शबनम शेख : कुस्तीच्या मैदानातील रणरागिणी

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 4 Months ago
कुस्तीपटू शबनम शेख
कुस्तीपटू शबनम शेख

 

जेव्हा तिचं 'ती' असणं ती गृहीत धरू देत नाही तेव्हा 'पोरीच्या जातीनं कुस्तीसारखा रांगडा खेळ खेळायचा नसतो...', 'पडद्याशिवाय तिनं बाहेर पडायचं नसतं...,' 'जास्त शिकून तिचा काय उपयोग...,' असे एक ना अनेक नियम घालून देणाऱ्या चौकटी बिथरू लागतात. आतल्या आत मोठ्यानं आरोळ्या ठोकत असतात; पण तिच्यापुढं तसं बोलायला, तसं तिला सांगायला घाबरत असतात. होय! घाबरतच असतात! कारण, ती जेव्हा समाजाला घाबरत नाही तेव्हा समाज तिला घाबरतो. अशीच काहीशी कहाणी आहे देशभरात कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या आंबीजळगाव (तालुका : कर्जत, जिल्हा : अहमदनगर) इथल्या शबनम शब्बीर शेख या युवतीची.  

पुरुषी मानसिकतेला छेद देणाऱ्या शबनम यांचा जन्म २७ जून १९९६ रोजी जम्मू इथं झाला. शबनम यांचे वडील शब्बीर सदरभाई शेख लष्करात अधिकारी होते, तर आई रिज़्वाना बेगम गृहिणी. शबनम हे तीन भावंडांमधलं तिसऱ्या क्रमाकांचं अपत्य. शेंडेफळ. आधी दोन थोरले भाऊ. शबनम ११ दिवसांची असतानाच तिचे वडील तिच्यासह इतर कुटुंबीयांना वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते. आपली मुलगी धाडसी, स्वावलंबी आणि अमानुष रूढी-परंपरांना छेद देणारी असावी, अशी शबनमच्या वडिलांची पहिल्यापासूनच इच्छा होती.  

असा होता कुस्ती या विषयात पीएच.डी.पर्यंतचा प्रवास 
वडिलांच्या बदलीमुळे शबनम यांचं शालेय शिक्षण अंबाला (पंजाब), उधमपूर (जम्मू-काश्मीर), श्रीनगर (जम्मू-काश्मीर) व अहमदाबाद (गुजरात) इथल्या लष्करी शाळांमधून (आर्मी स्कूल) झालं. पुढं वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आंबेजळगावच्या 'न्यू इंग्लिश स्कूल'मधून शबनम शिकल्या. नंतर कर्जतच्या 'दादा पाटील महाविद्यालया'त त्यांनी इयत्ता अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र, आंबेजळगाव या छोट्याशा गावातून कर्जतला जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) खूपच कमी असायची. त्यामुळे शबनम यांच्या महाविद्यालयीन शिक्षणात अडचणी येऊ लागल्या. मात्र, 'काहीही झालं तरी मुलीला शिकवायचंच,' असा वडिलांचा मानस होता. शिक्षणादरम्यानही शबनम यांचा कुस्तीचा सराव सुरूच होता.

कुटुंबातल्या महिलांना-मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे, त्या सुशिक्षित झाल्याच पाहिजेत यावर शबनम यांचे वडील शब्बीर यांचा पहिल्यापासूनच कटाक्ष होता. त्यानुसार, शबनम यांची आई रिज़्वाना बेगम यांचं एमएस्सीचं शिक्षण लग्नानंतरही पूर्ण होईल असं शब्बीर यांनी पाहिलं. शबनम यांनी पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद गाठलं. तिथल्या 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी'तून त्यांनी 'बीपीई'चं (बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर पंजाबच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पतियाळा' इथून कोचिंग डिप्लोमा पूर्ण केला. पुढं औरंगाबादच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा'तून त्यांनी 'एमपीएड्'चं (मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन)  शिक्षण घेतलं. पुढं पीएच.डीला प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी 'पेट'ची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत राज्यातून पहिल्या पाचांमध्ये त्या आल्या.   

एकीकडं, समाजातल्या इतर मुली आयुष्यातली पहिली पावलं टाकायला काही वर्षे होत नाहीत कुठं त्यांना हिजाब घातले जात होते, तर दुसरीकडं, वयाच्या सातव्या वर्षापासून लहानगी शबनम रेसलिंगच्या (कुस्तीच्या) पोशाखात कुस्तीचा सराव करत होती. वडील स्वतः त्यांचा सराव घेत. त्यामुळे, 'वडील हेच आपले पहिले गुरू आहेत', असं शबनम मानतात. तसं स्थान त्या वडिलांना देतात.  
 

 
घरातूनच मिळाला कुस्तीचा वारसा 
शबनम यांचे आजोबा सदरभाई शेख परिसरातले नावाजलेले पैलवान. शबनम यांचे पणजोबाही पैलवान होते. त्यांच्या काळापासूनच घरात कुस्तीची तालीम होती. त्यामुळे आपल्या आजोबांना, वडिलांना, काकांना, मोठ्या भावांना मातीत कुस्तीचा सराव करत असलेलं पाहत पाहतच शबनम यांचं बालपण गेलं. त्या तालमीत परिसरातले इतर पुरुषही सरावासाठी येत. 

कबड्डी या खेळातून उतरल्या मैदानात
'महिला कुस्तीपटू' होण्यासाठी  शबनम यांना नातेवाइकांचा प्रचंड विरोध होता. महिलांना नेहमी 'पडद्यातच' पाहणाऱ्या लोकांना रेस्लिंगच्या (कुस्तीच्या) कपड्यांत शबनम यांना बघून लाज वाटायची...संकोच वाटायचा. त्यामुळे शबनम यांची क्रीडाक्षेत्रातली सुरुवात थेट कुस्तीतून न होता कबड्डी या खेळातून झाली. कबड्डीविषयीचे आपले अनुभव सांगताना शबनम म्हणतात, "मी कबड्डीत सुरुवातीला अनेक स्पर्धा केल्या. मात्र, या सांघिक खेळात काही ठिकाणी मला डावललं गेलं. कबड्डीविषयी नैराश्यात असतानाच, भावांना कुस्ती खेळताना बघून मला आतून वाटलं की,'मीही कुस्ती खेळले आणि जिंकले तर तो  माझा विजय असेल आणि हरले तर ते अपयशही माझंच असेल...' असा विचार करून, कुस्ती खेळण्याची माझी इच्छा मी वडिलांना बोलून दाखवली. आणि, वडिलांनी माझ्या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला."  
 
इथून सुरू झाली विजयाची मालिका
शबनम यांच्या वडिलांची मात्र एकच अट होती व ती अशी की, 'सुरुवातीची दोन वर्षं शबनमनं फक्त आणि फक्त सराव करायचा आणि मग पूर्वतयारीनिशी मैदानात उतरायचं.' वडिलांच्या आणि थोरल्या दोन भावांच्या मार्गदर्शनाखाली शबनम यांचा सराव सुरू झाला. रोज पहाटे चार वाजता दहा किलोमीटरवरच्या आपल्या शेतातून लिंबं तोडून आणायची, अशी शबनम यांची 'स्पर्धा' भावांबरोबर सुरू झाली! शबनम यांनी चिकाटीनं आणि सातत्यानं सराव केला आणि पुढं दोन वर्षांनंतर लुधियाना (पंजाब) इथं शबनम पहिल्या स्पर्धेत उतरल्या. त्या स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला आणि इथूनच त्यांच्या विजयाची मालिका सुरू झाली. 

शबनम : पहिल्या 'महाराष्ट्रकेसरी'च्या विजेत्या
सन २०१० मध्ये झालेल्या महिलांसाठीच्या पहिल्या 'महाराष्ट्र केसरी'च्या शबनम विजेत्या ठरल्या. सन २००९ पासून सलग तीन वर्षं 'शिर्डी साईकेसरी', २०११ मध्ये 'लातूरकेसरी', 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे'च्या स्पर्धेत सलग सहा वर्षं सुवर्णपदक अशी त्यांची बहारदार कामगिरी आहे. याशिवाय, चार आंतरविद्यापीठीय स्पर्धा, दहा राष्ट्रीय स्पर्धा आणि पंधरापेक्षा जास्त राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही त्यांनी भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरच्या 'महान भारतकुमारी कुस्तीस्पर्धे'तल्या शबनम या मुस्लिम समाजातल्याच नव्हे तर, महाराष्ट्रातल्या पहिल्या विजेत्या आहेत. विद्यापीठस्तरीय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी आपल्या खेळीनं गाजवल्या. 

वयाच्या दहाव्या वर्षी स्पर्धेसाठी केला एकटीनंच प्रवास 
शबनम सांगतात, "गावी असताना एकदा माझ्या वडिलांना दिल्लीत होणाऱ्या एका स्पर्धेबद्दल कळलं. तेव्हा मी दहा वर्षांची होते. रेल्वेगाडीचं तिकीट आणि पत्ता लिहिलेला कागद वडिलांनी माझ्या हातात सोपवला आणि पुढच्या प्रवासासाठी मला शुभेच्छा दिल्या. 'माझे आई-वडील मला सोबत म्हणून माझ्याबरोबर स्पर्धेला का येत नाहीत, असं तेव्हा मला सारखं वाटायचं. मात्र, मी स्वावलंबी व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. तसे ते नेहमीच माझ्यासोबत होते; मात्र, 'आयुष्यातल्या काही लढाया एकट्यानंच लढायच्या असतात,' अशी त्याची शिकवण होती व आहे."        

आई-वडिलांचा होता ठाम पाठिंबा    
शबनम यांना ‘पारंपारिक परदा’ पद्धत आवडत नसे. वडील त्यांना नेहमी सांगायचे : "तुला या बाह्य परदयाची गरज नाही. चांगली आणि वाईट माणसं यांच्यात फरक करणारा परदा माणसं ओळखणारा 'परदा' मात्र तुझ्या नजरेसमोर सदैव असू दे!" शबनम सांगतात, " 'मुलीनं कुस्तीसारखे खेळ खेळू नयेत... हिला उपवास शिकवा...नमाज शिकवा...कुस्तीत उतरवायला तुम्हाला मुलं नाहीत का?' असे प्रश्न समाजातले काही लोक माझ्या आई-वडिलांना सातत्यानं विचारायचे. माझ्या आई-वडिलांनी तसं करावं असा तगादाही लावायचे. मात्र, असा तगादा लावणाऱ्या कुणाच्याही बोलण्याचं दडपण माझ्या आई-वडिलांनी कधी घेतलं नाही व माझ्या खेळावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. माझे आई-वडील आणि माझे थोरले भाऊ यांचा पाठिंबा मला नेहमीच मिळत राहिला."
 
 
'माझ्या मुलीला तिचे सर्व अधिकार देईन...' 
शबनमच्या आई रिज़्वाना बेगम सांगतात, "मला दोन नव्हे तर, तीन 'मुलं' आहेत! माझ्या भावांनी मला आमच्या आई-वडिलांच्या मालमत्तेचा वाटा दिला नाही. मात्र,माझ्या मुलीच्या - शबनमच्या - बाबतीत मी हा अन्याय होऊ देणार नाही. मुलगी म्हणून तिच्या अधिकाराच्या, तिच्या वाट्याच्या सगळ्या गोष्टी मी तिला देईन. शबनमनं देशभरात आमचं नाव मोठ केलं आहे. आई म्हणून मला तिचा अभिमान नेहमीच वाटत राहील."   

कुस्तीत पीएच.डी. मिळवणारी देशातली पहिली महिला
'महाराष्ट्रातल्या ग्रामीण व शहरी महिला कुस्तीखेळाडूंच्या भावनिक परिपक्वतेचा तुलनात्मक अभ्यास' असा विषय शबनम यांनी पीएच.डीसाठी निवडला होता. राज्यभर फिरून या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केलं. आज शबनम 'कुस्ती या खेळात पीएच. डी. (डॉक्टरेट) पदवी प्राप्त करणारी भारतातली प्रथम महिला' ठरल्या आहेत. हा मान त्यांच्याकडं जातो. 'कुस्ती या विषयात पीएच.डी. करणारी व्यक्ती' हा मान शबनम यांना मिळू नये म्हणून त्यांना अडचणीत आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न अनेकदा केले गेले. मात्र, जराही न डगमगता शबनम आपली ठाम भूमिका प्रत्येक वेळी ठामपणे मांडत राहिल्या. त्यामुळेच, ही पदवी प्राप्त करणाऱ्या शबनम या एकमेव 'यंगेस्ट वूमन रेस्लर' ठरल्या आहेत.   
 
शबनम सध्या काय करतात? 
भारताच्या 'कुस्ती महिला संघा'च्या ज्युनिअर प्रशिक्षक (कोच) म्हणून शबनम यांची सन २०१७ मध्ये निवड झाली. तेव्हा 'सुलतान' या चित्रपटासाठी अनुष्का शर्मा यांना आणि नंतर सलमान खान यांना शबनम यांनी कुस्तीचं प्रशिक्षण दिलं. शबनम यांनी कझाकिस्तान, उझ्बेकिस्तान इथं भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारताच्या 'कुस्ती महिला संघा'त 'सीनिअर कोच' म्हणून त्या सध्या काम करतात. भारताला आतापर्यंत 'जागतिक महिला कुस्तीस्पर्धे'त कधीही यश मिळालं नव्हतं. मात्र, २०२३ मध्ये झालेल्या 'यू-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप'मध्ये शबनम यांच्या मार्गदर्शनाखाली 'महिलाकुस्ती'त देशाला एकूण सात पदकं मिळाली. त्यातली तीन सुवर्णपदकं आहेत. डॉ. शबनम शेख आज 'आंतरराष्ट्रीय कुस्ती-प्रशिक्षक' म्हणून ओळखल्या जातात.

