मंगलअष्टकं म्हणणारे मुबारक चाचा सोशल मीडियावर व्हायरल

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
मुबारक शेख
मुबारक शेख

 

भक्ती चाळक

पुरंदरच्या एका मंगल कार्यालयात ‘शुभमंगल सावधान’चे स्वर घुमले आणि उपस्थितही अवाक् झाले. कारण ज्या स्पष्ट उच्चारात ही मंगलअष्टकं म्हटली जात होती, तो आवाज होता एका मुस्लीम व्यक्तीचा.

तर झालं असं की, येरवडा येथील जीएसटी कार्यालयात कर निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश निवृत्ती यादव यांच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नात त्यांनी आपला जिवलग मित्र मुबारक शेखला बोलावलं. लग्नाचा मुहूर्त झाला आणि मंगलअष्टकं तोंडपाठ असल्यानं शेख यांनी म्हणायला सुरुवात केली. एका मुस्लीम धर्मीय व्यक्तीने हिंदू विवाहातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक श्लोक इतक्या लीलयाने म्हटल्याने उपस्थित थक्क झाले. 

आपल्या मुलीच्या लग्नात मित्राने मंगलअष्टके म्हटल्याने सुरेश यादवही भावूक झाले. ते म्हणाले की, “माझ्या मुलीच्या लग्नात मंगलअष्टकं म्हणणं ही फक्त त्यांच्या विचारांची एक झलक होती. त्यांचे कार्य याहूनही मोठे आहे. ते नेहमीच इतरांसाठी काम करतात. त्यांचे वडील करीमभाई हे पंचायत समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्या सर्वसमावेशक विचारांचा वारसा आज मुबारक भाई जपत आहेत. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो.”

मुबारक शेख यांच्या या कृतीमागे मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आपल्या शेजारी राहणाऱ्या राजाराम अत्रे या ब्राह्मण मित्राच्या सहवासामुळे आपल्याला हे श्लोक मुखोद्गत झाल्याचे ते सांगतात. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची, देशभक्तीपर गीते आणि प्रेरणागीते म्हणण्याची आवड होती. 

तालुक्यातील अनेक सांस्कृतिक आणि प्रशासकीय कार्यक्रमांच्या आयोजनाची धुरा मुबारक यांच्यावरच असते. आपल्या धर्मातील नात शरीफ, सलाम आणि मिलाद असो की मस्जिदीतील प्रार्थना, तिथे ते जितक्या उत्साहाने सहभागी होतात तितक्याच आस्थेने ते हिंदू मित्रांच्या सण-समारंभातही जातात. अगदी आपल्या घरातला कार्यक्रम असल्यासारखे ते हक्काने सहभागी असतात आणि अग्रस्थानी असतात.

या सर्वसमावेशक विचारांचे बीज त्यांच्या घरातच रोवले गेले होते. त्यांचे वडील स्व. करीमभाई शेख साहेब हे पुरंदरच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील एक आदरणीय नाव. १९७९ मध्ये त्यांनी रचलेला इतिहास आजही तालुक्यातील जुनी मंडळी आवर्जून सांगतात. 

राष्ट्रीय पक्षाचे कोणतेही तिकीट पाठीशी नसताना, केवळ जनसेवेच्या जोरावर गावकऱ्यांनी स्वतः वर्गणी काढून करीमभाईंना अपक्ष म्हणून पंचायत समितीवर निवडून दिले होते. पुढे ते उपसभापती झाले आणि सोमेश्वर ग्रामपंचायतीतही अनेक वर्षे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 

गावातील श्री क्षेत्र भुलेश्वर या ऐतिहासिक मंदिराच्या उत्सवात, करीमभाई स्वतःच्या खर्चाने भंडाऱ्याचे आयोजन करायचे आणि संपूर्ण गावाला जेवण द्यायचे. आता त्यांच्या पुढच्या पिढीने सुद्धा हा वारसा जपला आहे. मोहरम असो, दिवाळी असो वा गावची यात्रा, दोन्ही धर्मियांचे सण एकत्र साजरे करण्याची रीत जणू त्यांच्याच घरातून सुरू झाली.

वडिलांचा हाच लोकसेवेचा वसा मुबारक शेख यांनी आपल्या शासकीय नोकरीतही मनापासून जपला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी करताना त्यांनी हजारो रुग्णांची सेवा केली. गॅस्ट्रो आणि कॉलराच्या भीषण साथीच्या काळात त्यांनी रात्री-अपरात्री धावून जाऊन लोकांचे प्राण वाचवले. भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देण्याची वडिलांची शिकवण त्यांनी कर्तव्यात आणली. या निस्वार्थ सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले.

