फिफा विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय वंशाचे ४ खेळाडू गाजवणार मैदान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 10 h ago
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंची चमक
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूंची चमक

 

मलिक असगर हाशमी

आता अवघ्या काही तासांतच जगातील सर्वात मोठा आणि बहुचर्चित असा फुटबॉलचा महाकुंभ सुरू होणार आहे. 'फिफा विश्वचषक २०२६'चे भव्य आयोजन यंदा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये मिळून होत आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही आपला भारतीय फुटबॉल संघ या जागतिक स्पर्धेचा भाग नाहीये. पण त्यामुळे भारतीयांसाठी या स्पर्धेत रस घेण्यासारखं किंवा अभिमान बाळगण्यासारखं काहीच उरलेलं नाही, असं मात्र अजिबात नाही.

यावेळचा हा विश्वचषक खऱ्या अर्थाने भारतीय वंशाचे खेळाडू, आपले रेफरी, इथले कलाकार आणि हजारो प्रेक्षकांमुळेखूपच खास बनला आहे. फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच चक्क चार भारतीय वंशाचे फुटबॉलपटू वेगवेगळ्या देशांच्या जर्सीमध्ये जागतिक फुटबॉलच्या सर्वात मोठ्या मंचावर उतरणार आहेत. या चार खेळाडूंमध्ये कतारच्या संघातील युवा खेळाडू तहसीन मोहम्मद जमशीद याचं नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे.

तहसीन मोहम्मद जमशीद याच्या कुटुंबाची मूळ पाळेमुळे केरळच्या कन्नूर जिल्ह्यात आहेत. पण तहसीनचं संपूर्ण बालपण कतारमध्येच गेलं. त्याचे वडीलही सुरुवातीपासून फुटबॉलशी जोडलेले आहेत. कतारमधील प्रतिष्ठित अशा 'एस्पायर अकादमी'मध्ये प्रशिक्षण घेतलेला तहसीन आज कतार फुटबॉलचा 'उदयोन्मुख तारा' मानला जातो. त्याची यंदाच्या विश्वचषकात झालेली निवड ही खऱ्या अर्थाने भारतीय फुटबॉल प्रेमींसाठीही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, फिफा विश्वचषकाच्या मंचावर दिसणारा तो भारतीय वंशाचा पहिलाच मुस्लिम खेळाडू आहे.

या यादीत ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा निशान वेलुपिल्लई हा देखील भारतीय वंशाचाच आहे. मुळात तमिळ पार्श्वभूमी असलेल्या निशानने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघात आपली एक भक्कम आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैदानावरचा त्याचा जबरदस्त वेग आणि आक्रमक खेळण्याच्या शैलीमुळे तो आज संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे.

यंदाच्या विश्वचषकात खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या खेळाडूंची यादी इथंच थांबत नाही. न्यूझीलंड संघाचा दमदार मिडफिल्डर सरप्रीत सिंग हासुद्धा या विश्वचषकाचा  महत्त्वाचा भाग आहे. एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सरप्रीतने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आधीच आपली एक वेगळी छाप पाडली आहे. जर्मनीच्या प्रतिष्ठित 'बायर्न म्युनिक' या जगप्रसिद्ध क्लबमध्ये सामील होणाऱ्या सुरुवातीच्या भारतीय वंशाच्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होता.

या यादीतील चौथा खेळाडू म्हणजे सॅम्युअल माउटूसामी. तो यंदा 'डीआर काँगो' या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे. मुळात तमिळ वंशाशी जोडल्या गेलेल्या सॅम्युअलला आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फुटबॉल खेळण्याचा मोठा अनुभव गाठीशी आहे. तो या चारही खेळाडूंमध्ये सर्वात जास्त कसलेला आणि अनुभवी मानला जातो.

भारतीय वंशाच्या खेळाडूंची ही तगडी चौकडी एका जुन्या वारशाचीच मशाल पुढे नेत आहे. या वारशाची खऱ्या अर्थाने सुरुवात फ्रान्सचा माजी मिडफिल्डर विकास दोरासू याने केली होती. दोरासूने २००६ सालच्या विश्वचषकात फ्रान्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं, आणि विशेष म्हणजे त्याचे पूर्वज भारतातील आंध्र प्रदेशातून आलेले होते.

विश्वचषक २०२६ मधील भारताची ही उपस्थिती केवळ या चार खेळाडूंइतकीच मर्यादित नाहीये. 'भारतीय फुटबॉल महासंघा'च्या (AIFF) माहितीनुसार, अनेक भारतीय रेफरी आणि इतर सामना अधिकारी सध्या फिफाच्या आंतरराष्ट्रीय यादीत मानाने समाविष्ट आहेत. यामध्ये अश्विन कुमार, आदित्य पुरकायस्थ, रचना कमानी, मुरलीधरन पांडुरंगन आणि पीटर क्रिस्टोफर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. यावरून जागतिक फुटबॉल क्षेत्रात भारताचा वेगाने वाढणारा सहभाग अगदी स्पष्टपणे दिसून येतो.

फुटबॉलच्या या महामहोत्सवात मनोरंजन जगतातूनही आपल्या भारतीय उपखंडाची मोठी आकर्षक झलक पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तसंच अमेरिकन-बांगलादेशी गायक संजय यांनी गायलेलं "सिर सिर" हे अधिकृत गाणं सोशल मीडियावर आधीच चर्चेचा विषय बनलं आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही दक्षिण आशियाई संस्कृतीचा मोठा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल.

प्रेक्षकांच्या पातळीवर विचार केला, तरी तिथेही भारताची उपस्थिती लक्षणीय असणार आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्रीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, भारतभरातून सुमारे २० हजार फुटबॉल प्रेमी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोला पोहोचू शकतात. ही संख्या २०२२ च्या कतार विश्वचषकाच्या तुलनेत कमी असली, तरी प्रवासाला येणारा मोठा खर्च आणि दीर्घ कालावधी लक्षात घेता, यावेळी भारतीय प्रेक्षक अधिक मोठ्या संख्येने आणि सक्रियपणे सहभागी होत असल्याचं मानलं जात आहे.

फुटबॉल तज्ज्ञांच्या मते, आपला भारत सध्या विश्वचषकात खेळण्यापासून जरी दूर असला, तरी भारतीय वंशाच्या खेळाडूंची ही वाढती उपस्थिती भविष्यातील मोठ्या शक्यतांची नांदी आहे. भारतीय समुदाय आज जगाच्या विविध भागांत जाऊन फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करत आहे, हेच यावरून स्पष्टपणे दिसून येतं.

यंदाचा विश्वचषक २०२६ भारतीय फुटबॉलसाठी नक्कीच नवा अध्याय लिहू शकतो. मैदानावर भलेही आपला भारताचा तिरंगा खेळताना दिसणार नाही, पण भारतीय वंशाचे हे खेळाडू, आपले रेफरी, कलाकार आणि हजारो भारतीय प्रेक्षक ही स्पर्धा भारतासाठीही नक्कीच तितकीच संस्मरणीय बनवतील.