‘बीबीसी’ने तयार केलेला ‘इंडिया: दि मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट केंद्र सरकारने ब्लॉक केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज याबाबतचे निर्देश दिले. या माहितीपटाच्या पहिला भाग दर्शविणारे यूट्यूबवरील काही व्हिडिओ ब्लॉक करण्यात आले आहेत. केंद्राने ट्विटरलाही या माहितीपटाच्या यूट्यूबवरील व्हिडिओच्या लिंकचा उल्लेख असलेले ५० ट्विट ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘माहिती तंत्रज्ञान कायदा-२०२१’ अंतर्गत सरकारला बहाल करण्यात आलेल्या आपत्कालीन अधिकारांचा वापर करत हे निर्देश देण्यात आले आहेत.
ब्रिटिश सरकारची राष्ट्रीय प्रसारण सेवा असलेल्या ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) दोन भागांमध्ये हा माहितीपट तयार केला असून असून त्यात नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००२ साली झालेल्या धार्मिक दंगलीचे चित्रण मांडण्यात आले आहे. या माहितीपटामुळे वादंग निर्माण झाल्यानंतर काही निवडक प्लॅटफॉर्मवरून त्याचे व्हिडिओ डिलिट करण्यात आले होते. केंद्र सरकारने याआधीच या माहितीपटाबाबत नाराजी व्यक्त केली होती. या माहितीपटामध्ये देशाच्या सार्वभौमत्वाकडेच दुर्लक्ष करण्यात आले असून यामुळे भारताचे परकी राष्ट्रांसोबत असलेल्या संबंधांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे ‘बीबीसी’ने जरी या माहितीपटाचे समर्थन केले असले तरीसुद्धा ब्रिटन सरकारने मात्र त्यातील दावे खोडून काढले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भर संसदेमध्ये या माहितीपटामध्ये ज्या प्रकारचे चित्रण करण्यात आले त्याच्याशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे.
काही व्हिडिओ व्हायरल
हा माहितीपट अद्याप भारतामध्ये प्रसारित झालेला नसला तरीसुद्धा काही घटकांनी भारताविरोधातील अजेंडा रेटण्यासाठी त्याचे व्हिडिओ यूट्यूबवरील चॅनलवरून प्रसारित केल्याचे उघड झाले होते. विविध मंत्रालयातील अधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांनी पाहणी केल्यानंतर हा माहितीपट ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मान्यवरांची ‘बीबीसी’वर टीका
देशभरातील तीनशे मान्यवरांनी या माहितीपटाला आक्षेप घेत ‘बीबीसी’वर टीकेचे आसूड ओढले आहेत. यामध्ये निवृत्त न्यायाधीश, नोकरशहा आणि लष्करामधील निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ‘बीबीसी’चे भारत आणि येथील नेत्यांप्रतीचे अवलोकन पूर्वग्रहदूषित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे विरोधक याच मुद्यावरून सरकारला धारेवर धरू शकतात.