ये तो ईद से भी बडी खुशी है!

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
मजुरांना वाचवणारे रॅट मायनर्स
मजुरांना वाचवणारे रॅट मायनर्स

 

उत्तराखंड येथील सिल्क्यारा बोगद्यात अडकलेले ४१ मजूर वेगवेगळ्या राज्यांतून तेथे मजुरीसाठी आले होते. खरे तर घरातील गरिबीच्या परिस्थितीने या मजुरांना इथवर ओढत आणले होते. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशासह देशातील विविध राज्यांतून त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्यासाठी उत्तराखंडला पोहोचले. विशेष म्हणजे, या बोगद्यात काम करणे धोकादायक आहे हे या मजुरांना माहीत असतानाही ते तेथे काम करत होते. कारण होते घरची गरिबीची आणि हलाखीची परिस्थिती! 

अत्याधुनिक विदेशी मशिन्स ठरल्या अपयशी, देशी 'रॅट मायनर्स'नी मिळवले यश  
मजुरांना बोगद्याच्या बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या सर्व बाजूंनी खोदकाम करण्यात येत होते, यामध्ये महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रॅट मायनर्सनी (हाताने खोदकाम करणारे तज्ज्ञ). ऑगर मशिनमध्ये बिघाड झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करण्याची जबाबदारी रॅट मायनर्सनी घेतली. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात देश-विदेशातील मोठमोठी मशिन्स अपयशी ठरत असताना, रॅट मायनर्सनी शर्थीचे प्रयत्न करत त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. सुरुवातीला ४८ मीटर खोदल्यानंतर बोगद्यात ऑगर मशिन अडकले. ते कापून बाहेर काढावे लागले. यानंतर रॅट मायनर्सकडे ही मोहीम सोपवण्यात आली. २६ तासांच्या कालावधीत त्यांनी ही मोहीम फत्ते केली.    

धोकादायक आहे रॅट-होल मायनिंग 
रॅट-होल मायनिंगला अवैज्ञानिक आणि धोकादायक व्यवसाय म्हणून भारतात बंदी आहे; परंतू तरीही काही भागात कोळशाच्या खाणीत हे काम सुरू असते. या भागात उपजीविकेचा एकमेव पर्याय म्हणून हे काम केले जाते. यात तीन ते चार फूट रुंद छोटे खड्डे खणून कोळसा काढला जातो. हलाखीच्या परिस्थितीमुळे बहुतेकदा कामगारांबरोबर त्यांची लहान मुलेही या कामाला येतात. 

४१ मजुरांचा जीव वाचवणारे देवदूत 
खरे तर या बोगद्यात अडकलेल्या सर्वच ४१ मजुरांची आणि त्यांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या १२ रॅट मायनर्सची काहीशी सारखीच परिस्थिती आहे. नव्हे, या सर्वांची एकच 'जात' आहे आणि ती म्हणजे गरिबी! हीच गरिबी या मजुरांना उत्तराखंडच्या बोगद्यापर्यंत खेचून घेऊन गेली. 

ता. ३० नोव्हेंबर रोजी या बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेची मोहीम फत्ते झाली. मोठ्या प्रयत्नानंतर त्यांना तब्बल १७ दिवसांनंतर बाहेर काढण्यात आलं. ता. १२ नोव्हेंबर रोजीस दिवाळीच्या दिवशी, ही घटना घडली होती. तेव्हापासून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अनेक पर्याय अपयशी झाल्यानंतर रॅट मायनर्सच्या टीमने ही मोहीम हाती घेतली. विशेष बाब म्हणजे, या १२ रॅट मायनर्सपैकी सात जण मुस्लिम आहेत. यात नासीर अहमद, मुन्ना कुरेशी, मोहम्मद ईर्शाद, वकील हसन खान, मोहम्मद रशीद, फिरोज कुरेशी या सहा रॅट मायनर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. अधिक जाणून घेऊया या मुस्लिम रॅट मायनर्सविषयी.     

