आनंदाची काळजी घेत आले आहेत. पुन्नेवाल गावाने आज या ऐतिहासिक वारशाला अधिक समृद्ध केले आहे. सोशल मीडियावर काही लोक द्वेष पसरवण्याचे काम करत असले, तरी पंजाबच्या मातीत द्वेषाला कोणतीही जागा नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -