मालेगावच्या सरबती चहाची नागरिकांना भुरळ

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
मालेगाव : येथील सरबती चहाचा आस्वाद घेताना ग्राहक.
मालेगाव : येथील सरबती चहाचा आस्वाद घेताना ग्राहक.

 

सध्या सगळीकडे चहाचे वेगवेगळे ट्रेंड आले आहेत. शेतकरी, आमदार, गुळाचा आदीं ट्रेंडनी ग्रामीण भागातील नागरिकांना भुरळ पाडली आहे. मालेगावची रीत थोडी न्यारी आहे. येथील महामार्गावर गुळाचा चहा लोकप्रिय होत आहे. स्वस्तात मस्त मिळणाऱ्या शरबती चहाने भुरळ घातली आहे. येथे थंडीत अवघ्या चार रुपयाला मिळणाऱ्या चहासाठी गर्दी होत आहे.

मालेगाव अन् चहा यांचे अतूट नाते आहे. चहाप्रिय असलेल्या शहरात चोवीस तास चहा उपलब्ध असतो. येथे चहाच्या लहान-मोठ्या शेकडो हॉटेल्स, टपऱ्या आहेत. चहामुळे येथील प्रत्येक हॉटेलवर नेहमीच गर्दी असते. 

सरबती चहा फायदेशीर व गुणकारी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. येथे चंदनपुरी गेट, आयेशानगर, आझादनगर, डेपो, सलामचाचा रोड, कुसुंबा रोड यासह विविध भागात सरबती चहाच्या हातगाड्या लावल्या जात आहे. सरबती चहाची थंडीत दुप्पटीने विक्री होत आहे. २०१० मध्ये येथे अवघ्या एक रुपयाला मिळणारा चहा सध्या चार रुपयाला मिळत आहे. सरबती चहा अगदी कमी खर्चात तयार होतो, त्यामुळे सध्या काही ठिकाणी तीन ते चार रुपयाला चहाची विक्री होत आहे.

असा तयार होतो सरबती चहा 
सरबती चहा बनविताना सुरवातीला काळा चहा बनविला जातो. यात गवती चहा, अद्रक, गूळ, साखर, चहा मसाला व सरबती चहा पावडर टाकून तयार होतो. चहा तयार झाल्यावर ग्लासमध्ये लिंबू, चाट मसाला, काळे मीठ टाकले जाते. चहा पिल्याने सर्दी, खोकला व इतर आजाराला गुणकारी असल्याने ग्राहकांच्या कल वाढत आहे.
 
सरबती चहाविक्रेता मोहम्मद मतीन सांगतात, "पंधरा वर्षांपासून वडील हा व्यवसाय करीत होते. हा हंगामी व्यवसाय आहे. स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांकडून मागणी चांगली आहे. विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे."

तर, चहाबद्दल मालेगावचे अब्दुल रहमान सांगतात, "पावसाळ्यात व थंडीत मिळणाऱ्या या चहाची चव वेगळी असते. सरबती चहा वर्षातून एकदाच मिळतो. त्यामुळे रोज रात्री जेवणानंतर हा चहा पिण्याची येथे सवय आहे." 

- जलील शेख, नाशिक