राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी वाचला जुनाच अर्थसंकल्प

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Ashok Gehlot
Ashok Gehlot

 

 
जयपूर:  विधानसभेत जुन्या अर्थसंकल्पाचे भाषण वाचण्याची घटना इतिहासात प्रथमच राजस्थानमध्ये शुक्रवारी घडली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आज सकाळी अर्थसंकल्प सादर करीत होते. आठ- दहा मिनिटांच्या भाषणानंतर पाणी पुरवठा मंत्री महेश जोशी यांनी ते जुना अर्थसंकल्प वाचत असल्याचे लक्षात आणून दिल्यावर गेहलोत यांनी भाषण थांबविले. विरोधकांनी याचा निषेध करीत सभागृहात गोंधळ घातला.
 
मुख्यमंत्री जुना अर्थसंकल्प वाचत असून अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. घोषणाबाजी करीत विरोधी आमदार विधानसभा अध्यक्षांच्या आसनापुढील हौदात आले. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर गेहलोत यांनी मुख्य सचिव उषा शर्मा यांना पाचारण करून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. कामकाज दुसऱ्यांदा सुरु झाले तेव्हा गेहलोत यांनी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, की अर्थसंकल्पाच्या या प्रतींमध्ये काही फरक असला तर सांगा. एक जादा पान चुकून जोडले गेले. ते पान मी चुकीने वाचला घेतले. यात अर्थसंकल्प फुटण्याचा प्रश्‍न येतो कोठून?
 
गेहलोत यांनी मागितली माफी
मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. मुख्यमंत्र्यांनी माफ मागावी, या मागणीवर भाजप आमदार अडून बसले होते. यामुळे कामकाज दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले. दोनदा स्थगित करण्यात आले. गेहलोत भाषणासाठी तिसऱ्या वेळी उभे राहिले तेव्हा त्यांनी सभागृहाची माफी मागितली. ‘जे काही झाली त्यासाठी मी खेद व्यक्त करतो,’ असे ते म्हणाले.
 
जुने भाषण कामकाजातून काढले
राजस्थानमध्ये अर्थसंकल्प सादर होताना विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याची वेळ सरकारवर प्रथमच आली. आज आधी अर्धा तासासाठी आणि नंतर १५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित करावे लागले. विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी सभागृहातील घटनाक्रमाबद्दल खेद व्यक्त केला. आज जे काही झाले, ते दुर्दैवी होते. मानवी चुका होत असतात. ही अघटित घटनेदरम्यानचे भाषण कामकाजातून काढून टाकण्यात येत आहे,’ असे त्यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री गेहलोत निष्काळजी’
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना काही भाग जुन्या अर्थसंकल्पातील वाचला. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलेले असतानाच भाजप नेत्या व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी गेहलोत यांनी लक्ष्य केले. ‘‘सीएम साहेब आठ मिनिटे जुना अर्थसंकल्प वाचत होते. इतिहासात असे प्रथमच घडले आहे. अर्थसंकल्प हा महत्त्वपूर्ण दस्तावेज असतो. मी जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी अर्थसंकल्प दोन-तीन वेळा वाचत होते. जो मुख्यमंत्री एवढ्या महत्त्वाच्या भाषणात निष्काळजीपणा दाखवू शकतो त्याच्या नेतृत्वाखाली राज्य किती सुरक्षित आहे?, हे तुम्हाला समजले असेलच.
 
केंद्रीय अर्थमंत्र्यांची टिप्पणी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज लोकसभेत अर्थसंकल्‍पावरील चर्चेला उत्तर देत असताना सत्ताधारी पक्षाकडून राजस्थानचा उल्लेख करण्यात आला. त्यावर ‘राजस्थान! नको बाबा, त्यांनी तर गेल्या वर्षाचा अर्थसंकल्प वाचला,’ अशी टिप्पणी सीतारामन यांनी गमतीने केली’ अर्थमंत्र्यांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला. तेव्हा या म्हणाल्या, की ही मानवी चूक आहे. ती कधीही कोणाकडूनही होऊ शकते. आज राजस्थानच्या विधानसभेत अशी चूक झाला म्हणून मी उल्लेख केला.