दानिश अली, पहलगाम
पहलगाममधील त्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. बैसरन खोऱ्यात देशाच्या विविध भागांतून आलेले २५ पर्यटक आणि एका स्थानिक सेवा पुरवठादाराची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आज तिथे उभारलेले स्मारक पाकिस्तानचा विश्वासघात आणि भारताविरुद्धच्या त्यांच्या जिहादी अजेंड्याची साक्ष देत उभे आहे.
एकेकाळी या निसर्गरम्य ठिकाणी दिवसभर पर्यटकांची लगबग असायची. आज मात्र तिथे दुःखाचे सावट पसरले आहे. नझीर अहमद तिथे घोडे आणि खेचरं हाकण्याचे काम करतात. त्या दिवशीचा तो थरार आणि लोकांच्या वेदना आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत, असे ते सांगतात.
या रमजानमध्ये पर्यटकांवर अवलंबून असलेल्या सर्व स्थानिकांनी मृतांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. विशेषतः त्या महिलेसाठी सर्वांनी दुवा मागितली, जिचा आपल्या मृत पतीच्या देहापाशी बसलेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. "मी तिला कधीही विसरू शकत नाही. ती आमची बहीण आहे," असे नझीर गहिवरून सांगतात.
२२ एप्रिल २०२५ चा तो काळा दिवस पहलगाम विसरू शकलेले नाही. बैसरन खोऱ्यात घुमलेल्या गोळ्यांच्या आवाजाने केवळ २६ निष्पाप बळी घेतले नाहीत, तर संपूर्ण परिसर भीती आणि दुःखाच्या गर्तेत ढकलला.
तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून पुरुषांची हत्या केली. तेव्हा सर्वत्र आरडाओरडा आणि महिला-मुलांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. वाचलेले लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. अशा वेळी सय्यद आदिल हुसेन या तरुणाने माणुसकी आणि आपल्या देशबांधवांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.
हापतनार आणि आसपासच्या गावांसाठी आदिल एक नायक आहे. आदिलमुळेच दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला गेला आणि अधिक जीवितहानी टळली, असे स्थानिकांना वाटते. आदिल एक घोडेस्वार होता. हल्ल्याच्या वेळी त्याने अचाट धैर्य दाखवले. एक दहशतवादी पर्यटकांना मारण्याचा प्रयत्न करत असताना आदिलने त्याच्याकडून पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या संघर्षात त्याने बलिदान दिले. आज त्याचे नाव पहलगामच्या स्मारकावर अत्यंत आदराने कोरले गेले आहे.
तो दहशतवाद्यांच्या समोर खंबीरपणे उभा राहिला. "हे आमचे पाहुणे आहेत, तुम्ही त्यांच्यावर गोळ्या का चालवत आहात? त्यांचा काय दोष आहे?" असे तो ओरडून सांगत होता. दहशतवाद्याने पाहुण्यांसोबतच आदिललाही ठार मारले.
आज बैसरनकडे जाणारा रस्ता ओसाड पडला आहे. रस्त्यावर काटेरी तारांचे कुंपण आहे. अब्दुल गनी आणि नझीर अहमद यांच्या मते, या हल्ल्यानंतर पर्यटकांनी इकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. घोडेस्वार, चालक आणि इतर सर्व जण बेरोजगार झाले असून जगणे कठीण झाले आहे.
आदिल आता स्थानिक लोकांसाठी एक आदर्श बनला आहे. सर्वांना त्याच्या शौर्याचा अभिमान वाटतो. "पर्यटक हेच आमचे अन्नदाते होते, त्यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे नाते होते," असे लोक सांगतात.
'आवाज'च्या टीमने हपतनारमध्ये शहीद आदिल हुसेन यांची पत्नी गुलनाज अख्तर यांची भेट घेतली. त्या सध्या आपल्या आईच्या घरी राहत आहेत. "हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. पतीशिवाय जीवन अर्थहीन वाटते," असे गुलनाज सांगतात. त्यांचा पती दररोज कामावर जायचा, दिवसातून अनेक वेळा फोन करायचा आणि संध्याकाळी घरी परतायचा. तो आता कधीच परतणार नाही, यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.
.webp)
आयुष्याचा जोडीदार नसेल तर जीवनात कोणताही आनंद उरत नाही. "आदिल साहेब खूप शूर होते. जिथे लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते, तिथे त्यांनी गोळ्यांच्या वर्षावात इतरांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना वाचवताना त्यांनी स्वतःचे बलिदान दिले. मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. असा आदर्श खूप कमी लोक निर्माण करू शकतात," असे गुलनाज म्हणाल्या.
गुलनाजच्या आईने सांगितले की, आदिल नेहमीप्रमाणे त्या दिवशी कामावर गेला होता. दुपारी तिथे हल्ला झाल्याची बातमी आली. संध्याकाळपर्यंत आदिल शहीद झाल्याचे समजले. तेव्हापासून संपूर्ण कुटुंब दुःखात आहे आणि गुलनाज अजूनही धक्क्यातून सावरलेली नाही.
शहीद आदिलचे वडील सय्यद हैदर हुसेन शाह यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान आहे. आदिलने केवळ लोकांचे प्राण वाचवले नाहीत, तर संपूर्ण काश्मीरचे नाव उज्ज्वल केले, असे ते मानतात.
वडिलांनी मुलासोबतच्या शेवटच्या क्षणांच्या आठवणी सांगितल्या. त्या दिवशी त्यांचा धाकटा मुलगा नौशाद पर्यटकांची टॅक्सी घेऊन सर्वात आधी पहलगामसाठी निघाला. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास आदिल कामासाठी घराबाहेर पडला.
'आवाज'ची टीम कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा तिथे कामगार नवीन घराला रंग देत होते. हे घर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कुटुंबाला भेट दिले आहे.
हैदर शाह यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्या टीमने हे घर पूर्ण केले आहे. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्याने सांगितले की, हल्ल्याानंतर जेव्हा शिंदे आपल्या राज्यातील पर्यटकांना नेण्यासाठी तिथे आले होते, तेव्हा त्यांना आदिलच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली.
शिंदे यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. मात्र नंतर कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली. त्यांनी आदिलच्या कुटुंबाला एक चांगले घर बांधून देण्याचे वचन दिले. तसेच कुटुंबासाठी रेशन आणि इतर सुविधांचीही व्यवस्था केली.
महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल हैदर शाह यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "कोणत्याही राजकीय फायद्याचा विचार न करता शिंदे यांनी आम्हाला स्वतःच्या कुटुंबासारखी वागणूक दिली," असे ते म्हणाले.
पहलगामची ही घटना शोकांतिका नव्हे, तर ती शौर्य, बलिदान आणि माणुसकीची एक अजरामर गाथा आहे. येथील लोक आजही आपल्या जखमांसह जगण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेम, माणुसकी आणि शांततेचा प्रकाश एक दिवस सर्व अंधारावर मात करेल, अशी आशा त्यांच्या मनात अजूनही जिवंत आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter