बांगलादेश स्टुडंट्स लीगचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी मंगळवारी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर कठोर टीका केली. पाकिस्तानशी वाढती जवळीक धोकादायक आहे, असे ते म्हणाले. यामुळे १९७१ च्या मुक्तिसंग्रामाचा वारसा अपमानित होत असून प्रादेशिक स्थैर्य धोक्यात आहे.
हुसेन यांनी अवामी लीगशी संलग्न तरुणांचे प्रतिनिधित्व करताना सांगितले की, युनूस सरकार पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आणि कट्टरपंथी संघटनांना पाठिंबा देत आहे. “जे लोक आमच्या भूमीवर नरसंहारासाठी जबाबदार होते, त्यांना कायदेशीर मान्यता दिली जात आहे,” असे त्यांनी नमूद केले. जमात-ए-इस्लामी, हिजब उत-तहरीर, अन्सारुल्लाह बांगला टीम आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या पाकिस्तानशी संबंधित कट्टरपंथी गटांना राज्यस्तरावर पाठिंबा मिळत असल्याचा त्यांचा दावा आहे.
युनूस सरकार बांगलादेशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप हुसेन यांनी केला. बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचे धनमोंडी ३२ येथील निवासस्थान उद्ध्वस्त करण्यात आले. मुक्तिसंग्रामाच्या स्मारकांचे आणि संस्थांचे नुकसान झाले आहे. “हा केवळ इतिहास बदलण्याचा प्रयत्न नाही, तर तो हेतुपुरस्सर पुसला जात आहे,” असे ते म्हणाले.
हुसेन यांनी सांगितले की, मागील हल्ल्यांमध्ये दोषी ठरलेल्या कट्टरपंथींना सोडण्यात येत आहे आणि त्यांना संरक्षण दिले जात आहे. या गटांनी जुलै-ऑगस्टमध्ये पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरुद्धच्या राजकीय उलथापालथीत भूमिका बजावली होती. आता त्यांना बक्षीस म्हणून संरक्षण मिळत आहे, असे ते म्हणाले. यामुळे बांगलादेश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र बनण्याचा धोका आहे.
अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात ५ ऑगस्टपासून लक्षणीय वाढ झाली आहे. हिंदूंसह अल्पसंख्याक समुदाय भीतीच्या छायेत जगत आहेत. २,२०० हून अधिक घटनांमध्ये हत्य, लूट, जबरदस्तीने बेदखल करणे आणि मंदिरांवर हल्ले झाले आहेत, असे हुसेन म्हणाले. अल्पसंख्याकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यांची नावे काळ्या यादीत टाकली जात आहेत. धार्मिक स्वातंत्र्य जवळपास संपुष्टात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
नोबेल पारितोषिक विजेते युनूस परदेशात शांतता आणि लोकशाहीबद्दल बोलतात, पण त्यांच्या कारकिर्दीत बांगलादेशी नागरिकांचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका हुसेन यांनी केली. अवामी लीगच्या समर्थक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले की, बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित व्हावी. अवामी लीग हाच एकमेव राजकीय पक्ष आहे जो सर्वसमावेशक शासन आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये राखू शकतो, असे ते म्हणाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter