पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २३ जानेवारी रोजी अंदमान निकोबार द्विपसमूहातील २१ बेटांचे २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने नामकरण केले. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस बेटावरील नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचेही अनावरण केले. यावेळी आधीच्या सरकारांच्या विकृत वैचारिक राजकारणामुळे देशाच्या सामर्थ्याची उपेक्षा झाल्याचा हल्ला पंतप्रधान मोदींनी यावेळी कॉंग्रेसचे नाव न घेता चढविला. पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. २१ द्विपांच्या नामकरणातून सैन्यदलांच्या अद्वितीय शौर्याचा आणि पराक्रमाचा संदेश दिल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
सोबतच देशाच्या सामर्थ्याला कमी लेखणाऱ्या यापूर्वीच्या सरकारच्या विकृत वैचारिक राजकारणामुळे अंदमान – निकोबारची तसेच ईशान्य भारताची उपेक्षा झाल्याचे शरसंधानही त्यांनी साधले. मोदी म्हणाले की, ‘‘ ज्या २१ बेटांना नवे नाव मिळाले आहे, त्या नामकरणामध्ये गंभीर संदेश दडला आहे. एक भारत, श्रेष्ठ भारताचा देशासाठी बलिदान दिलेल्यांच्या अमरत्वाचा तसेच भारतीय सैन्य दलाच्या अद्वितीय शौर्य आणि पराक्रमाचा संदेश आहे. अंदमान ही देशाचा तिरंगा पहिल्यांदा मुक्तपणे फडकल्याची भूमी आहे. याच भूमीवर पहिल्या स्वतंत्र भारत सरकारची स्थापना झाली होती. यासोबतच अंदमानच्या याच धरतीवर वीर सावरकर आणि त्यांच्यासारख्या असंख्य वीरांनी देशासाठी बलिदानाची पराकाष्ठा केली होती.’’
नेताजींना विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न
‘‘ नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यानंतर कशाप्रकारे विस्मृतीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला हे सर्वांना माहिती आहे. परंतु, आज देश नेताजींचे क्षणाक्षणाला स्मरण करतो आहे.’’ अशा शब्दांत कॉंग्रेसशासित सरकारांचे नाव न घेता मोदींनी लक्ष्य केले. ते म्हणाले की, ‘‘ ईशान्य भारतातील राज्ये आणि अंदमान निकोबार द्वीपसमूह दुर्गम आणि अप्रासंगिक असल्याची धारणा बाळगली गेली. त्यामुळे हे भाग उपेक्षित राहिले आणि त्यांच्या विकासाकडेही दुर्लक्ष झाले. ’’