पंचक्रोशीतील सर्वधर्मीय मांडली मुबारक यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत असतात. त्यांचे जवळचे सहकारी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सचिव, वि.ल. पवार यांनी सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “मुबारकजी समाजातील विविध कार्यांमध्ये सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने आपले बहुमूल्य जीवन जगत आहेत. ते या वयातही शासकीय नोकरी प्रमाणे झोकून कार्य करत आहेत. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आलेल्या समाजातील कोणत्याच घटकाला ते निराश करत नाही. त्यांचे हे कार्य असेच सुरु राहावे.”

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही मुबारक यांची समाजसेवेची घोडदौड थांबलेली नाही. मुबारक आज उतरत्या वयातही सहिष्णुता वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज ते ‘केजीएन खिदमत फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सर्व धर्मीय गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. हडपसर, पिंपरी, कोंढवा, शिरवळ आणि जेजुरी अशा पाच ठिकाणी या संस्थेची कार्यालये सुरू आहेत. 

वधू-वर सूचक केंद्रांच्या नावाने होणारी लूट थांबवण्यासाठी त्यांनी हजारो मुला-मुलींचा बायोडाटा मोफत उपलब्ध करून दिला आहे. नोंदणीसाठी किंवा स्थळ पाहण्यासाठी एक रुपयाही न घेता, गरजू कुटुंबांच्या मुला-मुलींची लग्ने ही संस्था मोफत लावून देते. त्यांनी केवळ मुस्लिमच नाही तर अनेक हिंदू जोडप्यांची सुद्धा लग्ने जुळवली आहेत. 

‘केजीएन खिदमत फाउंडेशन’ माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात आयोजित केला जाणारा वधू-वर मेळावा हजारो कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे. याशिवाय जकात आणि फित्राच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, गंभीर रुग्ण आणि गरजू विद्यार्थ्यांना थेट मदत पुरवली जाते.

शासकीय नोकरीच्या काळात त्यांनी आपले कर्तव्य बजावलेच. परंतु निवृत्तीनंतरदेखील ते धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी कार्यरत आहेत. आरोग्य विभागात असताना जसे ते वारकऱ्यांच्या आरोग्याबाबत काम करायचे तसेच आजही जेव्हा ज्ञानोबा-तुकोबांची पालखी जेव्हा सासवडमध्ये येते तेव्हा ते वारकऱ्यांच्या सेवेसाठी अग्रभागी असतात. 

मुबारक यांचे बंधू आणि त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक असून ते सुद्धा समाजकार्यासाठी आग्रही असतात.  त्यांच्या घरातील दुसरी आणि तिसरी पिढीही याच परोपकारी वृत्तीने काम करत आहे. त्यांचा मोठा मुलगा रशीद आरोग्य विभागात कार्यरत असून वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून लोकसेवा करत आहे, तर मोठी सून रहमत प्राथमिक शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे काम करते. छोटा मुलगा मुस्ताक पुण्यात खाजगी क्षेत्रात नोकरीला आहे. त्यांची मुलगी शबाना हिने एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ती हायस्कूलमध्ये अध्यापनाचे काम करते. संपूर्ण कुटुंबच या सामाजिक कार्यात हिरिरीने पाठीशी उभे राहते.

मुबारक यांनी आपल्या पुढच्या पिढीच्या हाती धार्मिक सलोख्याचे सूत्र दिले आहे. ते आपल्या नातवंडांना आणि मुलांना आजही एक गीत गाऊन दाखवतात. ते म्हणतात, “हिंदू-मुस्लिम नाम जुदा है, दोनो का मतलब एक है... दाढी-शेंडी नाम जुदा है, दोनो का मतलब एक है...  आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिमांनीही प्राणांची आहुती दिली आहे, बलिदान दिले आहे. प्रत्येक माणसाने देशाची अखंडता, सहिष्णुता आणि एकात्मता जपली पाहिजे, सर्वांनी गुण्यागोविंदाने देशात राहिले पाहिजे. आपल्याला भारताची गंगा-जमुनी संस्कृती टिकवून ठेवायची आहे.”

मुबारक यांनी त्या लग्नात गायलेल्या मंगलअष्टकांचे सूर काही वेळात शांत झाले असले तरी, त्यांनी आपल्या विचार आणि आचरणातून पेरलेला सलोख्याचा विचार समाजाच्या मनात दीर्घकाळ घुमत राहील.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter