रोहतासच्या डोंगरात माणुसकीचा जागर! हिंदूंनी केला ५०० वर्षे जुन्या मस्जिदचा जीर्णोद्धार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
रोहतासगड किल्ल्याजवळ असलेली मुगलकालीन जामा मस्जिद
रोहतासगड किल्ल्याजवळ असलेली मुगलकालीन जामा मस्जिद

 

नौशाद अख्तर

बिहारमधील रोहतासच्या डोंगररांगांमध्ये सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचा सूर निनादतो आहे. ५०० वर्षे जुन्या मुगलकालीन जामा मस्जिदला आपला वारसा मानत दोन्ही समाजांनी तिच्या जीर्णोद्धारासाठी हात मिळवले आहेत.

रोहतास येथील चौरसन शिव मंदिर समितीचे अध्यक्ष कृष्णा सिंह यादव या जीर्णोद्धार मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. या उपक्रमात मुस्लिम बांधवांचेही योगदान आहे, तरीही हिंदू समाजाची भूमिका आणि सहभाग यात अधिक उठून दिसत आहे.

ही मस्जिद रोहतासगड किल्ल्याजवळ वसलेली आहे. मुगल बादशाह अकबराच्या काळात, म्हणजेच इ.स. १५७८ मध्ये हंस खान यांनी या वास्तूची उभारणी केली होती. रोहतास जिल्ह्यातील चौरसन गावातील शिव मंदिरापासून या मोहिमेची सुरुवात झाली. तिथे गावकऱ्यांनी आधी प्राचीन शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मंदिराच्या कामादरम्यान, कृष्णा सिंह यादव यांनी गावकऱ्यांसमोर एक विचार मांडला. आपण सर्वांनी मिळून त्या विशिष्ट मस्जिदच्या दुरुस्तीचे कामही हाती घ्यावे, असा तो प्रस्ताव होता. लवकरच मस्जिदची साफसफाई करण्याची व्यवस्था करण्यात आली आणि अनधिकृत व्यक्तींना आवारात येण्यास मनाई करण्यात आली. ही मस्जिद अत्यंत जीर्ण आणि पडक्या अवस्थेत होती. लोक तिचा वापर किरकोळ कामांसाठी करत होते.
 

या ऐतिहासिक मस्जिदच्या जीर्णोद्धारात हिंदू बांधवांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. या मस्जिदच्या दुरुस्तीतून जातीय सलोख्याचा संदेश जातो, असे कृष्णा सिंह यादव यांचे मत आहे. "धर्म कोणताही असो, हा आपला सामायिक वारसा आहे. आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याची जबाबदारी आपण पार पाडलीच पाहिजे," असे ते म्हणतात.

मुस्लिम बांधवही या कामात सक्रिय आहेत. मात्र, हिंदूंची संख्या जास्त असल्याने या प्रकल्पाचे नेतृत्व त्यांच्याकडेच आहे. ही ५०० वर्षे जुनी मस्जिद मुगल बादशाह अकबराच्या काळात बांधली गेली होती. अकबराचे विश्वासू सहकारी हंस खान यांनी तिची उभारणी केली होती. रोहतासगड किल्ल्याच्या गाझी दरवाजा परिसरात असलेली ही वास्तू काळाच्या ओघात उध्वस्त झाली होती.

पूर्वी या जागेचा वापर गुरांचा गोठा म्हणून केला जात असे. या वास्तूच्या देखभालीसाठी याआधी कोणतेही विशेष प्रयत्न झाले नव्हते. मस्जिदची साफसफाई करणाऱ्यांमध्ये बहुतांश लोक हिंदू आहेत.
 

रोहतासचा इतिहास केवळ या मस्जिदपुरता मर्यादित नाही. हा भाग ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. रोहतासगड किल्ला आणि आजूबाजूच्या कैमूर डोंगररांगा प्राचीन संस्कृतींच्या साक्षीदार आहेत. या डोंगरांमध्ये प्राचीन चित्रे आणि शिलालेख सापडले असून, त्यावरून या भागाचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होते.

प्राचीन काळापासून कैमूरच्या टेकड्या मानवी हालचालींचे केंद्र राहिल्या आहेत. येथे इ.स. पूर्व १०,००० वर्षांपूर्वीची खडकांमधील आश्रयस्थाने (रॉक शेल्टर्स) आढळतात. तसेच, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक अवशेष सापडल्याने या भागाचा ऐतिहासिक वारसा अधिक संपन्न झाला आहे. या टेकड्यांना लष्करी आणि धोरणात्मक महत्त्वही होते. बादशाह शेरशाह सुरी यांचा मार्ग याच भागातून जात असे आणि हा प्रदेश त्यांच्या राजवटीचा भाग होता.

ही घटना बिहारमधील रोहतासमध्ये हिंदू-मुस्लिम एकता आणि जातीय सलोख्याचे एक अनोखे उदाहरण सादर करते. जेव्हा लोक धर्माच्या पलीकडे जाऊन आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याची जबाबदारी उचलतात, तेव्हा समाजात एकता आणि बंधुभावाचे दर्शन घडते, हेच यातून सिद्ध होते. कृष्णा सिंह यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न हे जातीय सलोखा आणि आपल्या वारशाबद्दलचा अभिमान याचे एक जिवंत उदाहरण आहे. 

स्थानिक लोकांनी ही मोहीम वाढवण्याचा आणि डोंगरातील इतर वारसा स्थळांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृष्णा सिंह यादव यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, "आमच्या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात आम्ही रोहतासच्या डोंगरातील इतर प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनावर काम करणार आहोत. स्थानिक लोकांनी आपला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा वाचवण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत."
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter