भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथे १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात न खेळण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर त्यांनी कडक शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना गांगुली म्हणाले, "विश्वचषकातून माघार कशासाठी? ते कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकेत खेळतच आहेत. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे मला धक्का बसला आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे."
बांगलादेशने भारतात प्रवासासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या समर्थनार्थ भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. या घडामोडींवर भाष्य करताना गांगुली यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, "तुम्ही जेव्हा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरता, तेव्हा प्रत्येक गुण मोलाचा असतो. तुम्ही विश्वचषकात अशा प्रकारे गुण गमावू शकत नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी तो मला अनाकलनीय वाटतो."
भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव याने या वादावर यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे. सूर्यकुमारने कोलंबोतील एका पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले होते की, "आमचा विचार स्पष्ट आहे. आम्ही मैदानात उतरणार आहोत. आमचे विमान आरक्षित आहे आणि आम्ही कोलंबोला जात आहोत. समोरच्या संघाने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, ते माझ्या नियंत्रणात नाही. आम्ही २०२५ ची आशिया चषक स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळलो आहोत, त्यामुळे आता आम्ही सज्ज आहोत."
गांगुली यांनी या संवादात भारतीय संघाचे जोरदार समर्थन केले. अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारतीय फलंदाजी काहीशी अडखळली असली तरी, त्यांनी संघाच्या आक्रमक खेळाचा बचाव केला. ते म्हणाले, "टी-२० क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने फटकेबाजी करावी लागते. भारतीय खेळाडू जागतिक दर्जाचे असून ते अनेक वर्षांपासून हे सिद्ध करत आहेत. कधी कधी एखादा डाव मनासारखा जात नाही, पण हा संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा सर्व आघाड्यांवर अत्यंत शक्तिशाली आहे. स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसा संघ आपली लय प्राप्त करेल. माझ्या मते भारत या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे."