मासिक पाळीविषयी मोकळेपणे व्यक्त व्हा!

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
मासिक पाळीविषयची चुप्पी सोडूयात...
मासिक पाळीविषयची चुप्पी सोडूयात...

 

पाळीच्या रक्तस्रावाला शारीरिक संबंधांची खूण समजत संशय घेऊन १२ वर्षांच्या बहिणीची सख्ख्या भावाने हत्या केली. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे गेल्या आठवड्यात घडली. मुलीची पहिलीच पाळी असल्याने, हे रक्त कशाचे आहे, हे तिलाही माहीत नव्हते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आवाज मराठी’वर मासिक पाळीविषयी प्रबोधन करणारे लेख प्रसिध्द होणार आहेत. त्यापैकीच हा एक लेख : ‘मोकळे व्हा!’
--------------------------------------------------------------------

मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेवर आता मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे. आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया म्हणून व आपल्या आरोग्याची काळजी म्हणून आपणच बोलणे गरजेचे आहे. मासिक पाळीविषयी समज-गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्याहून अधिक मासिक पाळीविषयी चर्चा होणेही तितकेच गरजेचे आहे. चला तर मग मासिक पाळीविषयी खुलेपणाने बोलूयात.
- स्वाती शिरतर

"मासिक पाळी म्हटले की घाण रक्त, त्याबद्दल वाटणारी किळस आणि त्याचबरोबर मोठे असे प्रश्‍नचिन्ह. याविषयी न बोलणे, होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास, बंधने हे सगळे समोर उभे राहते आणि त्यातून मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो.'' किशोर वयात आल्यानंतर पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काहीतरी वेगळं घडतंय! असं नेमकं का होतंय? असे अनेक प्रश्‍न मनाला भेडसावत असतात. या वयात मासिक पाळीविषयी नेमकं कोणाला विचारायचं तर पहिला आणि शेवटचा पर्याय म्हणजे आई! पण बऱ्याच वेळा असा अनुभव आला आहे, की आईला मासिक पाळीविषयी विचारले असता, समाधानकारक असे उत्तर मिळत नाही. "फक्त या वयात असे घडतच असते, आता तू मोठी झाली आहेस, तुझ्या वयातील सर्वच मुलींना असे होत असते, तू काही काळजी करू नकोस, हे काही तुझ्यासाठी नवीन नाही. या वयात आपल्यासारख्या सर्वच मुलींना मासिक पाळी येते, हे जरी समजले असले तरी ते का?' येते त्याची नेमकी कारणे काय आहेत, या विषयी स्पष्टता नसते. परिणामी मासिक पाळीच्या काळात मुलींचे बाहेर फिरणे, खेळायला जाणे व इतर शारीरिक हालचालींवर बंधने येऊ लागतात आणि ही मासिक पाळी मुलींना नकोशी वाटायला लागते. ज्याप्रमाणे स्त्रीने बाळाला जन्म देणे हे जितके नैसर्गिक मानले गेले आहे, तितकीच मासिक पाळी हेदेखील नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे त्या वयातील किशोरींना समजून सांगायला आपण कमी पडतो.

सीवायडीए या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले की, ३० टक्के मुलींच्या मते मासिक पाळीचे रक्त घाण असते. ४५ टक्के मुलींचे असे म्हणणे आहे की, मासिक पाळीमध्ये वापरलेले कापड कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी सुकायला घातले पाहिजे. ४१ टक्के मुलींमध्ये मासिक पाळी संदर्भात अनेक प्रकारचे गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. त्या म्हणजे अशा, की देवळात जाऊ नये. मासिक पाळीमध्ये वापरलेले कापड कोणत्याही प्राण्याच्या तोंडात गेले की बाळ होत नाही, याच दिवसांमध्ये घरामध्ये जे लोणची पापड असतात त्याला हात लावू नये, नाही तर ते खराब होते.

मासिक पाळीदरम्यान कोणत्याही परपुरुषाशी संबंध येऊन ती गर्भवती राहू नये, याकरिता काही सामाजिक बंधने घातलेली दिसतात. ज्यात मंदिरात प्रवेश न करू देणे, बाजूला बसवणे, देवपूजा करू न देणे इत्यादींचा समावेश होतो आणि याही पुढे जाऊन घरातून बाहेर जाण्यास मज्जाव करणे, स्वयंपाकगृहात प्रवेश करू न देणे, शारीरिक हालचालींवर बंधने घालणे, खेळू न देणे, पुरुषांशी बोलू न देणे, इत्यादींचा समावेश त्यात होतो.

एससीएने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालानुसार भारतातील ३१ टक्के स्त्रिया, युवतींना मासिक पाळीच्या दरम्यान जास्त प्रमाणात मोकळेपणा वाटत नाही व २९ टक्के जणींना मोकळेपणा जाणवत नाही. या आकडेवारीचा विचार केला असता, अशी उत्तरे येण्याचे हे कारण असू शकते की, मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुळातच चुकीचा आहे.

हा दृष्टिकोन चुकीचा असण्याची कारणे :
१) जनजागृतीचा अभाव : एका प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात २०० मिलीयन स्त्रिया, युवतींमध्ये जनजागृतीचा अभाव आहे.
२) आवश्‍यक गोष्टींचा अभाव : ८८ टक्के स्त्रिया या घरगुती उपलब्ध असलेल्या जुन्या कापडांचा वापर करतात, ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
३) सुविधांचा अभाव : भारतातील ६३ टक्के महिला, युवतींच्या घरात शौचालयाची सुविधा नाही. शाळांमध्ये अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शौचालयांमुळे दरवर्षी २३ टक्के मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण दिसून आले आहे.

हा लेखही वाचा 👇🏻