नोकरीचा त्याग करून लाल मोहम्मद बादशाह बनले गंगारक्षक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 21 h ago
लाल मोहम्मद बादशाह आणि कानपूरचा गंगाघाट
लाल मोहम्मद बादशाह आणि कानपूरचा गंगाघाट

 

मलिक असगर हाशमी, नवी दिल्ली

सध्याच्या काळात समाजात द्वेष आणि धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधून मानवतेची मान गर्वाने उंचावणारी सत्य घटना समोर आली आहे. ही कहाणी गंगेचे रक्षणकर्ते लाल मोहम्मद बादशाह यांची आहे. गंगामातेची निस्वार्थ सेवा करण्यासाठी त्यांनी आपल्या चांगल्या सरकारी नोकरीवर पाणी सोडले. तसेच त्यांनी पायात चप्पल घालणेसुद्धा पूर्णपणे सोडून दिले आहे. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा संकल्प केला आहे.

गेल्या पस्तीस वर्षांपासून लाल मोहम्मद बादशाह हे कानपूरजवळच्या बिठूर या ऐतिहासिक आणि धार्मिक शहरात रात्रंदिवस गंगेची सेवा करत आहेत. आजकाल लोक धर्माच्या नावावर एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करतात. पण लाल मोहम्मद बादशाह यांनी मात्र धर्माच्या भिंती तोडून पर्यावरण रक्षण आणि परस्पर बंधुभावाचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. त्यांच्या या कार्याची चर्चा आज सोशल मीडियासह देशाच्या कानाकोपऱ्यात होत आहे.

बिठूरची पावन भूमी आणि लाल मोहम्मद यांचा ठाम संकल्प

धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून विचार केल्यास बिठूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सनातन धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्रीरामाची मुलं लव आणि कुश यांचा जन्म याच पावन भूमीवर झाला होता. आदिकवी महर्षी वाल्मिकींनी रामायण या अमर ग्रंथाची रचनादेखील याच ठिकाणी केली होती. आजही सीतामातेचं स्वयंपाकघर बिठूरमध्ये पाहायला मिळतं. हे पाहण्यासाठी देश-विदेशातून अनेक पर्यटक तिथे आवर्जून येतात. गंगा नदीच्या तब्बल बावन्न घाटांनी वेढलेल्या या पवित्र भागात वर्षभर भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. याच पावन भूमीला लाल मोहम्मद बादशाह यांनी भक्तीचं आणि कर्माचं मुख्य केंद्र बनवलं आहे.

स्वतःची कहाणी सांगताना लाल मोहम्मद यांनी 'आवाज द व्हॉइस'ला माहिती दिली. ते पूर्वी एका सरकारी खत कारखान्यात चांगली नोकरी करत होते. त्यांचं आयुष्य अगदी सुरक्षित आणि सुखासीन चालू होतं. पण त्यांच्या मनात गंगामातेविषयी ओढ आणि अपार श्रद्धा निर्माण झाली. या श्रद्धेपोटीच त्यांनी त्या सरकारी नोकरीला कायमचा रामराम ठोकला. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि तिच्या रक्षणासाठी वाहून घेतलं.

गंगा सुरक्षा दलाची स्थापना आणि विनादेणगी सेवा

गंगेची स्वच्छता अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी लाल मोहम्मद बादशाह यांनी आपल्या आठ-दहा स्थानिक मित्रांना सोबत घेतलं. यातूनच त्यांनी 'गंगा सुरक्षा दल' नावाची एक खास टीम बनवली आहे. दर रविवारी त्यांच्याच नेतृत्वाखाली गंगेच्या वेगवेगळ्या घाटांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते, असं ते सांगतात. त्यांच्या या निस्वार्थ कामाचा प्रभाव मोठा आहे. यामुळेच शेजारच्या उन्नाव जिल्ह्यातूनही अनेक लोक दर रविवारी बिठूरमध्ये येतात आणि या स्वच्छता मोहिमेत स्वतःच्या इच्छेने सहभागी होतात.

नदीतून फक्त प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढणं याबरोबरच बिठूरच्या सर्व बावन्न घाटांवरच्या माशांच्या संरक्षणाची मोठी जबाबदारीही ते चोखपणे पार पाडतात. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या शिकाऱ्यांवर ते सतत बारीक लक्ष ठेवून असतात आणि नदीतल्या जलचरांचे प्राण वाचवतात. या संपूर्ण मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे, लाल मोहम्मद बादशाह किंवा त्यांची संस्था यासाठी कोणाकडूनही एक रुपयाची देणगी घेत नाही. कोणत्याही सरकारी विभागाकडूनही ते मदत घेत नाहीत. ते पूर्णपणे स्वावलंबी बनून स्वतःच्या हिमतीवर हे काम करत आहेत.

पाच वेळेची नमाज, मुस्लीम ओळख आणि 'गंगा मैया की जय'

पंचेचाळीस वर्षांचे लाल मोहम्मद बादशाह आपल्या धार्मिक ओळखीबाबत एकदम ठाम आहेत. ते नेहमी डोक्यावर पारंपरिक मुस्लीम टोपी घालतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर लांब दाढी असते. ते सच्चे आणि दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणारे पक्के मुस्लीम आहेत. आधी ते जवळच्याच एका मस्जिदीमध्ये राहायचे. पण आता त्यांनी स्वतःचं वेगळं घर बांधलं आहे. सरकारी नोकरी सोडल्यामुळे छोट्याशा बोटीवरच त्यांच्या आयुष्याचा आणि उदरनिर्वाहाचा गाडा चालतो.

पर्यटकांना सोयीचं पडावं म्हणून त्यांनी स्वतःच्या बोटीवर उशा आणि गाद्यांची सोय केली आहे. बिठूरमध्ये भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना ते याच बोटीतून गंगेची सफर घडवून आणतात. या बोटीच्या सफरीतून त्यांना जे काही थोडेफार पैसे मिळतात, त्यातूनच ते स्वतःचं पोट भरतात. शिवाय या मोहिमेचा सगळा खर्चही ते यातूनच भागवतात. लाल मोहम्मद यांची आणखी एक रंजक गोष्ट इथे सांगण्यासारखी आहे. ते एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी माणसाला भेटतात, तेव्हा ते नेहमी 'गंगा मैया की जय' बोलूनच त्याला अभिवादन करतात.

समाजाचा सुरुवातीचा विरोध आणि आताची परिस्थिती

हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला पवित्र आणि पूजनीय मातेचा दर्जा दिलेला आहे. दुसरीकडे, सामान्य मुस्लीम समाजात मात्र गंगेकडे केवळ एक नदी म्हणूनच पाहिलं जातं. मग लाल मोहम्मद यांनी जेव्हा गंगेचं रक्षण करण्याचा संकल्प सोडला, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या समाजाची यावर नेमकी काय प्रतिक्रिया होती? 'आवाज द व्हॉइस'ने विचारलेल्या या प्रश्नावर लाल मोहम्मद शांतपणे आणि प्रगल्भतेने उत्तर देतात, “ही पूर्णपणे वैयक्तिक श्रद्धा आणि आतल्या ओढीची गोष्ट आहे. माझं गंगेसोबत आत्मिक आणि रूहानी नातं जोडलं गेलं आहे.”

ते अगदी मनमोकळेपणाने मान्य करतात की, “सुरुवातीच्या काळात माझ्या भागातल्या मुस्लीम समाजाची या कामाबद्दलची प्रतिक्रिया अजिबात चांगली नव्हती. लोक माझ्यावर निरनिराळ्या प्रकारे टीका करायचे आणि अनेक प्रश्न उपस्थित करायचे. पण जसजसा काळ पुढे गेला, तसतशी लोकांनी माझी निस्वार्थ सेवा, प्रामाणिकपणा आणि कामातलं समर्पण पाहिलं. त्यानंतर मात्र समाजाची विचारसरणी पूर्णपणे बदलून गेली. आजच्या घडीला बिठूरमधला लहानातला लहान मुलगाही माझ्याकडे आदराने आणि सन्मानाने पाहतो.”

सोशल मीडियावर मोठी चर्चा: लोकांनी दिले 'बादशहांचे बादशहा' हे नाव

गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये देशात सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. तेव्हापासूनच लाल मोहम्मद बादशाह यांची ही गोष्ट इंटरनेटवर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. त्यांच्या या अनोख्या भक्तीचं आणि सेवेच्या भावनेचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. फेसबुक आणि यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

एफ. एस. परमार नावाच्या एका युजरने अतिशय सुंदर प्रतिक्रिया दिली आहे, “जो गंगेचा खरा सेवक आहे, तोच खऱ्या अर्थाने बादशहांचाही बादशहा आहे.” तर मनोज कुमार नावाचा युजर म्हणतो की, “शरीर पाण्याने, मन सत्याने, बुद्धी ज्ञानाने आणि आपला आत्मा हा धर्माने पवित्र होतो.” आशिष शर्मा यांनी लिहिलं आहे की, “आईच्या भक्तीमध्येच खरी ताकद असते. यामुळे माणसाचे वर्तन पूर्णपणे सात्विक बनते.” राजेंद्र चौहान यांनी तर लाल मोहम्मद यांना मनाने आणि कर्माने, अशा दोन्ही बाजूंनी बादशहा ठरवले आहे.

बकरे रजत नावाच्या युजरने त्यांच्यासाठी खास प्रार्थना केली आहे. अल्लाह त्यांना दीर्घायुष्य देवो आणि गंगामाता त्यांना नेहमी स्वतःजवळ सुरक्षित ठेवो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पंकज थपलियाल यांच्या मते, गंगा हा मुळात कोणताही धार्मिक मुद्दा नाहीच. ती प्रत्येक माणसाच्या आयुष्यासाठी जीवनदायिनी नदी आहे. सुनीता कुमारी यांनी लाल मोहम्मद यांची तुलना थेट इतिहासातल्या रसखान आणि रहीम यांसारख्या महान कवींसोबत केली आहे. हे कवी मुस्लीम असूनही भगवान श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते.

हे खरे आहे की काही लोक सोशल मीडियावर त्यांच्या मुस्लीम टोपी आणि दाढीवरून अनेक प्रश्न निर्माण करतात. पण लाल मोहम्मद मात्र अशा नकारात्मक गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाहीत. ते कसलाही भेदभाव मनात ठेवता नाहीत.

राणी लक्ष्मी घाट हाच बनला लाल मोहम्मद बादशाह यांचा कायमचा पत्ता

बिठूरमध्ये राहणारे स्थानिक लोक आणि बाहेरून येणारे भाविक लाल मोहम्मद यांना अक्षरशः डोक्यावर घेतात. “तुम्ही कधी बिठूरला याल, तेव्हा तिथे कोणालाही विचारा. लोक तुम्हाला थेट माझ्यापर्यंत घेऊन येतील” असं ते प्रेमाने सांगतात. आजच्या घडीला बिठूरचा प्रसिद्ध राणी लक्ष्मी घाट हाच लाल मोहम्मद बादशाह यांचा कायमस्वरूपी पत्ता बनून गेला आहे. ते दिवसभर याच घाटावर थांबलेले असतात. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी येणारे सगळे लोकही तिथेच पोहोचतात.

त्यांच्या जीवनाचा मुख्य आधार असलेली ती बोटही याच घाटाच्या किनाऱ्यावर बांधलेली असते. गंगेच्या लाटांवर तरंगत ते दररोज याच बोटीच्या मदतीने नदी स्वच्छ ठेवण्याचा स्वतःचा संकल्प पूर्ण करतात. लाल मोहम्मद बादशाह यांचं हे आयुष्य आपल्याला मोठी शिकवण देते. निसर्गाचं रक्षण आणि मानवतेची खरी सेवा ही कोणत्याही जाती-धर्माच्या चौकटीत कधीच अडकलेली नसते. उलट, प्रत्येक खऱ्या माणसाचं हेच सर्वात पहिलं आणि परम कर्तव्य असतं.