बीड
बीड जिल्हा म्हटला की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो ऊसतोड कामगारांचा संघर्ष, दुष्काळाच्या झळा आणि गरिबीच्या चटक्यांनी होरपळलेला कष्टकरी समाज. पण याच मातीत असे काही संघर्षवीर जन्म घेतात, ज्यांच्या जिद्दीपुढे नियतीलाही हात टेकावे लागतात. अशीच एक अंगावर काटा आणणारी आणि प्रत्येक आईच्या डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी बीडमधून समोर आली आहे. आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी आणि शाळेची फी भरण्यासाठी रमाबाई रणवीर या माऊलीने पायात साधी चप्पल नसताना, अनवाणी पायांनी चक्क मॅरेथॉन धावली आणि ती जिंकूनही दाखवली.
ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण हे आजही एक मोठे आव्हान असते. गरिबी आणि रोजगाराची वानवा यामुळे अनेकदा मुलींच्या शिक्षणाला ब्रेक लागतो. रमाबाईंच्या कुटुंबाची परिस्थितीही अत्यंत हलाखीची. दोन वेळच्या पोटापाण्याची भ्रांत असताना मुलींच्या शाळेची फी भरायची कुठून, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा होता. पण रमाबाईंनी हार मानली नाही. आपल्या लेकींना शिक्षणाच्या माध्यमातून या गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढायचं, हा एकच ध्यास त्यांनी घेतला होता.

याच काळात अंबाजोगाई येथे २९ ऑगस्ट रोजी 'भारतीय शिक्षण प्रसारक मंडळा'च्या वतीने 'अमृत-२ मॅरेथॉन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिंकणाऱ्याला बक्षीस मिळणार असल्याचे रमाबाईंना समजले. लेकींच्या फीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना हा एक आशेचा किरण वाटला. स्पर्धेच्या दिवशी अनेक स्पर्धक महागडे स्पोर्ट्स शूज आणि ट्रॅक सूट घालून आले होते. पण रमाबाईंकडे पायात घालायला साधी चप्पलही नव्हती. पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती, जी इतर कोणाकडेही नव्हती... ती म्हणजे एका आईची अफाट जिद्द! जेव्हा शर्यत सुरू झाली, तेव्हा डांबरी आणि खडबडीत रस्त्यावर अनवाणी धावणे सोपे नव्हते. पायाला फोड येतील, खडे बोचतील याची पर्वा रमाबाईंना नव्हती. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त मुलींच्या शाळेची फी आणि त्यांचे भविष्य दिसत होते. आईच्या ममतेने खड्यांच्या आणि रस्त्यांच्या वेदनेवर मात केली. सर्व स्पर्धकांना मागे टाकत रमाबाईंनी ही शर्यत दिमाखात जिंकली.
रमाबाईंच्या अनवाणी पायांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाची आणि त्यामागच्या कारणाची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी जेव्हा बीडचे संवेदनशील जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या कानावर गेली, तेव्हा प्रशासनानेही तत्परतेने पावले उचलली. एका आईच्या या महान त्यागाचा आणि जिद्दीचा सन्मान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या सत्कार समारंभात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या विशेष पुढाकारातून तब्बल ५० हजार रुपयांचा मदत निधी उभा करण्यात आला आणि तो सन्मानपूर्वक रमाबाईंच्या हाती सोपवण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन भावुक झाले होते. ते म्हणाले, "रमाबाईंचा हा विजय एका आईच्या अफाट प्रेमाचा, त्यागाचा आणि लेकींचे भविष्य घडवण्यासाठी तिने केलेल्या संघर्षाचा विजय आहे. आपल्या मुलींसाठी एक आई किती मोठी मजल मारू शकते आणि कितीही वेदना हसत हसत सहन करू शकते, याचे रमाबाई हे एक जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण आहेत."
हेही वाचा: डॉ. शेख मोहम्मद या शिक्षकाचा एक निर्णय आणि २००० मुलींचं आयुष्य बदललं!
प्रशासनाकडून मिळालेल्या या मदतीमुळे रमाबाईंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. "या मदतीमुळे माझ्या मुलींच्या शिक्षणाचा मोठा भार आता हलका झाला आहे. आता माझ्या लेकींचे शिक्षण थांबणार नाही," अशी कृतज्ञतेची आणि समाधानाची भावना त्यांनी व्यक्त केली. बीडच्या मातीतून समोर आलेली रमाबाईंची ही कहाणी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी मातृत्वाचा, संघर्षाचा आणि शिक्षणाप्रती असलेल्या अढळ विश्वासाचा आदर्श बनली आहे.