'नायक नव्हे, आम्हाला माणूस म्हणून वागवा!'
जेव्हा मीडियाचे प्रतिनिधी बत्तीसवर्षीय नासीर अहमद यांच्याकडो त्यांची प्रतिक्रिया घ्यायला गेले तेव्हा ते कितीतरी वेळ आनंदात हसतच होते. त्यांच्या डोळ्यांत आसवे दाटली होती. अहमद म्हणाले, "मोहीम यशस्वी झाल्यावर मला घरून फोन आला. माझा भाऊ आणि वडील फोनवर तिकडून बोलत होते. ते म्हणाले, 'मोहीम यशस्वी झाल्याबद्दल घरात आनंद साजरा केला जातोय. तुझ्या आईने या खुशीत खीर बनवलीये.' "

अश्रू पुसत अहमद पुढे म्हणाले, “जेव्हा आम्ही अडकलेल्या मजुरांपासून काहीच मीटर दूर होतो तेव्हा आम्हाला त्यांचे आवाज ऐकू येत होते. 'आम्ही तुमच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत,' असे आम्ही त्यांना सांगितले. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो व 'तुम्ही सुरक्षित आहात' असं आम्ही त्यांना सांगताच ते आनंदाने रडू लागले. अर्ध्या तासानंतर 'एनडीआरएफ'चे लोकही बोगद्यात दाखल झाले आणि आम्ही त्या मजुरांना बाहेर काढण्यात यशस्वी झालो.” 

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर येथील मूळ रहिवासी असलेले नासीर यांचे कुटुंबीय गावी शेती करतात. "देशाकडून काय अपेक्षा आहेत?" असे विचारल्यावर ते म्हणाले, "मी फक्त माझे काम पूर्ण केले आहे.  लोकांनी मला नायक म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागवावे, एवढीच फक्त माझी इच्छा आहे."

'अब्बू, उन लोगों को बचाने के बाद ही घर आना!'
कमी ऑक्सिजनमध्ये प्रदीर्घ खोदकामानंतर बोगद्याचा शेवटचा भाग खोदण्याचे काम ज्या तेहतीसवर्षीय मुन्ना कुरेशी यांनी  केले ते कुरेशी म्हणाले, "आम्ही गेल्या २६ तासांपासून सतत काम करत होतो. जेव्हा मी बोगद्यातील शेवटचा दगड काढला आणि अडकलेल्या लोकांनी मला पाहिले तेव्हा त्यांचा आनंद बघून माझ्याही डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यांनी मला मिठी मारली. मी त्यांना बदाम खायला दिले. त्या मजुरांनी आमचे, पूर्ण टीमचे आभार मानले. त्यांनी मला दिलेला आदर मी आयुष्यभर विसरू शकत नाही." 

कुरेशी पुढे सांगतात, “जेव्हा मला थकल्यासारखो जाणवले तेव्हा माझ्या दहा वर्षांच्या मुलाचे, फैजचेस शब्द मला आठवले. मी या मोहिमेबद्दल घरी सांगितल्यावर तो मला म्हणाला होता 'अब्बू, उन लोगों को बचाने के बाद ही घर आना!” कुरेशी यांची गावी थोडीशी शेती आहे. कुटुंबाला पुरेल एवढाच गहू त्या शेतीत पिकतो. आर्थिक परिस्थितीमुळे कुरेशी शालेय शिक्षण घेऊ शकले नाहीत, त्यामुळे कुटुंबातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांना गेल्या १५ वर्षांपासून हा जोखमीच्या व्यवसाय करावा लागत आहे.

'बस इतनी ही मेरी ख्वा़हिश है!'
मूळचे मेरठचे असलेले पंचेचाळीसवर्षीय मोहम्मद इर्शाद म्हणाले, "एका बचावकार्यासाठी सिल्क्याराला चाललो आहे असे मी जेव्हा माझ्या घरी सांगितले  तेव्हा माझी पत्नी रडू लागली . कारण, या अशा बचावकार्यासाठी आम्ही एकदा गेलो तर परत येऊ की नाही याचीदेखील शाश्वती नसते." 

ईर्शाद २००१ पासून मायनर्सचे काम करत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे ईर्शाद यांना अद्याप स्वतःचे घर बांधता आलेले नाही. कारण, या कामातून तितका मोबदला त्यांना मिळत नाही. मात्र, आशावादी ईर्शाद पुढे सांगतात, "आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे; जेणेकरून त्यांना चांगली नोकरी मिळेल आणि त्यांना माझ्यासारखे धोकादायक काम करावं लागणार नाही...बस्, एवढीच माझी तळमळ आहे...इतकीच आता माझी इच्छा आहे." 

तुमच्याविषयी कृतज्ञ असलेल्या संपूर्ण "देशाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?" यावर  प्रश्वावर ईर्शाद म्हणतात : “इन्सान को इन्सान समझा जाए और देश में मोहब्बत बनी रहे, बस इतनी ही मेरी ख्व़ाहिश है!”