आजही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय
शबनम सांगतात, "गेल्या वर्षी गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 'महाराष्ट्र टीम'ची कोच म्हणून माझी निवड झाली होती. सर्व प्रकारची व्हेरिफिकेशन्स झाल्यानंतर माझ्या नावानं सर्व बुकिंग्जही करण्यात आली होती. मात्र, स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायच्या चोवीस तास आधी माझं नाव रद्द करण्यात आलं! विशेष म्हणजे, याविषयीची कुठलीही पूर्वकल्पना मला देण्यात आली नव्हती. नंतर मला कळलं की, वरच्या कमिटीनं माझं नाव रद्द करून कमिटीला जवळच्या असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव तिथं ॲड केलं व त्या व्यक्तीची वर्णी तिथं लावण्यात आली. आजही काही ठिकाणी मला डावललं जातं; कारण मी स्वाभिमानानं जगते! मात्र, 'तू हे सगळं कसं मिळवलंस?' असं कुणी जेव्हा मला विचारतं तेव्हा मी त्यांना सांगते, 'हे मी माझ्या मेहनतीनं मिळवलंय.' आणि, हे यश मी मेहनतीनं मिळवलं असल्याचा मला अतिशय अभिमान आहे."   

कुस्तीमध्ये पीएच.डी. मिळवणारी देशातली पहिली महिला शबनम शेख. 
 
'तरी वाटतं, कुस्ती ही माझ्यासाठी शाप की वरदान?'
शबनम सांगतात, "कुस्तीनं मला ओळख दिली. मात्र, तरी कधी कधी मला प्रश्न पडतो की, 'कुस्ती ही माझ्यासाठी शाप आहे की वरदान?' सुरुवातीला नातेवाइकांना, समाजातल्या इतर लोकांना माझ्या कुस्ती खेळण्याचा तिटकारा होता. पुढं मी स्पर्धा जिंकू लागले तेव्हा हेच लोक सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरच्या त्यांच्या 'स्टेटस'वर माझ्या यशाची बातमी पोस्ट करायचे आणि कॅप्शन लिहायचे, 'ह्या यशाबद्दल आमच्या ताईचं अभिनंदन आणि शुभेच्छा!' मी जिंकल्याची बातमी वाचल्यावर त्या क्षणी आजही मी त्यांची नातेवाईक असते! परंतु, माझ्या कुस्ती खेळण्याला ते आजही माझ्या पाठीमागं विरोध दर्शवतच असतात! फक्त आज थेट समोर बोलायला दचकतात-बिचकतात एवढंच काय ते!"  

समाजातले लोक माझ्या लग्नाविषयी कशी मासलेवाईक भूमिका घेतात हे सांगताना शबनम म्हणतात, "कुस्ती खेळते म्हणून लग्नासाठी बहुतांश वेळा मी नाकारली जाते. मला लग्नासाठी पाहायला आलेले लोक जेव्हा माझ्या ट्रॉफीज् बघतात आणि माझ्या नावापुढची 'डॉक्टर' ही पदवी वाचतात तेव्हा, (नंतर ते आपल्या घरी गेल्यावर तिकडून) त्यांच्याकडून उत्तर येतं : 'इतकी शिकलेली मुलगी आम्हाला नकोय!' "       
 
तरीही निराश न होता आपलं काम शबनम सातत्याने पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात आपल्यासारख्या अडचणी इतर मुलींना येऊ नये म्हणून शबनम प्रयत्नशील आहेत. काहीही झालं तरी खचून जाऊन लढण सोडू नका, असा सल्ला शबनम तरुणाईला देतात. याशिवाय मुलींसाठी कुस्तीचं केंद्र उभं करण्याचं त्यांच स्वप्न आहे. 

कितीतरी चौकटी मोडून आलेल्या शबनम यांची ही संघर्षमय कथा ऐकली की अंगावर शहारे येतात. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य आणि डोळ्यांत विजयाची चमक दिसते. त्यांच्या शब्दांमध्ये धीरगंभीरता दिसते. त्यांच्याशी बोलताना त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याही अंगात लहरत असल्याचं भासतं. 

- छाया काविरे 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter