भक्ती चाळक
मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक मागासलेपणाला आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कारणे आहेत. मुस्लिम समाजातील मुलांसाठी शिक्षणातील अडथळा म्हणजे दारिद्र्य! देशात शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतरही मुस्लिम समाजातील हजारो मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत.
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या सच्चर समिती, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मोहम्मदूर रहमान समिती, रंगनाथ मिश्रा आयोग अशा सर्वांच्या अभ्यासातून एकच बाब वारंवार अधोरेखित झाली ती हीच की शिक्षणामध्ये मुस्लिमांचे मागासलेपण प्रचंड आहे. मुस्लिम समाजातील मुलांचा ड्रॉप आउट रेट सर्वाधिक आहे. सच्चर समितीनुसार मुस्लिम समाजातील केवळ १.३% मुले पदवीपर्यंत पोहोचतात.
मुस्लिम कुटुंबातील आर्थिक स्थिती आणि अशिक्षितपणा मुलांच्या शिक्षणातील मोठी अडचण ठरत आहे. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील कोंढवा या मुस्लीमबहुल भागातील दोन उच्चशिक्षित मैत्रिणींनी एकत्र येत २०१६ मध्ये 'फ्यूचर फाऊंडेशन' या संस्थेची स्थापन केली. मुस्लीम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मागासलेपण दूर करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या कामाला सुरुवात झाली.
समिना शेख आणि शबाना कॉन्ट्रॅक्टर या दोघी मैत्रिणी अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. या समस्यांची तीव्रता लक्षात घेऊन अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी कृतीकार्यक्रम राबवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
याचाच भाग म्हणून त्यांनी मुस्लीम समाजात सर्वेक्षण केले आणि त्यांच्या लक्षात आले की घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. ड्रॉप आउट रेट सर्वाधिक असण्यामागे देखील हेच कारण होते. या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मग समीना आणि शबाना यांनी स्थापना केली फ्यूचर फाऊंडेशनची.
संस्थेच्या सुरुवातीविषयी समिना शेख म्हणतात, “आम्ही कोंढव्यातील मोहल्ल्यांमध्ये फिरलो. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आम्ही भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद केल्यावर विद्यार्थ्यांच्या शाळा सोडण्यामागचे कारण आमच्या लक्षात आले. आर्थिक पाठबळ नसल्यामुळे नाईलाजाने अनेकांना शाळा सोडावी लागत होती. त्यावर तातडीची उपाययोजना म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तर केलीच, मात्र त्यांच्या पालकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल यावर आम्ही अधिक भर दिला. ”
मुस्लिम कुटुंबांची आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज समीना बोलून दाखवतात. त्या म्हणतात, “मुस्लिम कुटुंबातील अनेक पालकांना शाश्वत रोजगार नसतो. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांमध्ये कायमच आर्थिक अस्थिरता असते. ती दूर व्हावी म्हणून मुलांनाही लवकर कमावते व्हावे लागते. त्यामुळे मुस्लिम मुलांमध्ये बालमजुरी प्रमाण अधिक आहे. उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही कुटुंबांना चांगला रोजगार देण्याला प्राधान्य दिले.”
फाऊंडेशनच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना मिळते रोजगाराची संधी
बहुतेकदा कुटुंबाची आर्थिक जबाबदारी नवऱ्यावर असते. पण महिलाही कमावत्या झाल्या तर आपसूकच कुटुंबात आर्थिक स्थिरता येते. कुटुंबातील महिला सर्वांगीणदृष्ट्या सक्षम असेल तर ती सर्वांचा सांभाळ करू शकते असे समिना यांचे म्हणणे आहे. हीच बाब लक्षात घेऊन समिना आणि शबाना यांनी मुस्लीम महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कंबर कसली. बहुतांश ठिकाणी मुस्लीम महिलांना रोजगारासाठी घराबाहेर काढणे आव्हानात्मक होते. मात्र दोघींनीही हे आव्हान लिलया पेलले.
मध्यम वयातील बहुतांश मुस्लिम स्त्रिया या उच्चशिक्षित नसतात. अशावेळी त्यांच्या हाताला काय काम द्यावे, हा प्रश्न होताच. फ्युचर फाऊंडेशनने त्यावरही उपाय शोधला. आजूबाजूच्या परिसरातील घरकामे, कुटिरोद्योग, शिवणकाम, सुरक्षा विभागातील कामे असे रोजगार उपलब्ध करून देत त्यांनी या महिलांची आर्थिक घडी बसवण्यात त्यांना यश आले.
मात्र ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थती अगदीच हलाखीची आहे, आणि उत्पन्नाचे आर्थिक स्रोतही नाहीत अशा कुटुंबांना फाऊंडेशनच्या माध्यमातून महिन्याचा किराणा पुरवला जातो.
महिलांसाठी ‘निवारा गृह’
अनेक महिलांना बऱ्याचदा कौटुंबिक अडचणींना, हिंसाचाराला तोंड द्यावे लागते. आर्थिक पाठबळ आणि निवारा नसल्यामुळे या महिलांना अत्यचार करणाऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते. परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर अनेक महिला शेवटचा पर्याय म्हणून घराबाहेरही पडतात. एकेबाजुला निवाऱ्याची अनिश्चितता असतानाच बरेचदा तिला एकटीला मुलांचा सांभाळ करावा लागतो. या संकटकाळात त्या महिलेला खरी गरज असते ती सुरक्षित अशा हक्काच्या निवाऱ्याची. हीच बाब लक्षात घेऊन फ्यूचर फाऊंडेशनने अशा महिलांसाठी मोफत निवाऱ्याचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत या महिला त्याठिकाणी मुलांसहित आश्रय घेऊ शकतात.
मुस्लीम महिलांच्या रोजगाराकडेही पुरवले जाते लक्ष
मुस्लिम समाजातील तरुण-तरुणींना उच्चशिक्षण मिळावे, त्यांच्यासाठी परदेशी शिक्षणाचे दरवाजे उघडे व्हावेत, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी फ्यूचर फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. अल्पसंख्यक समाजासाठी असलेल्या शिष्यवृत्त्या गरजूंना मिळाव्यात यासाठी संस्थेकडून जनजागृती मोहिमा आणि शिबिरेही घेतली जातात. शिक्षित तरुण उद्योगधंद्यांत पुढे यावा यासाठीही संस्थेकडून विविध उपक्रम राबवले जातात.
समिना आणि शबाना फ्यूचर फाऊंडेशनच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला भेडसावणाऱ्या एका मोठ्या प्रश्नावर कृतीशील उपाययोजना करत आहेत. त्यासाठी शिक्षणाच्या प्रश्नाच्या आड येणारे सर्व अडथळे आर्थिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून दूर करता येईल असा त्यांना विश्वास आहेच, परंतु त्यांनी आपल्या कृतीतून दाखवूनही दिले आहे. समिना आणि शबाना यांच्या मेहनतीला, त्यांच्या कृतीशील समाजसेवेला ‘आवाज मराठी’चा सलाम, आणि फ्यूचर फाऊंडेशनच्या भविष्यातील उपक्रमांना शुभेच्छा!
भक्ती चाळक