मोदी-ट्रम्प यांच्यातील फोन कॉलमध्ये एलन मस्क सहभागी; न्यूयॉर्क टाइम्सच्या दाव्याने जगभरात खळबळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
डावीकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अब्जाधीश एलन मस्क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
डावीकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अब्जाधीश एलन मस्क, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या टेलिफोनिक संभाषणात अब्जाधीश एलन मस्क देखील सामील झाले होते, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर लष्करी हल्ले सुरू केल्यापासून या दोन बड्या नेत्यांमधील हे पहिलेच संभाषण होते. मंगळवारी झालेल्या या संभाषणात प्रामुख्याने इराणसोबत सुरू असलेल्या युद्धावर चर्चा करण्यात आली.

"मंगळवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील फोन कॉलमध्ये एलन मस्क यांनी सहभाग घेतला. युद्धजन्य परिस्थितीच्या काळात दोन देशांच्या प्रमुखांमधील चर्चेत एका खासगी नागरिकाची उपस्थिती ही अत्यंत असामान्य घटना आहे," असे न्यूयॉर्क टाइम्सने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी मस्क यांच्या सहभागाला दुजोरा दिला असून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे राष्ट्राध्यक्षांशी पुन्हा एकदा संबंध सुधारल्याचे यातून सूचित होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील ही चर्चा अत्यंत फलदायी असल्याचे सांगितले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्ताबाबत विचारले असता व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या निवेदनात म्हटले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींशी अत्यंत चांगले संबंध आहेत आणि ही चर्चा उत्पादक ठरली." गेल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कपातीची जबाबदारी मस्क यांच्याकडे सोपवण्यात आली होती, मात्र तिथून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. या फोन कॉलमध्ये मस्क नक्की का होते किंवा त्यांनी काही संवाद साधला का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

२८ फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील हे पहिलेच बोलणे होते. या संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि प्रवेशयोग्य राहण्याच्या महत्त्वावर भर दिला. जागतिक शांतता, स्थिरता आणि आर्थिक कल्याणासाठी हा सागरी मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.