मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 3 Months ago
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी नागरिक.
मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी नागरिक.

 

मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वतीने जागतिक महिला अधिकार दिनानिमित्त संभाजी उद्यानात लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुस्लीम महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्र करण्यात आले व समान नागरी कायद्याचा पुरस्कार करण्यात आला. 'समान नागरी कायदा कशासाठी? संविधानिक कर्तव्यासाठी, समान नागरिकत्वाच्या हक्कांसाठी, स्त्री-पुरुष समतेसाठी, सर्व महिलांना समान संधी आणि संरक्षणासाठी, धर्मनिरपेक्षतेच्या अविष्कारासाठी, सामाजिक-राष्ट्रीय एकात्मेसाठी', 'जगण्याचे देते नवे भान; आमचे संविधान, आमचे संविधान', 'नको पुरुषप्रधानता, नको स्त्री प्रधानता; आम्हाला हवी संविधानिक समानता!' यासंख्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. तसेच, दूरदर्शनच्या निवेदिका आणि गझलकार स्वाती पाटणकर यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. 
 

 
याविषयी बोलताना हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रमाच्या प्रमुख डॉ. बेनझीर तांबोळी म्हणाल्या, "यावर्षीची जागतिक महिला दिनाची थीम 'इन्स्पायर इन्क्ल्युजन' होती. सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, व्यावसायिक प्रत्येक स्त्रिच्या अडचणी वेगळ्या आहेत. धार्मिक आणि पितृसत्ताक मानसिकतेत आजही स्त्रिया भरडल्या जात आहेत. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणीही स्त्रियांना जाणीवपूर्वक डावलले जाते. त्यामुळे अशा सर्व स्तरातील स्त्रियांना प्रेरित करून त्यांना सोबत घेऊन आपल्याला चालावे लागणार आहे."  
 
       
 
यावेळी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, "सत्यशोधक मंडळाची स्थापना स्त्रियांना मानवी अधिकार मिळवून देण्यासाठीच झाली होती. संयुक्त राष्ट्र संघाचा जाहीरनाम्यात स्त्रियांना समानतेने आणि सभ्यतेने वागविण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय संविधानात देखील स्त्रीयाविषयीच्या याच भूमिका दिसून येतात. मात्र, प्रत्यक्षात आजही दर मिनिटाला महिला कोणत्या ना कोणत्या हिंसेला बळी जाताना दिसते. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा महिलांच्या अधिकारासाठी, समान संधी आणि समान संरक्षणासाठी अत्यंत महत्वाचे आहे.    
 

 
या कार्यक्रमात मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे पदाधिकारी, सत्यशोधक फातिमाबी शेख महिला मंच व हमीद दलवाई शैक्षणिक उपक्रम मंच सहभागी झाले होते. कार्यक्रमाला दिलावर शेख, श्रीरूपा बागवान, प्रा. समीना पठाण, अबेदा शेख, बेनझीर काझी, मुमताझ परदेशी आणि इतर कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
 

आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter