Defence Investiture Ceremony 2026 : देशाचे रक्षण करणाऱ्या मुस्लिम शूरवीरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव!
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 9 h ago
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कारांसाठी आयोजित 'संरक्षण सन्मान सोहळा-२०२६' (पहिला टप्पा) दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर मान्यवर.
नवी दिल्लीतील ऐतिहासिक राष्ट्रपती भवनामध्ये ८ जून २०२६ रोजी देशसेवेसाठी असीम शौर्य गाजवणाऱ्या शूरवीरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'डिफेन्स इन्व्हेस्टिचर सेरेमनी २०२६' च्या पहिल्या टप्प्यात लष्कर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील जवानांना मानाचे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या सोहळ्यात ७ कीर्ती चक्र, १५ वीर चक्र आणि २९ शौर्य चक्रांचे वितरण झाले. कर्तव्यावर असताना अचाट धाडस, अतुलनीय शौर्य आणि स्वतःच्या प्राणांची अजिबात पर्वा न करता शत्रूशी लढणाऱ्या या सुपुत्रांची यशोगाथा देशवासियांची मान अभिमानाने उंचवणारी आहे. त्यापैकीच काही मुस्लीम जवानांचा गौरव करणारा हा विशेष रिपोर्ट.
वीर चक्र (मरणोत्तर)
देशाच्या अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सब इन्स्पेक्टर (जीडी) मोहम्मद इम्तियाज यांना मरणोत्तर 'वीर चक्र' हा मानाचा लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. शत्रूच्या कारवाया मोडून काढताना आणि देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचा देश नेहमीच ऋणी राहील.
वीर चक्र
भारतीय हवाई दलामध्ये आपल्या अद्भूत कौशल्याने आणि धाडसाने शत्रूला सळो की पळो करून सोडणारे स्क्वॉड्रन लीडर रिझवान मलिक (फ्लाइंग पायलट) यांना 'वीर चक्र' देऊन गौरविण्यात आले. पराकोटीच्या जोखमीच्या मोहिमेमध्ये कठीण परिस्थितीत त्यांनी दाखवलेले समयसूचकता आणि शौर्य हवाई दलाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले आहे. त्यांच्या या देशसेवेचा आज राष्ट्रपती भवनात सन्मान झाला.
शौर्य चक्र
अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मोहिमेत शत्रूचा बिमोड करणारे २६ आसाम रायफल्सचे असिस्टंट कमांडर (सध्याचे डेप्युटी कमांडर) मोहम्मद शफिक यांना प्रतिष्ठेचा 'शौर्य चक्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुर्गम भागात आणि कितीतरी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या तुकडीचे नेतृत्व करत दाखवलेले शौर्य आणि रणकौशल्य थक्क करणारे आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) कॉन्स्टेबल (जीडी) सद्दाम हुसेन यांनी देशांतर्गत सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी मोहिमेत अचाट धैर्य दाखवले. जीवाची बाजी लावून शत्रूच्या मनसुब्यांवर पाणी फेरणाऱ्या या वीर जवानाला राष्ट्रपतींच्या हस्ते 'शौर्य चक्र' देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या असीम धैर्याच्या जोरावर अंतर्गत सुरक्षेचे चोख रक्षण करणारे कॉन्स्टेबल (जीडी) फिदा हुसेन दार यांना 'शौर्य चक्र' देऊन गौरविण्यात आले. संकटसमयी धीराने आणि शौर्याने शत्रूचा मुकाबला करत त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले. त्यांच्या याच अतुलनीय कामगिरीची दखल घेत आज देशाने त्यांचा मोठा गौरव केला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -