अल्ट्रारनर सुफिया खानचे चौथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Sufiya Sufi
Sufiya Sufi

 

भारतीय अल्ट्रारनर सुफिया सूफी खान हिने आणखी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. २०० किमी दक्षिण ते उत्तर 'फास्टेस्ट रन अक्रॉस कतार' हि अल्ट्रामॅरेथॉन ३० तास आणि ३४ मिनिटांत तिने यशस्वीरित्या पूर्ण केली.
 
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात, सुफियाने गुरुवारी पहाटे ६.१६ वाजता अबू समरा येथून धावण्यास सुरुवात केली आणि अल रुवैस येथे शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता अंतिम रेषेला तिने स्पर्श केला. या कामगिरीची औपचारिक ओळख होण्यासाठी या मोहिमेचे संपूर्ण रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सादर केले जाणार आहेत. 
 
सुफिया हिने ३५ तासात शर्यत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते, मात्र तिने निर्धारित वेळे पूर्वीच ती पूर्ण केली. कतारमधील भारतीय दूतावासाशी संलग्न असलेल्या भारतीय क्रीडा केंद्राने (ISC) मोहिमेसाठी लॉजिस्टिक सहाय्याची व्यवस्था केली होती. आयएससीचे उपाध्यक्ष शेजी वल्लिकायथ म्हणाले की, “सुफीसाठी ही मोठी उपलब्धी आहे. 'रन अक्रॉस कतार' चॅलेंजसह, सुफियाने जागरूकता वाढवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी कतारमध्ये सर्वात वेगवान धावण्याचा अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.”
 
सुफीयाला अनेक स्थानिक धावपटूंनी आणि इतर अनेकांनी पाठिंबा दिला. या वेळी तिला थंड वाऱ्यांशी झुंज द्यावी लागली. शर्यतीदरम्यान सुफियासोबत तिच्या टीमचे तीन सदस्य होते. जगभर पायी प्रवास करणे हे तिचे ध्येय साध्य करण्यासाठी ती स्वत: ला तयार करत असल्याचे तिने सांगितले.
 
३७ वर्षीय अल्ट्रा धावपटू सुफिया सुफी लांब पल्ल्याच्या धावण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी भारतभर ओळखली जाते. २०१९ मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी असा सर्वात वेगवान प्रवास करणारी, २०२१ मध्ये गोल्डन चतुर्भुज रोड रन पूर्ण करण्यासाठी आणि २०२२ मध्ये मनाली-लेह हिमालयन अल्ट्रा रन चॅलेंज कव्हर करण्यासाठी तिने सर्वात वेगवान महिला म्हणून विश्वविक्रम केल्याची माहिती आहे.