मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यातून सशस्त्र गटांनी अपहरण केलेल्या सर्व १४ कुकी नागरिकांची तब्बल एका महिन्यानंतर मंगळवारी सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. राज्यातील विविध वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर या ओलिसांची सुरक्षित सुटका हे एक सकारात्मक आणि मानवतावादी पाऊल असल्याचे सांगत मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंग यांनी याचे स्वागत केले आहे. तसेच राज्यातील सर्व घटकांनी आता सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा त्याग करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कांगपोकपी जिल्ह्यात तीन चर्च नेत्यांच्या हत्येनंतर गेल्या महिन्यात या १४ लोकांचे अपहरण करण्यात आले होते. मणिपूरमधील नागा समुदायाची सर्वोच्च संस्था असलेल्या 'युनायटेड नागा कौन्सिल' (UNC) आणि सेनापती जिल्ह्यातील इतर सामाजिक संघटनांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मध्यस्थीमुळे ही सुटका यशस्वी झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या उपस्थितीत सर्व १४ जणांना सेनापती जिल्हा मुख्यालयात सुखरूप सोडण्यात आले.
केंद्र सरकार आणि नागा कौन्सिलचा पुढाकार
युनायटेड नागा कौन्सिलचे अध्यक्ष एनजी लोर्हो यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकार, चर्च संस्था आणि सर्वोच्च आदिवासी संघटनांनी केलेल्या आवाहनानंतर ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. नागा हे सुसंस्कृत लोक असून आम्ही मानवी हक्कांचा आदर करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रियो यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या आश्वासनाचाही आम्ही विचार केला, ज्यामध्ये त्यांनी बेपत्ता असलेल्या सहा नागा पुरुषांचा शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे.
गेल्या १३ मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यात तीन चर्च नेत्यांची दबा धरून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर काही तासांतच कांगपोकपी आणि सेनापती जिल्ह्यातून सशस्त्र गटांनी ५० हून अधिक लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. यापैकी ३१ जणांची यापूर्वीच सुटका करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोन्साखुल गावातील १२ नागा महिला आणि कांगपोकपी जिल्ह्यातील १६ कुकी नागरिकांचा समावेश होता. याशिवाय दोन सेल्सियन ब्रदर्सनाही यापूर्वी सोडण्यात आले आहे. मात्र, अद्याप सहा नागा पुरुष अद्यापही ओलीस असून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
मुख्यमंत्री आणि नागा समाजाकडून सलोख्याचा संदेश
सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर युनायटेड नागा कौन्सिलने सर्व १४ कुकी नागरिकांची सुरक्षित सुटका सुनिश्चित केली आणि त्यांना जिल्हा प्रशासन, पोलीस आणि सुरक्षा दलांच्या स्वाधीन केले. सुटका करण्यात आलेल्यांपैकी एक असलेल्या ताफू कुकी गावातील पावतीनकाई चोंगलोई याने सांगितले की, आम्हाला नागा व्हिलेज गार्डच्या देखरेखीखाली २७ दिवस ठेवण्यात आले होते. तिथल्या लोकांनी आमच्याशी चांगली वागणूक दिली आणि आम्हाला चांगले अन्न पुरवले.
मुख्यमंत्र्यांनी ओलिसांची सुरक्षित सुटका करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल नागा समाजाचे मनापासून कौतुक केले असून हे कृत्य कारुण्य, जबाबदारी आणि मानवी जीवनाविषयीची चिंता दर्शवणारे आहे, असे म्हटले आहे. सध्याच्या संकटामुळे पीडित आणि त्यांच्या कुटुंबांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे, असे सांगत सिंह यांनी दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले.
मणिपूरमध्ये गेली तीन वर्षे वांशिक हिंसाचाराचे सावट आहे. मे २०२३ पासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या वांशिक संघर्षामध्ये आतापर्यंत किमान २६० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. सततच्या संघर्षामुळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, जी एका वर्षानंतर ४ फेब्रुवारी रोजी उठवण्यात आली.