2017 ROAD ACCIDENT: रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची भरपाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

 

नवी दिल्ली 

दिल्ली उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना १ कोटी रुपयांहून अधिक तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांना ८४ लाख रुपयांहून अधिक नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायमूर्ती अनिश दयाल यांनी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने (MACT) सप्टेंबर २०२० मध्ये दिलेल्या नुकसान भरपाईच्या निर्णयावर सुनावणी करताना हा निकाल दिला. अपघातात मरण पावलेले दोन्ही विद्यार्थी नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होते.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी २०१७ मध्ये हे विद्यार्थी आपल्या एका मित्राच्या कारमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला होता. गाडी अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे ती रस्त्याच्या दुभाजकावरील रेलिंगला धडकली, ज्यात दोन्ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. न्यायालयात विमा कंपनीने भरपाई कमी करण्याची मागणी केली होती, तर दुसरीकडे मृतांच्या कुटुंबीयांनी भरपाई वाढवण्याची विनंती केली होती.

न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, चालक किंवा कार मालकाने अपघाताबाबत कोणतीही सबळ बाजू मांडली नाही. चालकाने दिलेले 'सूर्यप्रकाशामुळे संतुलन बिघडले' हे कारण न्यायालयाने फेटाळून लावले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आणि त्यांच्या संभाव्य उत्पन्नाचा विचार करून, न्यायालयाने नुकसान भरपाईची रक्कम वाढवली. यासोबतच, अपघाताला नऊ वर्षे उलटल्यामुळे मूळ भरपाईवर ९ टक्के तर वाढीव भरपाईवर ६.७५ टक्के दराने व्याज देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.