इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये; इस्रायलला प्रतिहल्ला न करण्याचा दिला सल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इराणच्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्याला उत्तर न देण्याचे आवाहन केले आहे. असा कोणताही प्रतिहल्ला केल्यास गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

शांतता कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात

इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यानंतर ट्रम्प यांनी तात्काळ नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही देशांमधील ताज्या तणावामुळे शांतता प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. ट्रम्प यांनी इराणलाही चर्चेच्या टेबलावर परतण्याचे आवाहन केले आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "आम्ही कराराच्या अगदी जवळ आहोत. येत्या सोमवार, मंगळवार किंवा बुधवारपर्यंत यावर स्वाक्षरी होऊ शकते, अशा स्थितीत हा हल्ला झाला आहे. इराणने क्षेपणास्त्रे डागली, आता ते पुरे झाले. त्यांनी पुन्हा चर्चेला यावे आणि करार करावा."

'दोन्ही देशांनी आपापली हौस भागवली'

ऍक्सिओस या अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही, त्यामुळे इस्रायल याला उत्तर देणार नाही अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. "जर बिबी (नेतन्याहू) यांनी पुन्हा प्रतिहल्ला केला, तर हा संघर्ष गेल्या ४७ वर्षांसारखा किंवा ३,००० वर्षांसारखा अविरत सुरूच राहील. दोन्ही देशांनी आपापली हौस भागवली आहे. इस्रायलने आधी हल्ला केला होता आणि आता इराणने केला आहे. आता आपल्याला आणखी एका हल्ल्याची गरज नाही," असे स्पष्ट मत ट्रम्प यांनी मांडले.

फायनान्शियल टाइम्सशी बोलताना ट्रम्प यांनी असेही नमूद केले की, अमेरिका आणि इराण दरम्यान जो काही अंतिम करार होईल, तो नेतन्याहू यांना स्वीकारावाच लागेल. या संपूर्ण प्रक्रियेची सूत्रे आपल्या हातात असल्याचे ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले. रविवारी इस्रायलने बैरुतवर केलेल्या हल्ल्यांवरही ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना काही काळ शांत राहण्यास सांगितले असून अमेरिका एका चांगल्या कराराच्या उंबरठ्यावर आहे. सुरुवातीला नेतन्याहू यांनी याला आक्षेप घेतला असला, तरी अखेर त्यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेला अंशतः संमती दर्शवली आहे.




Latest News