मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये साजरा होणार 'मासिका महोत्सव'

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
मुंबईत होणार मासिक पाळी 'साजरी' करणारा उत्सव!
मुंबईत होणार मासिक पाळी 'साजरी' करणारा उत्सव!

 

पाळीच्या रक्तस्रावाला शारीरिक संबंधांची खूण समजत संशय घेऊन १२ वर्षांच्या बहिणीची सख्ख्या भावाने हत्या केली. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे गेल्या आठवड्यात घडली. मुलीची पहिलीच पाळी असल्याने, हे रक्त कशाचे आहे, हे तिलाही माहीत नव्हते. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आवाज मराठी’वर मासिक पाळीविषयी प्रबोधन करणारे लेख प्रसिद्ध होत आहेत. त्यापैकीच हा एक लेख : मुस्लीम मोहल्यांमध्ये साजरा होणार 'मासिका महोत्सव'
--------------------------------------------------------------------
  
“मुस्लीम समाजात मासिक पाळीबद्दल लोक उघडपणे बोलत नाहीत. लोकांमध्ये याबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत. पाळी अपवित्र आहे, असे म्हटले जाते. समाजातील हेच  विचार बदलण्यासाठी आम्ही `मासिका महोत्सवा`चे आयोजन केले आहे. या अंतर्गत समाजातील पाळीविषयीचे गैरसमज दूर करून त्यांना बोलते करण्यासाठी आम्ही काही उपक्रम आखले आहेत. हा सप्ताह मुस्लिमबहुल भागात, म्हणजेच गोवंडी येथे, साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच मुस्लीम मुली व महिला या विषयावर उघडपणे बोलणार आहेत,” कोरो इंडिया संस्थेमध्ये काम करणारी गोवंडीतील अंजुम शेख सांगत होती.        

- छाया काविरे ([email protected]

समाजात सणांची फार मोठी भूमिका असते. सणांचे सौंदर्य हे आहे की त्यात कोणत्याही लिंगाचे, जाती-धर्माचे लोक सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ही सकारात्मक बाब लक्षात घेऊन, मासिक पाळीविषयीचे गैरसमज आणि समजुती दूर करण्यासाठी अंजुम शेख व रोहिणी कदम या तरुणींनी पुढाकार घेतला आहे. या दोघींनी `म्युझ फाउंडेशन`, 'महिला मंडळ फेडरेशन', 'युवा मंथन', 'राईट टू पी' आणि `कोरो इंडिया` या संस्थेच्या मदतीने मासिक पाळी दिनानिमित्त `मासिका महोत्सवा`चे आयोजन केले आहे. या अंतर्गत ता. २१ ते २८ मे या कालावधीत गोवंडी विभागातील मोह्ल्ल्यांमध्ये `मासिक सप्ताह` राबविण्यात येणार आहे. या आधीही या संघटनांनी 'हॅपी टु ब्लीड' नावाची मोहीम वस्त्यांमध्ये राबविली होती.  

याबाबत अधिक बोलताना रोहिणी कदम सांगते, “पवित्र-अपवित्र यापलीकडे जाऊन लोकांनी मासिक पाळीविषयी विचार करावा...मासिक पाळी या विषयावर अधिकाधिक चर्चा व्हावी...पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे लोकांच्या लक्षात यावं अशा विविध उद्देशांनी या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची आखणी करण्यापूर्वी वस्त्यांमध्ये या विषयाबाबतची मते एका सर्व्हेच्या साह्याने जाणून घेण्यात आली आणि त्यानुसार कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यात विविध खेळांचा समावेश असून त्या खेळांमधून पाळीसारख्या पवित्र घटकाबाबत कसे गैरसमज पसरत गेले, पाळीदरम्यान आरोग्याची कशी काळजी घ्यावी अशा विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध जाती-धर्मांच्या स्त्रिया, पुरुष, ट्रान्सजेंडर, वृद्ध, युवक, युवती यांना सामावून घेण्याचा प्रयत्न असेल." 

कशी झाली ‘मासिका महोत्सवा’ची सुरुवात? 
ता. २८ मे २०१७ रोजी `जागतिक मासिक पाळी दिना`निमित्त `मासिका महोत्सवा`ची सुरुवात करण्यात आली. `मासिका महोत्सव`चा साधा, सरळ अर्थ आहे `पीरिअड्स साजरे करणे`. हे मासिक पाळीच्या आरोग्यव्यवस्थापनाशी संबंधित असून अमृता मोहन आणि निशांत बंगेरा यांनी स्थापन केलेल्या `म्युझ फाउंडेशन` या संस्थेने हा उपक्रम भारतात पहिल्यांदा राबवला.

आपल्या समाजात युगानुयुगे चालत आलेली रूढीवादी मानसिकता मोडीत काढणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. भारतात सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यातीलच `मासिका महोत्सव` हा एक असा सण आहे, जिथे लोक लिंग-जात-धर्म किंवा इतर कोणत्याही अडथळ्यांची पर्वा न करता नैसर्गिक घटना, म्हणजेच मासिक पाळी, साजरी करण्यासाठी एकत्र येऊ शकतात. या उत्सवात कविता, गाणी, कला, नृत्य, क्रीडा आणि इतर अनेक उपक्रमांद्वारे लोकांमध्ये पाळीविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. 

