देशभरात दिवाळी मात्र वानखेडेवर प्रतिष्ठेची लढाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

शैलेश नागवेकर, मुंबई

देशात सर्वत्र दिवाळीचा आनंद आणि उत्साह साजरा होत असताना वानखेडे स्टेडियमवर भारतीय क्रिकेट संघ प्रतिष्ठेची लढाई लढणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहेच; परंतु हा तिसरा सामना जिंकून व्हाईटवॉशची नामुष्की टाळण्यासाठी शर्थ करावी लागणार आहे.

एक तप आणि सलग १८ कसोटी मालिका विजयाचा भारतीय संघाचा अश्वमेध न्यूझीलंडने अनपेक्षितपणे रोखला, त्यामुळे मायदेशात मालिका गमावण्याची नामुष्की तर ओढावलीच; परंतु कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्थानही धोक्यात आले. बंगळूरमधील पराभवातून बोध घेता आला नाही आणि पुण्यात तीन दिवसांतच खेळ खल्लास झाला, आता मुंबईत भरपाई करण्यासाठी फारच कमालीचा खेळ रोहित शर्माच्या भारतीय संघाला करावा लागणार आहे.

कशी करणार सुधारणा? 
फिरकी गोलंदाजी आणि फिरकी मुंबईः वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या कसोटीसाठी भारतीय संघाची तयारी सुरू गोलंदाजी खेळण्यातील प्राबल्य ही भारताची ताकद होती, तीच पहिल्या दोन कसोटीत धुळीस मिळाली, त्यामुळे बंगळूरमध्ये ४६ आणि पुण्यात १५५ धावांत बाद अशी शोकांतिका तयार झाली म्हणूनच यातून कशी आणि किती सुधारणा करणार, यावर भारतीय संघाचे भवितव्य अवलंबून आहे.

गवत केले कमी 
वानखेडेवरील लाल मातीची खेळपट्टी आव्हानात्मक असते; परंतु पुण्यातील अनुभव पाहता ही खेळपट्टी पूर्णतः फिरकीच्या आहारी (आखाडा) जाणार नाही, असा अंदाज आहे. तिच्यावर चेडू फिरणार हे निश्चित असले तरी हे कधीपासून घडणार हे महत्त्वाचे आहे. कारण आदल्या दिवशी दुपारी ब्रश मारून उर्वरित गवत कमी करण्यात आले. शिवाय, आज खेळपट्टीवर अच्छादन ठेवण्यात आले नाही. परिणामी, कडक उन्हामुळे ती चांगलीच ठणठणीत झाली आहे. 

पहिल्या दोन दिवसांत सकाळी आणि सायंकाळी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे चेंडू स्वींग होतील. परिणामी, वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरू शकतील. अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाज प्रामुख्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सर्वस्व झोकून देऊन फलंदाजी करावी लागणार आहे.

पहिला डाव महत्त्वाचा 
बंगळूर आणि पुण्यातील कसोटीत भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण पहिल्या डावातील घसरगुंडी निर्णायक ठरली होती, त्यामुळे सुरुवातीलाच पिछाडीवर गेल्यामुळे पुनरागमन करणे कठीण गेले होते. त्यासाठी या तिसऱ्या कसोटीसाठी तरी भारतीय फलंदाजांना किमान अडीचशे ते तिनशे धावा करण्याची मानसिकता तयार करावी लागणार आहे.

बुमराला विश्रांती?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच कसोटी खेळायच्या आहेत, तसेच मुंबईत पहिल्या दोन दिवसांनंतर फिरकीस साथ मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे बुमराला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. काल आणि आज त्याने गोलंदाजीचा सराव केला नाही, सामन्यापूर्वी किती आणि कसा सराव करायचा हे बुमराला माहीत आहे, त्यामुळे त्याने सराव केला नाही, अशी माहिती गंभीर यांनी दिली. या एकमेव बदलाची शक्यता वगळता भारतीय संघ कायम राहील, असा अंदाज आहे.

नाणेफेक महत्त्वाची
भारतातील कसोटी सामन्यांत नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरत असतो, तसा तो या तिसऱ्या कसोटीतही असणार आहे. पहिले दोन दिवस खेळपट्टी फलंदाजीस पोषक असेल, असा अंदाज आहे; परंतु नाणेफेक जिंकण्यात सातत्याने अपयशी ठरतो, अशी आकडेवारी आहे.

मोफत पाण्याची सोय
सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक दिवसाचा खेळ होणार आहे. तसेच, मुंबईत दुपारी अधिक प्रमाणात उकाडा होत असल्याने पाण्याची नितांत गरज प्रेक्षकांना असणार आहे. पुण्यातील दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांसाठी पाणी कमी पडले होते, त्यामुळे काही काळासाठी मोठा गोंधळ उडाला होता. अशी परिस्थिती वानखेडेवर होऊ नये, म्हणून मुंबई क्रिकेट संघटनेने स्टेडियमच्या सर्व बाजूस मुबलक मोफत पाण्याची सोय केली आहे.