कारंजाच्या गणेशोत्सवातील रक्तदान शिबिराचे मुस्लीम समाजसेवकाच्या हस्ते उद्घाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
कारंजा लाड येथील बजरंग पेठ गणेश मंडळाच्या शिबिरात रक्तदान करताना नगरसेवक इम्रान पारेख
कारंजा लाड येथील बजरंग पेठ गणेश मंडळाच्या शिबिरात रक्तदान करताना नगरसेवक इम्रान पारेख

 

आतिफ अहमद

माणसाच्या अंगात वाहणाऱ्या रक्ताचा रंग एकच असतो, त्याला कोणतीच जात किंवा धर्म नसतो. हा विचार आपण पुस्तकात किंवा भाषणात हजारदा ऐकला असेल. पण वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड या शहरात याच विचाराचे आणि डोळे दीपवून टाकणारे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाले.

गणेशोत्सवाच्या या काळात कारंजातील बजरंग पेठ गणेश मंडळाने अनोखा पायंडा पाडला. आपल्या आवारात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी त्यांनी थेट इम्रान पारेख या मुस्लीम लोकप्रतिनिधीला निमंत्रित केले. एका हिंदू गणेश मंडळाच्या व्यासपीठावर मुस्लीम समाजसेवकाने फित कापून रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतः देखील रक्तदान केले. ही घटना जातीय तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांना चोख उत्तर देणारी कृती ठरली.
 

लोकमान्य टिळकांच्या विचारांची शिदोरी
समाजातील प्रत्येक घटकाने, सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. लोकमान्यांचा हाच सामाजिक एकतेचा विचार कारंजा लाड येथील बजरंग पेठ गणेश मंडळाने आजही तितक्याच निष्ठेने जपला आहे. या मंडळाचा इतिहास थक्क करणारा आहे.

मंडळाचे कार्यकर्ते गौरव पाठे या १०० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल सांगताना म्हणाले, "१९२४ मध्ये आमच्या वाडवडिलांनी बजरंग पेठेत या मंडळाची स्थापना केली. आज १०१ वर्षांनंतर त्या लहानशा रोपट्याचा विशाल वटवृक्ष झालाय. नगरसेवक इम्रान पारेख साहेबांना उद्घाटक म्हणून बोलवताना आमच्या मनात कोणतीच शंका आली नाही. कारण रक्ताला धर्म नसतो."

जात-धर्माच्या पलीकडचा खरा समाजसेवक
इम्रान पारेख हे केवळ एक नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नाहीत. कारंजा शहरातील कोणत्याही नागरिकाला अडचण असो, मग तो कोणत्याही धर्माचा असो, पारेख हे नेहमी मदतीसाठी धावून जाणारे नाव आहे. त्यांच्या याच निस्वार्थ आणि बिनधोक सेवेची दखल बजरंग पेठ गणेश मंडळाने घेतली.

गणेशोत्सवाच्या व्यासपीठावर त्यांचा विशेष सत्कार करून मंडळाने सर्वधर्मसमभावाचे एक आदर्शात्मक उदाहरण सर्वांसमोर ठेवले. या सन्मानाने आणि प्रेमाने भारावून गेलेले नगरसेवक इम्रान पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,"बजरंग पेठ मंडळाच्या व्यासपीठावर सर्व मित्रांनी माझे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. आपण एकमेकांच्या सणांमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, एवढीच माझी इच्छा आहे. कारण त्यांनेच आपली विविधतेतील एकता टिकून राहील."
 

रक्तदानातून माणुसकीचा गजर
या रक्तदान शिबिराला कारंजातील तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेकडो तरुणांनी रांगेत उभे राहून रक्तदान केले. शिबिरात संकलित झालेले हे रक्त आगामी काळात अनेक गंभीर रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे. या एका उपक्रमाने कारंजा शहरातील हिंदू-मुस्लीम समुदायातील परस्पर विश्वासाचा बंध अधिक घट्ट केला आहे.

आजच्या तणावपूर्ण काळात सलोख्याचे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. बजरंग पेठ गणेश मंडळ आणि इम्रान पारेख यांनी दाखवलेली ही एकजूट अत्यंत महत्त्वाची ठरते. धार्मिक सीमा ओलांडून एकमेकांप्रती आदर दाखवणारा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक पाऊल आहे. मानवता आणि सेवाभाव हे जगातल्या कोणत्याही धर्मापेक्षा मोठे आहेत, हेच या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter