लोहगड ट्रेकिंग दुर्घटना की पूर्वनियोजित कट? हुडीमधील संशयितामुळे मिळाला सुगावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
लोहगड किल्ल्यावरील ट्रेकर केतन अग्रवाल हत्याकांडाचा उलगडा
लोहगड किल्ल्यावरील ट्रेकर केतन अग्रवाल हत्याकांडाचा उलगडा

 

पुणे 

लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवाल (२६) या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना अपघात नसून, तो एक पूर्वनियोजित खून असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीमधील एक महत्त्वाचा पुरावा कामी आला, ज्यामध्ये एका संशयित तरुणाने ३३ अंश सेल्सिअस उष्णतेतही 'हुडी' घातलेली दिसली.

सीसीटीव्हीने बदलले तपासाचे दिशा

केतन अग्रवाल याचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा एक अपघात असल्याचे सांगण्यात आले होते, परंतु पोलिसांना या घटनेत संशय वाटला. तपास करत असताना लोहगड किल्ल्यावरील तिकीट काउंटरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल चालताना दिसले. मात्र, त्यांच्यापासून काही मीटर अंतरावर एक तरुण हुडी आणि शॉर्ट्स घालून चालताना दिसला. ३३ अंश सेल्सिअस तापमान असताना कोणीही हुडी का घालेल? या प्रश्नाने पोलिसांचा संशय बळावला.

पूर्वनियोजित कट

तपासादरम्यान, सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचे हजारो कॉल रेकॉर्ड्स पोलिसांच्या हाती लागले. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, पण बदनामीच्या भीतीने तिने आणि चेतनने केतनला कायमचे संपवण्याचा कट रचल्याचे कबूल केले. यापूर्वी १४ जून रोजी सुद्धा सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याने एका झुडपाला धरून जीव वाचवला होता. त्या वेळी सापाचे निमित्त करून तिने स्वतःचा बचाव केला होता.

पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली आहे. केतन हा पुण्यातील एक उद्योजक होता आणि त्याचे नोव्हेंबरमध्ये उदयपूरमध्ये लग्न होणार होते. या हत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.