Shakti Samvaad 2026 : महिलांचे अधिकार आणि सुरक्षेसाठी श्रीनगरमध्ये मोठा उपक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) वतीने जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे १६ आणि १७ मे रोजी 'शक्ती संवाद' या महत्त्वपूर्ण सल्लागार कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात महिलांचे हक्क, सुरक्षा, सक्षमीकरण आणि संस्थात्मक समन्वय या विषयांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील विविध राज्यांचे महिला आयोग एकत्र आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगांमधील सहकार्य मजबूत करणे, महिलांच्या तक्रारींचे निवारण आणि कायदेशीर जागरूकता वाढवणे हा या संवादाचा मुख्य उद्देश आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह करणार मार्गदर्शन
या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह संबोधित करणार आहेत, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या देखील उपस्थितांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमात ज्येष्ठ सरकारी अधिकारी, कायदेशीर तज्ज्ञ, कायदा अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि विविध राज्यांच्या महिला आयोगांचे सदस्य सक्रियपणे सहभागी होत आहेत. महिलांचे हक्क आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसमावेशक संवाद आणि समन्वित प्रशासनाचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित केले जात आहे.

विविध कायदेशीर मुद्द्यांवर होणार मंथन
या दोन दिवसीय परिषदेत महिलांच्या हक्कांच्या दृष्टिकोनातून राज्य कायद्यांचे पुनरावलोकन, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी महिलांविषयी दिलेले अलीकडील निकाल, महिलांचा छळ रोखण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक उपाययोजना आणि नवीन कामगार कायद्यांतर्गत महिलांसाठी सुरक्षा कवच यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. 

याशिवाय विजया रहाटकर १९ मे रोजी शेर-ए-काश्मीर विद्यापीठात 'कॅम्पस कॉलिंग' या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक (POSH) जागरूकता कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच त्या तक्रार निवारणासाठी 'जन सुनावणी' घेतील आणि 'लाला देद राष्ट्रीय पुरस्कार' सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.