गाझामध्ये नाकेबंदीमुळे लोक भुकेने आणि कुपोषणाने त्रस्त आहेत. यामुळे जगभरात इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध होत आहे. मे महिन्यामध्ये पुन्हा सुरू झालेल्या हल्ल्यांनी मध्यपूर्वेतील अनेक भाग उद्ध्वस्त झाले. या परिस्थितीवर पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फतह अल-सीसी यांनी गाझा पट्टीत तात्काळ आणि कायमस्वरूपी शस्त्रसंधीची मागणी केली.
शनिवारी इराकची राजधानी बगदाद येथे झालेल्या ३४व्या अरब लीग परिषदेत महमूद अब्बास यांनी इस्रायलचे लष्करी हल्ले थांबवण्यासाठी आणि गाझात शांति प्रस्थापित करण्यासाठी अरब योजनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. “इस्रायलचा ताबा संपवून पॅलेस्टिनी लोकांचे सर्व हक्क मिळाल्यावरच शांति शक्य आहे,” असे अब्बास म्हणाले.
इजिप्तचा इस्रायलवर निषेध
इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल-फतह अल-सीसी यांनी गेल्या १९ महिन्यांपासून गाझातील पॅलेस्टिनींवर होणाऱ्या अत्याचारांचा आणि हिंसेचा तीव्र निषेध केला. “या हिंसक कारवायांचा उद्देश गाझातील लोकसंख्या नष्ट करणे आहे,” असे त्यांनी सांगितले. अमेरिकेने गाझातील मानवी संकट तातडीने थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली. गाझात शांती प्रस्थापित झाल्यावर पुनर्बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याची मिस्रची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नाकेबंदी हटवण्यासाठी इस्रायलवर दबाव
अरब लीग परिषदेनंतर हमासच्या गाझातील माध्यम कार्यालयाने स्थानिकांना नाकेबंदी तोडण्यासाठी आणि रोजच्या हत्याकांडाला आळा घालण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. गाझात भूकबळीची परिस्थिती आहे. यावर उपाय म्हणून क्रॉसिंग बिनशर्त तातडीने उघडावे, अन्न, मानवी मदत आणि वैद्यकीय साहाय्य गाझात पोहोचवावे, यासाठी इस्रायलवर दबाव वाढवावा, अशी मागणी कार्यालयाने केली.
या परिषदेत लेबनानचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी इस्रायलच्या आक्रमकतेचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय समुदायाने याला आळा घालावा, असे त्यांनी सांगितले. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी युद्धानंतर अरब देशांनी पुनर्बांधणीसाठी निधी उभारण्याची घोषणा केली.
५३,००० हून अधिक बळी
इस्रायलने सहा आठवड्यांच्या शस्त्रसंधीनंतर पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्या. हमास दहशतवादी गटांमध्ये कार्यरत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. पण परिषदेतील नेत्यांनी याला विरोध केला. गाझातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या लष्करी कारवायांनी गर्दीच्या भागांचा विध्वंस केला. २३ लाख लोकांना घर सोडावे लागले तर ५३,००० हून अधिक लोकांचा बळी गेला.