‘मस्जिद परिचय’ सारखे उपक्रम समाजासाठी दिशादर्शक - उदयनराजे भोसले

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 3 Months ago
‘मस्जिद परिचय’ उपक्रमात सहभागी उदयनराजे भोसले व इतर मान्यवर.
‘मस्जिद परिचय’ उपक्रमात सहभागी उदयनराजे भोसले व इतर मान्यवर.

 

भिन्नधर्मीय समाजांमध्ये परस्परांविषयी असलेला अविश्वास कमी व्हावा, त्यांच्यामध्ये स्‍नेहभाव वाढीस लागावा यासाठी सातारा येथे नुकतेच 'मस्जिद परिचय' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील सातारा बैतुलमाल कमिटीच्‍यावतीने शाही मस्जिदमध्‍ये आयोजित केलेल्‍या मस्जिद परिचय उपक्रमास विविधधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इस्लामविषयी आणि मस्जिदमध्ये होणाऱ्या उपासनेविषयी म्हणजेच नमाजविषयी उपस्थितांनी यावेळी माहिती घेतली. यावेळी आयोजकांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांची जिज्ञासा शमवण्याचा प्रयत्न केला.   

सकाळी दहा वाजता या उपक्रमास सुरुवात झाली. याठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे स्‍वागत करत त्‍यांना मस्जिदची ठेवण, त्‍याठिकाणी होणाऱ्या नित्‍यक्रमाची माहिती देण्‍यात येत होती. पुणे येथून आलेले इम्तिया़ज शेख आणि करीमुद्दीन शेख यांनी या कार्यक्रमात अ़जानचा अर्थ, मस्जिदचे सामाजिक महत्त्व, तिथे कशा पद्धतीने प्रार्थना केली जाते, त्याचे अध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या महत्त्व व मस्जिदच्या विविध भागांची माहिती दिली. 

उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी उदयनराजे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व-धर्म-समभावची संकल्पना मांडली. आचरणात आणली आणि ती समाज मनात खोलवर रुजवली. एक तो काळ होता जेव्हा समाज हे एक कुटुंब होतं; परंतु अलिकडे लोकांना समाजाचं हीत जोपासावं असं मुळीच वाटत नाही. ‘मस्जिद परिचय’ हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरक ठरेल."  


या उपक्रमाचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, "जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. मात्र, आज जर कोणी जाती-पातीच्या जोखडात अडकला तर या देशाचे तुकडे व्हायला फार वेळ लागणार नाही. मी कोणत्याही प्रार्थनास्थळात गेल्यानंतर एवढीच अपेक्षा करतो, प्रार्थना करतो की व्यक्तीकेंद्री झालेल्या मंडळींना देव सुबुद्धी देवो. 'मस्जिद परिचय' हा कार्यक्रम घेण्यामागेदेखील हाच हेतू आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शाही मस्जिद कमिटीचे मी आभार मानतो. असे कार्यक्रम सातत्याने आयोजित करावेत."

कार्यक्रमाचे आयोजक हाजी शकील हारुण शेख आयोजनाविषयी म्हणाले, "आपला देश हा विविध जाती, धर्माचा देश आहे. सांप्रदायिक सद्भावना जोपासण्यासाठी सर्व धर्मांची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा येथे 'मस्जिद परिचय' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मस्जिदीविषयी नागरिकांना अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करता आले."   

या उपक्रमाअंतर्गत मस्जिदला भेट देणारे सडेकर यांनी त्यांच्या अनुभवांविषयी उत्साहाने माहिती दिली. ते म्हणाले, "आज शाही मस्जिद सातारा येथे भेट दिली. आयोजकांकडून इस्लाम धर्माची उत्तम माहिती मिळाली. आयोजकांसोबत इस्लाम धर्म, कुराण, तीन तलाख, जिहाद, एकापेक्षा जास्त लग्ने, ईदला बकरीची कुर्बानी, स्वयंपाक करण्याची त्यांची पद्धत, एकाच ताटात जेवण्याची पद्धत, इस्लाममधील जाती, महिला घालत असलेला बुरखा, मदरशामधील शिक्षण, दाढी वाढवणे, पठाणी कपडे घालणे यांसारख्या सर्वसामान्य हिंदूंच्या मनात असलेल्या प्रश्नांवर मनमोकळी आणि सविस्तर चर्चा केली. अशाच कार्यक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी झाले पाहिजे जेणेकरून गैरसमज दूर होतील आणि परस्परांविषयी विश्वास वाढेल."   

तर, कार्यक्रमात उपस्थित उमेश झोडे म्हणाले, "मस्जिदमध्ये काय चालतं, प्रार्थना कशासाठी केली जाते, अशा विविध प्रश्नांची उत्तरे 'मस्जिद परिचय' या कार्यक्रमातून मिळाली. मस्जिदमध्ये महिलांना प्रवेश नसतो, इतर धर्मीय मस्जिदित येऊ शकत नाही, असे जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. मस्जिदबद्दलचे आमचे गैरसमज दूर झाले असून आमच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे कार्यक्रम गावागावात आयोजित करून मस्जिदीची माहिती द्यावी."


साताऱ्यात सलोखा कायम : शिवेंद्रसिंहराजे
साताऱ्यातील हिंदू - मुस्लीम बांधवांनी कायमच एकोपा जपला असून, ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. मस्जिद म्हणजे काय, नमाज का अदा केली जाते, यासंह अनेक प्रश्नांची माहिती मस्जिद परिचय या उपक्रमामुळे अवगत झाली, असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.

या उपक्रमात अनेक सातारकरांनी सहभाग नोंदवत माहिती जाणून घेतली. हा उपक्रम आयोजित केल्‍याबद्दल नागरिकांनी यावेळी बैतुलमाल कमिटी तसेच मुस्लिम बांधवांचे आभार मानले.
 
काय आहे 'बैतुलमाल कमिटी'
सातारा बैतुलमाल कमिटीची स्थापना २०१९ मध्ये झाली. बैतुलमाल ही इस्लामिक धार्मिक संकल्पना आहे. बैतुलमाल म्हणजे मदतनिधी उभारणारी संस्था. कोरोना काळात नागरिकांची मदत करता यावी या उद्देशाने सुरु झालेली हि संस्था सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आजही काम करते. साताऱ्यातील जवळपास ३०० गरजू लोकांना अन्न पुरवण्याचे काम आजही संस्थेच्या माध्यमातून होत आहे. लोकांना योग्य उपचार मिळावा यासाठी आरोग्यविषयक मदतही बैतुलमाल कमिटी करत असते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter