Philippines Earthquake : फिलिपिन्सच्या भूकंपामुळे जपान आणि मलेशियालाही सुनामीचा धोका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दक्षिण फिलिपिन्सच्या मिंडानाओ (Mindanao) भागात सोमवारी सकाळी ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भीषण भूकंपामुळे किनारपट्टी भागात सुनामीचा (Tsunami) मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि उंचावरील ठिकाणी जाण्याचे तातडीने आवाहन केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून नुकसान आणि जीवितहानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

किनारपट्टीवर ३ मीटर उंच लाटांचा धोका

फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होल्कॅनोलॉजी अँड सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू मिंडानाओ बेटावरील जनरल सांतोस शहराच्या नैऋत्येस १३ किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३७ वाजता हे धक्के बसले. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने दिलेल्या इशाऱ्यानुसार, फिलिपिन्सच्या काही किनारपट्टीवर ३ मीटर (सुमारे १० फूट) उंचीच्या सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या किनारपट्टीवरही १ मीटर उंच लाटा धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आजूबाजूच्या देशांमध्येही जाणवले धक्के

इन्स्टिट्यूटचे प्रमुख तेरेसिटो बाकोलकोल यांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना तातडीने उंचावरील भागात किंवा जमिनीच्या आतल्या भागात स्थलांतरित होण्याचा इशारा दिला आहे. भूकंपाचे हे तीव्र धक्के इंडोनेशियाच्या उत्तर सुलावेसी आणि उत्तर मालुकू प्रांतातील नागरिकांनाही जाणवले.

याव्यतिरिक्त तैवान, जपान, गुआम आणि पापुआ न्यू गिनी यांसारख्या देशांमध्ये आणि पश्चिम पॅसिफिक महासागरातील काही बेटांवर सुनामीच्या लहान लाटा येण्याची शक्यता आहे. फिलिपिन्स हा देश 'रिंग ऑफ फायर' (Ring of Fire) या अत्यंत संवेदनशील भौगोलिक क्षेत्रात येत असल्याने तिथे वारंवार भूकंप आणि ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. याशिवाय दरवर्षी सुमारे २० चक्रीवादळे आणि उष्णकटिबंधीय वादळे या द्वीपसमूहाला धडकतात.




Latest News