हिमालयाच्या मदतीला धावतोय सह्याद्री

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
हिमालयाच्या मदतीला धावतोय सह्याद्री
हिमालयाच्या मदतीला धावतोय सह्याद्री

 

जोशीमठ : हिमालयातील काराकोरम पर्वत रांगेत वसलेल्या जोशीमठाचा काही भाग खचत असल्याने पर्यटकांनी याकडे पाठ फिरवली. पर्यटन हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने या भागातील नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील धाडसी पर्यटकांनी जोशीमठाच्या नागरिकांना मदतीचा हात दिला. त्यामुळे हिमालय संकटात असताना त्याच्या मदतीने महाराष्ट्रातील सह्याद्री धावत असल्याचे चित्र दिसते.

धार्मिक आणि धाडसी पर्यटकांना हिमालयाने कायमच साद घातली आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले जोशीमठ हे त्यापैकीच एक. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जोशीमठाचा परिसर खचत आहे, तेथील घरांना तडे जात असल्याचे दिसले. त्याच्या बातम्या वेगाने देशभरात पसरल्या. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ऋषिकेश, देवप्रयाग, जोशीमठ येथे येणाऱ्या धार्मिक पर्यटकांनी पटापट हॉटेल आणि कारचे बुकिंग रद्द केले. घरांना पडलेल्या भेगा, खचलेली जमीन असे नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या येथील नागरिकांवर आर्थिक संकटही कोसळले. अशावेळी महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात गिर्यारोहण करणाऱ्या आणि हिवाळ्यात धाडसी पर्यटनासाठी सातत्याने हिमालयात येणाऱ्या ट्रेकिंग ग्रुपने येथील नागरिकांना मदतीचा हात दिला.

ऋषिकेश येथील कारचालक अमित शर्मा म्हणाले, ‘‘जानेवारीमध्ये गुजरात, मध्यप्रदेश येथील दोन ग्रुप ट्रीप ठरल्या होत्या. पण, जोशीमठातील घरांना तडे गेल्याने या दोन्ही ट्रीप रद्द झाल्या, अशावेळी औरंगाबाद येथून आलेल्या एका ट्रेकिंग ग्रुपमुळे आधार मिळाला.’’

जोशीमठ येथील हॉटेल व्यावसायिक केदार राणा म्हणाले, ‘‘हिवाळ्यात धार्मिक पर्यटनासाठी गर्दी असते. सर्व खोल्या भरलेल्या असतात. कामासाठी परिसरातील तरुण मुले जोशीमठामध्ये येतात. या वर्षी हॉटेलमध्ये बुकिंग फारसे झाले नाही. आमच्याकडे ग्राहक नसल्याने परिसरातील मुलांच्या हाताला काम देता आले नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून हिवाळ्यात गिर्यारोहणासाठी आलेल्या धाडसी पर्यटकांमुळे उदरनिर्वाहाला हातभार मिळत आहे.’’ व्यापारी अखिल काब्रा म्हणाले, ‘‘हिवाळ्यात उबदार कपड्यांना चांगली मागणी असते. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांमुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. या वर्षी मात्र, बाजारात मंदी आहे. पर्यटक नसल्याने खरेदीची धावपळ, गर्दी, ग्राहकांशी संवाद हे सगळंच बंद झाले.’’

आमचा दहा-बारा जणांचा ग्रुप आहे. दरवर्षी हिवाळ्यात बर्फ पडायला सुरवात झाली की, हिमालयात एक ट्रेक करतो. या वर्षी आवर्जून जोशीमठ निवडला. जमीन खचल्याने जोशीमठ धोकादायक झाल्याचे बरेच जण सांगत होते. पण, अखेर येथे येण्याचा निर्णय घेतला. तो योग्य होता कारण, आम्ही आलो नसतो तर येथील नागरिकांना पैसे मिळाले नसते. ट्रेकिंग ग्रुप वगळता कोणीच या भागात सध्या येताना दिसत नाही.

-दिलीप सोळंकी, नाशिक