सन २०१७ मध्ये झालेल्या पहिल्या `मासिका महोत्सवा`मध्ये कापडी पॅड बनवण्याची कार्यशाळा, मासिक पाळीच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देणारी सत्रे, कायमस्वरूपी उपायांचा परिचय, माहितीपूर्ण चित्रपट दाखवणे, लघुपट स्पर्धा, ओपनमाइक आणि स्ट्रीट आर्ट यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश होता. हे कार्यक्रम अहमदाबाद, चंपावत, डांग जिल्हा, बलसाड, पश्चिम मुंबई आणि ठाणे येथे वेगवेगळ्या संस्थांनी आयोजित केले होते.

सन २०१८ मध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कोलकाता, सिक्कीम आणि गुजरात यांसह विविध राज्यांमध्ये 'किक द टॅबू' या नावाने `महिला फुटबॉल स्पर्धा` आयोजित करण्यात आली होती, तर, 'ग्रीन द रेड टीम' आणि ‘रामकृष्ण संवेदना ट्रस्ट’च्या स्वयंसेवकांच्या चमूने ता. २१ मे रोजी मासिक पाळीविषयी जागरूकता सप्ताह सुरू केला होता. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात मासिक पाळीतील स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात, १.८ अब्ज स्त्रियांना दर महिन्याला मासिक पाळी येते, त्यापैकी किमान ५०० दशलक्ष स्त्रियांमध्ये मासिक पाळीतील आरोग्याविषयीच्या माहितीचा आणि साधनांचा अभाव आहे. बांगलादेशातील फक्त सहा टक्के शाळा MHM (Menstrual Hygiene Management) विषयी शिक्षण देतात. UNESCO आणि P&G (२०२१) च्या अभ्यासानुसार, भारतात मासिक पाळी येणाऱ्या ४० कोटी स्त्रियांपैकी फक्त २० टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. त्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ७१ टक्के किशोरवयीन मुली त्यांना पहिली मासिक पाळी येईपर्यंत मासिक पाळीविषयी अनभिज्ञ असतात, पाळीविषयी त्यांना काहीच माहिती नसते. असे असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर परिणाम होतो.  

`राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६` नुसार भारतातील ५८ टक्के महिला सॅनिटरी पॅड वापरतात. हे प्रमाण शहरी भागात ७८ टक्के, तर ग्रामीण भागात केवळ ४८ टक्के आहे. 

भारतात `मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापना`ला प्रोत्साहन देण्यासाठी काही कार्यक्रम राबवले जातात :
• आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची ‘मासिक पाळी स्वच्छता योजना’
• महिला आणि बालविकास मंत्रालयाचा ‘सबला कार्यक्रम’ 
• ग्रामीण विकास मंत्रालयाचे ‘राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान’ 
• स्वच्छताविषयक लिंगसमस्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (२०१७)

मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. तरीही त्याभोवती असलेल्या निषिद्ध गोष्टी अजूनही प्रचलित आहेत. मासिक पाळीमुळे एका नवीन जिवाचे अस्तित्व निर्माण होत असते; परंतु अनेक महिलांना आणि मुलींना पाळीचे महत्त्व ठाऊक नसते आणि पाळीच्या काळात योग्य स्वच्छता कशी राखायची आणि कुठल्या प्रकारची वैद्यकीय काळजी घ्यायची याचीही माहिती नसते. पाळीच्या आगेमागे पायात पेटके येणे, संप्रेरकीय बदल (हार्मोनल चेंजेस), अशक्तपणा आणि मासिक पाळीशी संबंधित तथाकथित सामाजिक कलंक यांमुळे महिलांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत असते. ओडिशात `राजा परबा` आणि आसाममधील `अंबुबाची मेळा` हे सण अनेक वर्षांपासून साजरे केले जातात. मासिक पाळीच्या प्रक्रियेकडे सहजतेने कसे पाहावे, मुलींच्या-महिलांच्या आयुष्यात घडून येणारी ती एक सर्वसामान्य मासिक घटना कशी आहे हे दृष्टिकोन रुजवण्यासाठी या सणांचे आयोजन त्या त्या राज्यात केले जाते, तर दुसरीकडे, मासिक पाळीदरम्यान स्त्रीला बऱ्याचदा अपवित्रही मानले जाते,  पाळीच्या कालावधीदरम्यान तिची वावरण्याची व्यवस्था (उठणे-बसणे, जेवणे, झोपणे) घरातल्या घरातच वेगळी केली जाते, स्वतंत्ररीत्या केली जाते, असे चित्र आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. मासिक पाळीदरम्यान मुलींना कर्मकांड करण्यापासून आणि इतर धार्मिक कार्यांत भाग घेण्यापासूनही रोखले जाते. परिणामी, समाजात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आणि लैंगिक असमानता निर्माण होतात. 

`मासिका महोत्सवा`सारखे उत्सव मासिक पाळीबद्दल मुक्त संभाषण सुरू करण्यास आणि स्त्रियांना चांगलं मासिक आरोग्य प्राप्त करून देण्यास मदतशील ठरू शकतात.

मासिक पाळीविषयीचे हेही लेख वाचा 👇🏻