हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यात अपयशी ठरलेल्या बेंजामिन नेतान्याहू सरकारचा निषेध करण्यासाठी इस्त्राईलमधील हजारो नागरिकांनी व कामगारांनी आज 'संप' पुकारत सर्व व्यवहार बंद पाडले. निदर्शकांनी रस्ते व रेल्वे वाहतूक बंद केलीच, शिवाय राजधानीतील विमानतळाचेही कामकाज रोखून धरले होते. यामुळे गाझा पट्टीत चाललेल्या दीर्घ संघर्षात निर्णायक विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या नेतान्याहू सरकारला अंतर्गत आव्हान निर्माण झाले असल्याचे मानले जाते.
गाझा पट्टीत रविवारी सहा ओलिसांची हत्या झाली. या नागरिकांचे मृतदेह इस्राईलला आणल्यावर जनतेच्या सरकारवरील संतापाचा उद्रेक झाला. ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबर शखसंधी करण्यात सरकारला विलंब लागत असल्याने ओलिसांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याची ओरड जनतेतून होत असून विरोधकांसह सरकारमधील काही मंत्र्यांनीही वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. ओलिसांचे मृतदेह रविवारी तेल अविवमध्ये आल्यावर हजारो संख्येने लोक रस्त्यांवर उतरले. देशातील अनेक कामगार संघटनांनी रविवारी रात्रीपासूनच तेल अविवकडे येणारे सर्व महामार्ग रोखून धरत सरकारविरोधात 'संप' पुकारला. निदर्शकांमध्ये मृत ओलिसांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
हमासबरोबर शस्त्रसंधी झाला असता, तर सर्व ओलिस जिवंत परतले असते, असे म्हणत त्यांनी नेतान्याहू यांच्यावर जोरदार टीका केली. काही जणांनी मात्र हमासवर दबाव कायम ठेवण्याच्या नेतान्याहू यांच्या धोरणाचे समर्थन केले. यामुळे इस्त्राईलमध्ये राजकीय फूट पडत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हमासने मागील वर्षों सात ऑक्टोबरला इस्त्राईलवर हल्ला करत सुमारे अडीचशे जणांचे अपहरण केले होते. त्यापैकी टप्प्याटप्प्यांत सुमारे १५० जणांची सुटका झाली असली तरी किमान १०० जण त्यांच्याच ताब्यात आहेत.
विमान उड्डाणेही ठप्प
इस्त्राईलमधील हिस्ताद्भुत या सर्वांत मोठ्या कामगार संघटनेते या 'संप'मध्ये पुढाकार घेतला आहे. यामुळे बँका, आरोग्य केंद्रे यांच्याबरोबर विमान वाहतुकीच्या कामकाबालाही फटका बसला. इस्त्राईलच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सेवा आज दोन ते तीन तास बंद पडली होती. यामुळे अनेक उड्डाणांना विलंब झाला. बँका, मॉल, सरकारी कार्यालयांना आज टाळे होते. महापालिका कर्मचाऱ्यांनीही 'संप'मध्ये सहभाग घेतला होता. शाळांनाही काही प्रमाणात याचा फटका बसला.