दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तांचे निवासस्थान आणि उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स पोलिसांनी हटविले आहेत. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तालयामध्ये घुसखोरी करून तिरंगा ध्वजाचा अपमान केला होता. यावेळी ब्रिटिश सरकारने पुरेशी सुरक्षा दिली नसल्याची भारताने नाराजी व्यक्त केली होती. त्या घटनाक्रमानंतर आजची दिल्ली पोलिसांची कारवाई ब्रिटनला जशास तसे संदेश देण्याचा प्रयत्न मानले जात आहे.
ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस आणि आणि चाणक्यपुरी भागात असलेल्या ब्रिटिश आयुक्तालयासमोरील सुरक्षा बॅरिकेड हटविण्यात आले. ब्रिटिश उच्चायुक्त देशाबाहेर आहेत. या कारवाईबाबत ब्रिटिश उच्चायुक्तालयाने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. तर, वाहतुकीला अतिरिक्त बॅरिकेड्समुळे अडथळे येत असल्याने ते हटविण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. अर्थात, ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या बाहेरील सुरक्षाव्यवस्थेमध्ये काहीही बदल झालेला नसल्याचाही खुलासा दिल्ली पोलिसांनी केला.
सध्या फरार असलेला ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपालसिंग आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध झालेल्या पोलिस कारवाईनंतर खलिस्तान समर्थकांनी रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला केला होता. उच्चायुक्तालयावरील तिरंगा ध्वज या खलिस्तान समर्थकांनी खेचला होता. अर्थात, या घटनेनंतर काही वेळातच भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी मोठा तिरंगा ध्वज फडकावला होता. मात्र, अशा घटनेबाबत ब्रिटिश सरकारला गुप्तचर यंत्रणांनी कळवूनही लंडन पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले होते.
त्यामुळे भारतात याची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या उपायुक्त क्रिस्टिना स्कॉट यांना पाचारण करून सुरक्षेबद्दल सवाल केला होता. तसेच खरमरीत शब्दात समजही दिली होती. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्तालयासमोरील सुरक्षा बॅरिकेड्स आज हटविण्यात आले.