इराणकडून रविवारी झालेल्या क्षेपणास्त्र माऱ्याला चोख उत्तर म्हणून इस्रायलने सोमवारी पहाटे मध्य आणि पश्चिम इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले आहेत. या ताज्या लष्करी कारवाईमुळे संपूर्ण मध्य पूर्व आशिया पुन्हा एकदा प्रादेशिक युद्धाच्या खाईत लोटला जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इस्फहान, करज, तब्रिज आणि राजधानी तेहरानमध्ये प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले. तेहरानमधील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, शहराच्या पश्चिमेकडील भागात किमान एक मोठा स्फोट झाला. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणने तातडीने सावधगिरीचे पाऊल उचलत तेहरानमधील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतीची हवाई हद्द (Airspace) सर्व प्रकारच्या उड्डाणांसाठी पूर्णपणे बंद केली आहे.
इस्रायली लष्कराने पहाटेच्या सुमारास हल्ले सुरू झाल्यावर एक संक्षिप्त अधिकृत निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, "काही वेळापूर्वी इस्रायली हवाई दलाने पश्चिम आणि मध्य इराणमधील इराणी राजवटीच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले केले आहेत." मात्र, इराणमधील अधिकाऱ्यांनी नेमक्या कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यात किती नुकसान झाले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. इराणच्या निमलष्करी 'रिव्होल्युशनरी गार्ड'ने (Revolutionary Guard) प्राथमिक माहिती देताना सांगितले की, इस्रायलने या हल्ल्यात हवेतून डागल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा (Air-launched ballistic missiles) वापर केला आहे.
इस्रायलने इराणवर केलेल्या या हल्ल्यानंतर शेजारील सौदी अरेबियामध्येही खळबळ उडाली आहे . सौदी अरेबियातील अमेरिकन सैन्याचा तळ असलेल्या 'प्रिन्स सुलतान एअर बेस' परिसरामध्ये सोमवारी सकाळी क्षेपणास्त्र हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजले. सौदीच्या सरकारी माध्यमांनी अल खर्ज प्रांतातील या एअर बेसवर अलर्ट जारी केला होता, मात्र काही वेळानंतर हा धोका टळल्याचे जाहीर करण्यात आले .
दुसरीकडे, सोमवारी इस्रायलमध्येही युद्ध पातळीवर सायरन वाजले . येमेनमधून इस्रायलच्या दिशेने एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले . येमेन हे इराणचे समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांचे मुख्य केंद्र आहे . इस्रायलच्या आपत्कालीन बचाव सेवांनी दिलेल्या माहितीनुसार, येमेनमधून झालेल्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झालेले नाही . या संपूर्ण हवाई हल्ल्यांविषयी आणि यात अमेरिकेचा काही सहभाग होता का, याबाबत व्हाईट हाऊसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही .