'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
'विकीलिक्स'चे संस्थापक असांज
'विकीलिक्स'चे संस्थापक असांज

 

विकीलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना लंडनमधील न्यायालयाने आज मोठा दिलासा देताना कथित हेरगिरीच्या प्रकरणावरून त्यांच्या अमेरिकेतील प्रस्तावित प्रत्यार्पणाला आव्हान देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

मागील दशकभरापासून याच मुद्यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. असांज हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. इक्वेडोरच्या दूतावासातून त्यांना २०१९ मध्ये ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी लंडनच्या बेलमार्श येथील तुरुंगात करण्यात आली होती. असांज यांनी विकीलिक्सच्या संकेतस्थळावर गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून हजारो लोकांचे प्राण धोक्यात घातले असल्याने त्यांच्यावर खटला चालविण्यात यावा यासाठी अमेरिकी सरकार आग्रही होते. लंडनमधील न्यायालयात याप्रकरणी खटला सुरूही झाला होता.

असांज यांच्या वकिलांनी मात्र त्यांच्याविरोधातील खटला हा राजकीय भावनेतून प्रेरित असल्याचे म्हटले होते. ‘रॉयल कोर्ट ऑफ जस्टीस’मधील हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशांनी असांज यांना प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात आव्हान देण्याची मुभा दिली आहे. असांज यांची ही कायदेशीर लढाई आणखी एक वर्षापर्यंत चालू शकते. आपण विकीलिक्सच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून कसल्याही प्रकारची चूक केलेली नाही. या माध्यमातून २०१० मधील अमेरिकेचे युद्ध गुन्हेच चव्हाट्यावर आणल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला होता.

मृत्युदंडाला विरोध
अमेरिकेच्या राज्यघटनेतील पहिल्या सुधारणेला अनुसरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याबरोबरच असांज यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ नये अशी हमी दिली जाऊ म्हणून त्यांची कायदा सल्लागारविषयक टीम आग्रही होती. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला अनुकूलता दर्शविली.