इस्तंबूल, (पीटीआय) : स्वीडनमध्ये इस्लामविरोधी विचारांचा नेता रास्मुस पलुडन याने कुरआनची प्रत जाळल्याची तीव्र प्रतिक्रिया तुर्कियेमध्ये उमटत असून संतप्त नागरिकांनी अंकारा येथील स्वीडनच्या दूतावासासमोर जमत रास्मुस पलुडन याचे छायाचित्र जाळले. या प्रकारामुळे दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रास्मुस पलुडन हा अतिउजवी विचारसरणी असलेल्या ‘द हार्डलाइन’ या पक्षाचा नेता आहे. त्याने स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथील तुर्कियेच्या दूतावासासमोर मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या कुरआनची प्रत जाळली. त्यामुळे त्याच रात्रीपासून तुर्कियेमध्ये रास्मुस आणि स्वीडनविरोधात निदर्शने सुरु आहेत. तुर्कियेमध्ये आंदोलकांनी इस्तंबूलमध्ये आणि अंकारा येथील स्वीडनच्या दूतावासाबाहेर जमत रास्मुस पलुडनचे छायाचित्र जाळले. इस्लामविरोधाला पाठबळ देण्याच्या स्वीडनच्या धोरणालाही त्यांनी विरोध केला. तुर्कियेच्या अधिकाऱ्यांनीही कुरआनची प्रत जाळली जात असताना काहीही कारवाई न केल्याबद्दल स्वीडन सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांनी, ‘जे कायद्याच्या दृष्टीने अयोग्य नाही, ते नैतिकदृष्ट्या योग्यच असेल असे नाही,’ असे सांगतानाच कुरआन जाळणे ही चुकीची घटना असल्याचे स्पष्ट केले.