अज्ञाताच्या हल्ल्यात लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिद ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिद
लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी सैफुल्ला खालिद

 

भारतातील बेंगलुरु (2005), नागपूर (2006), आणि रामपूर (2008) येथील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड असणारा लश्कर-ए-तैयबाचा (LeT) दहशतवादी सैफुल्ला खालिद याला  पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केलं. सैफुल्ला हा लश्करच्या दहशतवादी कारवायांचा महत्त्वाचा सूत्रधार होता.    

सैफुल्ला खालिदने नेपालमध्ये विनोद कुमार या बनावट ओळखीखाली राहून लश्कर-ए-तैयबाच्या कारवायांचे नियोजन केले. त्याने तिथे स्थानिक महिला नगमा बानो यांच्याशी विवाह केला आणि तिथूनच दहशतवादी गटाच्या भर्ती, निधी, आणि लॉजिस्टिक्सच्या कामांना गती दिली होती.

अलीकडेच तो नेपालमधून पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील मटली शहरात स्थलांतरित झाला होता. याठिकाणी तो आणि त्याची संस्था जमात-उद-दावा साठी कार्यरत होता. लश्करने त्याला मर्यादित हालचाली आणि कडक सुरक्षेचे निर्देश दिले होते. परंतु काल रविवारच्या सकाळी तो घराबाहेर पडला असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याला गोळ्या घालून ठार केले.

सैफुल्ला खालिद हा मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता:
२००५ : बेंगलुरु इंडियन सायन्स कॉंग्रेस हल्ला – यात अनेक वैज्ञानिक आणि नागरिकांचा बळी गेला.
२००६ : नागपूर RSS मुख्यालय हल्ला – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्ला करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. 
२००८ : रामपूर CRPF कॅम्प हल्ला – उत्तर प्रदेशातील CRPF कॅम्पवर हल्ला केला. यामध्ये अनेक जवान शहीद झाले.

काश्मीरमध्ये लश्करच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
सैफुल्ला खालिदच्या हत्येच्या काही दिवस आधी जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलांनी १२ मे ला  एका चकमकीत लश्करच्या तीन दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये लश्करचा ऑपरेशन्स कमांडर शाहिद कुट्टे, अदनान शफी आणि अहसान उल हक शेख याचा समावेश होता. शाहिद हा दक्षिण काश्मीरमधील दहशतवादी भर्ती आणि अनेक हत्यांमध्ये सामील होता. 

या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन AK-47 रायफल्स, मोठ्या प्रमाणात गोला-बारूद, ग्रेनेड्स, आणि युद्धसामग्री जप्त केली आहे. सैफुल्ला खालिदची हत्या आणि काश्मीरमधील चकमकी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतरच्या घडामोडींचा भाग आहेत. ७ ते १० मे दरम्यान राबवलेल्या या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. यामध्ये लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, आणि हिजबुल मुजाहिदीन यांचे तळ नष्ट झाली. यामुळे दहशतवादी गटांना मोठा धक्का बसला  तर १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter