West Bengal : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर उसळलेला तणाव; हिंसाचारप्रकरणी ३५ जणांना बेड्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
बारुईपूर पोलिसांची कारवाई
बारुईपूर पोलिसांची कारवाई

 

पश्चिम बंगालमधील एका ११ वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आणखी ५ जणांना अटक केली आहे. या कारवाईसह आतापर्यंत या प्रकरणातील अटकेतील एकूण संख्या ३५ वर पोहोचली आहे. बारुईपूर पोलीस जिल्ह्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या रात्रभराच्या धाडींनंतर ही अटक करण्यात आली.

हिंसाचारातील आरोपींवर कारवाई
बारुईपूर पोलीस जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचार प्रकरणात सामील असलेल्या प्रत्येकाच्या भूमिकेची तपासणी केली जात आहे. "आम्ही हिंसाचाराच्या विविध घटनांतील आरोपींचा शोध घेत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अनेक संशयितांची ओळख पटली आहे," असे त्यांनी सांगितले. 

पोलीस कर्मचारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या शनिवारी बारुईपूर येथील एक ११ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर संतप्त जमावाने एका व्यक्तीला (इंद्रजित मंडल) पीडितेच्या हत्येचा संशय घेत जमावाने मारहाण केली होती. याव्यतिरिक्त, जमावाने रस्ते रोखून धरले, रेल्वे रुळांचे नुकसान केले आणि पोलिसांवर हल्ला करत वाहनांची मोडतोड केली होती.

तपासाची व्याप्ती
या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा इंद्रजित मंडल याच्या हत्येबाबत, तर दुसरा गुन्हा पोलिसांवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल दाखल आहे. यापूर्वी बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी आनंद सरदार, प्रभास मंडल, दिवाकर सरदार आणि कबीर मोल्ला या चौघांना अटक केली आहे. 

दरम्यान, पोलीस तपासादरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस चकमकीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.