'इतनी खुशी तो ईद के दिन भी नही हुई!'  
जेव्हा ४१ कामगार सुखरूप बाहेर काढले गेले तेव्हा रॅट मायनर्सचे टीमलीडर वकील हसन खान त्यांना बघून म्हणाले, “इतनी खुशी तो ईद के दिन भी नही हुई थीं जितनी इन लोगो को सहीसलामत बाहर निकालकर हुई है!" 

खोदकामाच्या संघर्षाची आठवण करून देताना ते पुढे सांगतात, “उत्खननाच्या मार्गात मोठमोठे दगड, लोखंड, सळया, पाईप आणि गर्डर्स होते. हे सगळे साफ केल्यानंतर, पाईप ढकलण्यासाठी एक मार्ग तयार करण्यात आला. हा मार्ग तयार करण्याचे काम फार जोखमीचे होते. मात्र, कामगारांची सुटका होईपर्यंत माघारी फिरायचे नाही, असा  आम्ही निर्धार केला होता. हे मजूर आपल्या कुटुंबीयांबरोबर आनंदोत्सव साजरा करत आहेत याचा आनंद आहे."  

'मजदूरों को मजदूर भाइयों ने ही निकाला'
उत्तर प्रदेशच्या बागपत येथील मूळ रहिवासी असलेले पस्तीसवर्षीय मोहम्मद रशीद म्हणाले, “मजदूरों को मजदूर भाइयों ने ही निकाला!" "अवघड मोहीम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षित आहे?" असे त्यांना विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर विचार करण्याजोगे होते.

अवघ्या सातवी इयत्तेपर्यंतच शिक्षण पूर्ण करू शकणाऱ्या रशीद यांनी साध्याच; पण मूलगामी इच्छा व्यक्त केल्या आणि त्याही स्वतःसाठी नव्हे तर, समाजासाठी! रशीद म्हणाले, “प्रत्येक वृद्ध आईसाठी मुलाला पक्के घर बांधता यावे...गावात चांगले रस्ते असावेत...धार्मिक आणि जातीय रेषा ओलांडून आपापसावर प्रेम करण्याचे वातावरण असावे...माणसाला प्रतिष्ठेने जीवन जगता यावे...सर्व कामगारांना योग्य वेतन मिळावे... आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची सरकारने हमी द्यावी...”  

'...अशा घटना आपण टाळू शकतो.'
सिल्क्यारा येथील बोगदा कोसळण्याची पुनरावृत्ती पुन्हा कुठेही होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती फिरोज कुरेशी यांनी सरकारला केली. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही बोगद्याच्या आत पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून सगळ्यांना फार आनंद झाला. अडकलेल्या लोकांनी आम्हाला मिठी मारली आणि त्यांना वाचवण्यासाठी आल्याबद्दल आमचे आभार मानले. आपला देश बंधुभाव जपणारा देश आहे. त्यामुळे पुढेही जेव्हा जेव्हा माझ्या भावडांना माझी गरज भासेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्या मदतीला धावून जाईन. मात्र, अशा घटना आपण टाळू शकतो.”

आई-वडील, पत्नी आणि तीन मुले यांच्यासह उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात फिरोज वास्तव्यास आहेत. या बचावमोहिमेत दोन वरिष्ठ मुस्लिम अधिकारीही दिवसरात्र झटत होते. त्यापैकी एक 'नॅशनल हाय व्हिजिबिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड"चे व्यवस्थापकीय संचालक महमूद अहमद हे आहेत, तर दुसरे अधिकारी आहेत लष्कराचे माजी लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन. हसनैन आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आहेत.

माणसामाणसांत भेद न करणे, धर्माधर्मात भेद न करणे ही आपल्या भारत देशाची मूळ संस्कृती आहे. इथल्या साध्यासुध्या माणसाच्या रक्तात ही संस्कृती शतकानुशतके मुरलेली-भिनलेली आहे. ह्याच मानवतावादी संस्कृतीचे हृदयंगम दर्शन सिल्क्याऱ्याच्या घटनेतून अवघ्या देशाला घडलं! दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होण्यासाठी वरून कितीही प्रयत्न झाले तरी मातीशी जोडली गेलेली माणसं धर्माच्या भिंती ओलांडून एकमेकांच्या मदतीसाठी धावतात. सिल्क्यारा बोगद्यातील दुर्घटनेने ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे.   

- छाया काविरे ([email protected])