बीड
सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या प्री-वेडिंग फोटोशूट आणि रीलमुळे बीडमधील एका १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आले आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा विधायक वापर आणि प्रशासकीय तत्परता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह २३ वर्षीय तरुणासोबत निश्चित करण्यात आला होता. दरम्यान, या जोडप्याचे प्री-वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंची माहिती मिळताच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर १९ जून रोजी हा विवाह रोखण्यात आला.
माहिती मिळताच पथकाने तातडीने संबंधित गावात धाव घेतली. सुरुवातीला तिथे लग्नाचे कोणतेही स्पष्ट पुरावे आढळले नाहीत, परंतु मुलीच्या हातावर लावलेली मेहंदी आणि त्यावर लिहिलेले नवरदेवाचे नाव पाहून प्रशासनाला संशय आला. सोशल मीडियावरील फोटोंची दखल घेत पथकाने अल्पवयीन मुलीला तात्काळ ताब्यात घेतले आणि तिला सुरक्षित ठिकाणी हलवले. बालविवाहाचे हे कारस्थान उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.